21 August, 2024
राज्यातील कुशल मनुष्यबळाला जर्मनीत नोकरीची संधी
हिंगोली (जिमाका), दि. 21 : जर्मनीतील बाडेन बुटेनबर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी 25 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनामार्फत सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामुळे जर्मनीत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यानुसार राज्यातील 10 हजार कुशल मनुष्यबळ टप्याटप्याने पुरविले जाणार आहे. आरोग्य विभागातील परिचारिका, वैद्यकीय सहायक, रेडीओलॉजी सहायक, केअर टेकर, कौशल्य विकास विभागातील सेवक, वेटर, स्वागत, कक्ष संचालक, स्वयंपाकी, हॉटेल व्यवस्थापक, तंत्रशिक्षण विभागातील इलेक्ट्रीशिअन, औष्णिक वीज तंत्री, गवंडी कामगार, प्लंबर, वाहनचालक, सुरक्षा रक्षक, पॅकर्स व मुवर्स अशा वेगवेगळ्या 30 क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरवायचे आहे.
याकरिता गोथे संस्थेच्या मार्फत ऑनलाइन व ऑफलाईन स्वरुपात जर्मन भाषा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण वर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गणेशवाडी, हिंगोली या ठिकाणी प्रशिक्षणार्थीच्या सोयीनुसार सकाळ व संध्याकाळ सत्रात आयोजित केले जाणार आहेत. प्रत्येक वर्गात 25 प्रशिक्षणार्थी असतील. या जर्मन भाषा प्रशिक्षणासाठी डॉ. माणिक जाधव, अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, हिंगोली हे समन्वयाचे काम करणार आहेत.
जर्मन भाषा वर्गाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षाणार्थीना त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार A1, A2, B1, B2 या स्तराच्या परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणाचा खर्च शासन करणार आहे. त्यानंतर गरज लागली तर संबधित क्षेत्रातील तांत्रिक कौशल्य प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे मुख्य समन्वयक म्हणून डायटचे प्राचार्य काम पाहणार आहेत. या संदर्भात दि. 11 जुलै 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
जर्मन भाषा शिकून जर्मनीत नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या कौशल्य प्राप्त व्यक्तींनी पुढील लिंकवर नावनोंदणी करावी. https://www.maa.ac.in/GermanyEmployment/ तसेच जर्मन भाषा शिकविणाऱ्या तज्ञ व्यक्तींचे प्रमाण वाढण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शिक्षकांना जर्मन भाषा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ज्या शिक्षकांना जर्मन भाषा शिकायची आहे त्यानी https://forms.gle/1Q32ByNwp9MnHmHe7 या लिंकवर नाव नोंदणी करावी, असे आवाहन डायटचे प्राचार्य डॉ. दीपक साबळे यांनी केले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment