02 August, 2024
शेतकऱ्यांनी भरघोस उत्पन्न देणारी रेशीम शेती करावी - उपसंचालक महेंद्र ढवळे
हिंगोली (जिमाका), दि. 02 : पारंपरिक पिकांपेक्षा रेशीम शेती ही फायदेशीर असून, भरघोस आणि हमखास उत्पन्न देणारी शेती म्हणून भविष्यात रेशीम शेती करावी, असे आवाहन रेशीम उपसंचालक महेंद्र ढवळे यांनी केले.
जिल्हा रेशीम कार्यालय हिंगोली अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा औंढा नागनाथ तालुक्यातील चाँडी येथे सत्यनारायण चौंडीकर यांच्या शेतामध्ये नुकतीच पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
हिंगोली जिल्ह्यात 2 हजार एकर रेशीम शेतकरी तयार झाल्यास रेशीमसाठी जिल्ह्यात स्वतंत्र बाजारपेठ मंजूर करण्याचे आश्वासन उपसंचालक ढवळे यांनी दिले.
यावेळी कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथील प्राचार्य श्री. शेळके यांनी शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन तांत्रिक मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले. कृषी विज्ञान केंद्र ताेंडापूर येथील श्री. सुगावे यांनी शेतकऱ्यांना तंत्रशुद्ध पद्धतीने रेशीम शेतीची माहिती दिली.
यावेळी प्रगतशील रेशीम शेतकरी दिपक शिंदे, सुरेश भोसले व श्रीधर शृंगारे यांनीही प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन रेशीम शेती ही इतर पिकांपेक्षा कशी फायदेशीर आहे हे सप्रमाणात पटवून सांगितले.
जिल्हा रेशीम विकास अधिकारी श्री. देशपांडे यांनी रेशीम शेतीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागेल ती मदत करण्याचे आश्वासन देऊन उपस्थित सर्व शेतकऱ्यांचे आभार मानले.
या कार्यशाळेत जिल्ह्यातील जवळपास 200 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक अशोक वडवळे, गजानन काचगुंडे तसेच रंगनाथ जांबुतकर, राजू रणवीर, रजनीश कुटे, कुलदीप हरसुले, केतन प्रधान, कु. राधा पाटील, रमेश भवर, तान्हाजी परघणे आदी शेतकरी उपस्थित होते.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment