14 August, 2024
बाळापुरात बाल संरक्षण धोरणाबाबत जनजागृती कार्यक्रम
हिंगोली, दि.14(जिमाका): जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून बालकासंदर्भात असणारी कायदे, यंत्रणा अशी बालकाशी निगडीत विविध विषयावर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या अध्यक्षतेखाली बाल धोरण व बाल कायदे याबाबत नुकताच बाळापूर येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 नुसार बाल विवाह म्हणजे काय, विवाहाचे योग्य वय, बाल विवाह होण्याची कारणे याबाबत माहिती देण्यात आली. कुटुंबाचे स्थलांतर, आर्थिक परिस्थिती, कुटुंबातील मुलींचे प्रमाण, वडिलांचे व्यसन, किशोर वयीन मुला-मुलीच्या हातून होणाऱ्या चुका इ. बाल विवाह होण्यामागची प्रमुख कारणे आहेत. परंतु बाल विवाह केल्याने होणा-या दुष्परिणामाचा सामना मुलगा-मुलगी व कुटुंबांना करावा लागतो, असे विवाह बेकायदा ठरतात आणि या विरोधात गुन्हा नोंदविला जाणे अपेक्षीत आहे. अशा गुन्ह्यास एक लाख दंड व दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आहे. याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच मुलीच्या वयाची 18 व मुलगा 21 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी विवाह करणे गुन्हा असल्याचे प्रतिपादन बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीब खान पठाण यांनी केले.
तसेच माता मृत्यूचे प्रमाण, कुपोषित मूल जन्माला येणे, त्यावर उपपाययोजना म्हणून मुलींना शिक्षण देणे आवश्यक आहे. मुलींनीसुद्धा पालकांना विश्वासात घेऊन शिक्षण पूर्ण केले पाहिजे, आपल्या सभोवताली बालविवाह होत असल्यास चाईल्ड हेल्पलाईन 1098 या निशुल्क क्रमांकावर माहिती द्यावी. बालकांचे हक्क व अधिकार याबाबत तसेच बालकांवर होणारे अन्याय थांबविण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन बाल संरक्षण अधिकारी गणेश मोरे यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी तसेच शिक्षक उपस्थित होते.
हिंगोली तालुक्यातही जनजागृती कार्यक्रम
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती सरस्वती कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली देवठाणा वांजोळा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत व चाईल्ड हेल्प लाईनचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे यांनी बाल हक्कविषयक जनजागृती कार्यक्रम घेतला. त्यावेळी बाल धोरण बाल हक्क व बालकांच्या समस्यायाबाबत चर्चा करण्यात आली. बालविवाह व लैंगिक अत्याचारापासून बालकाचे संरक्षण चांगला व वाईट स्पर्श याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
तसेच चाईल्ड हेल्पलाईन 1098 ची माहिती देण्यात आली. त्यावेळी चाईल्ड हेल्पलाईनचे केस वर्कर राजरत्न पाईकराव यांनी बालकांना माहिती दिली. त्यावेळी मुख्याध्यापक श्री. मानमोठे, श्री. चौधरी सहशिक्षक श्री. गारोळे, बोराळ, श्री. मनवर, ज्येष्ठ नागरिक सुरेश गायकवाड व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment