02 August, 2024
जागतिक स्तनपान सप्ताहाचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 02 : दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट हा आठवडा 'जागतिक स्तनपान सप्ताह' म्हणून साजरा केला जातो. या दरम्यान स्तनपानाचा प्रचार व प्रसार केला जातो. जागतिक स्तनपानाचा दर वाढवणे हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगूलवार यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 1 ते 7 ऑगस्ट, 2024 या कालावधीत जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात येत आहे
स्तनपान करणाऱ्या मांता करिता सुरक्षित वातावरण निर्मिती करणे, अर्भक मृत्यू, बालमृत्यू कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
यावर्षीच्या 2024 च्या जागतिक स्तनपान सप्ताहासाठी "closing the gap: Breastfeeding support for all", "आई आणि बाळा मधील अंतर कमी करूया : स्तनपानाला समर्थन देऊया" ही थीम निश्चित करण्यात आली आहे. या थीमद्वारे नवजात बालकांचे वडील, त्यांचे कुटुंब, आरोग्यसेवा प्रदाते आणि संपूर्ण समाजाचा स्तनपानाला पाठिंबा घेण्यावर भर देण्यात आला आहे.
स्तनपानाचे फायदे :
आई व बाळामध्ये भावनिक बंध निर्माण होऊन त्याचे नाते दृढ होते. आईचे दूध कोणत्याही वेळी उपलब्ध होऊ शकते. कोणत्याही भेसळीचा, रोग संक्रमणाचा धोका नसतो, कोलोस्ट्रम म्हणजे सुरुवातीचे पिवळे व चिकट दूध हे बाळाची रोगप्रतिकारक क्षमता वाढवते. आतड्यांची संक्रमणे (अतिसार, जुलाब) विरोधी शक्ती वाढवते. मेंदूच्या सर्वांगीण विकास व कार्यक्षमतेसाठी उत्कृष्ट असते. आईच्या दुधामुळे कानाची संक्रमणे, अॅलर्जी व अतिसाराचा धोका कमी होतो, अशी माहिती जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सुनिल देशमुख यांनी यावेळी दिली.
स्तनपानाचा आईला होणारा लाभ :
बाळाला अंगावर पाजल्याने स्तनाचा कर्करोग, अस्थिसुषिरता व स्तनामध्ये गाठी होण्याचे धोके कमी होतात. बाळंतपणानंतरचा रक्तस्त्राव कमी होण्यास मदत होते. गर्भाशयाचा आकार पूर्ववत होण्यास मदत होते. गर्भावस्थेतील आईचे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. मातेला मानसिक तसेच शारीरिक समाधान व आनंद मिळवून देते, अशी माहिती सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडूरंग फोपसे यांनी दिली .
आईच्या दुधाची वैशिष्ट्ये :
प्रसूतीनंतर लगेच आईचे दूध पिवळसर व चिकट असते, त्याला 'कोलोस्ट्रम' असे म्हणतात. ते प्रसूतीनंतर पहिल्या आठवड्यात सुटते, कोलोस्ट्रम आईच्या नेहमीच्या दुधापेक्षा जास्त पौष्टिक असते. कारण त्यात जास्त प्रथिने संक्रमणविरोधी गुणधर्म असतात व ते नवजात बालकाला होणाऱ्या घातक संक्रमणाविरुद्ध प्रतिकारासाठी महत्त्वाचे असतात. त्यात 'अ', 'ड', 'ई' व 'के' ही आवश्यक जीवनसत्त्वे जास्त प्रमाणात असतात. आईने बाळाला कोलोस्ट्रम पाजलेच पाहिजे. कारण ते अनेक पोषक तत्त्वांनी समृद्ध असते. त्याऐवजी बाळाला साखरेचे पाणी, मध, लोणी, इतर काहीही देऊ नये. आईचे दूध हा परिपूर्ण व संतुलित आहार आहे व तो बाळाला जन्मापासूनच्या पहिल्या काही महिन्यात आवश्यक असलेली सर्व पोषक तत्त्व पुरवतो. त्यात संक्रमण विरोधी गुणधर्म असून, ते सुरुवातीच्या महिन्यात बाळाचे जंतू संसर्गापासून रक्षण करतात. हा आहार सदैव उपलब्ध असतो, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके यांनी दिली.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment