28 August, 2024
छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 28 : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था मराठा, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्ष्यित गटातील समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी राज्य शासनाच्या नियोजन विभागांतर्गत काम करते.
सारथी संस्थेंअंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमास सुरुवात झाली असून प्रशिक्षणाच्या माध्यमातून लक्ष्यित गटाचा विकासात सहभाग वाढीसाठी तसेच या प्रशिक्षणाद्वारे तरुणांना आत्मनिर्भर करण्यासाठी सारथी संस्था कार्य करीत आहे.
सारथीमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने निवासी उपजिल्हाधिकारी यांना सारथीचे जिल्हा समन्वयक अधिकारी व तहसीलदार यांना सारथीचे तालुका समन्वयक अधिकारी म्हणून घोषित केले आहे.
ग्रामीण भागातील 10 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना संगणक कौशल्य, इंग्रजी भाषा कौशल्य व संवाद कौशल्य विकसित करुन त्यांना रोजगार अथवा स्वयंरोजगारासाठी तयार करण्याच्या उद्देशाने छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तीमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम दि. 1 फेब्रुवारी, 2023 पासून सुरु करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणातून दरवर्षी 40 हजार विद्यार्थ्यांना अर्थात दोन वर्षात 80 हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत मागील दोन वर्षात (दि. 29 जुलै, 2024 पर्यंत) एकूण 54 हजार 321 उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु झाले आहे.
या योजनेंतर्गत दि. 31 ऑगस्ट, 2024 पूर्वी सदर प्रशिक्षणास अजून 25 हजार 679 उमेदवारांचे प्रवेश होणे अपेक्षित आहे.
गावपातळीवर संगणक साक्षरतेचा अभाव आहे. त्यामुळे गावातील सारथी लक्ष्यित गटातील लोकांची संगणकाचे ज्ञान व कौशल्यामुळे कार्यक्षमता वाढेल व त्यांना रोजगाराची संधी निर्माण होईल, यासाठी तहसीलदार, तलाठी यांच्यामार्फत योजनेचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे.
तहसीलदार व तलाठी हे तालुका व गाव पातळीवरील कामकाज करणारे प्रमुख अधिकारी आहेत. त्यांचा प्रभाव गावामध्ये मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्यामार्फत कोर्सची माहिती द्यावी. त्यामुळे प्रशिक्षणास सहभागी होण्यासाठी अधिकाधिक लोकांपर्यत सारथीच्या योजंनाचा प्रचार, प्रसार करण्यात येत आहे. त्यासाठी एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक व केंद्र समन्वयक यांची बैठक घेण्यात यावी. या बैठकीस उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निमंत्रित करावेत. तर तहसीलदार यांनी दर महिन्याच्या तलाठी आढावा बैठकीत एमकेसीएलच्या तालुकास्तरीय केंद्र समन्वयक यांना निमंत्रित करावे व सारथीच्या योजनांना अधिकाधिक लाभार्थी मिळतील यादृष्टीने आढावा घ्यावा. तहसीलदार यांनी त्यांच्या स्तरावर दर महिन्याच्या तलाठी आढावा बैठकीत, सारथीच्या सर्व योजनांची माहिती द्यावी व केलेला प्रचार प्रसिध्दीचा आढावा घ्यावा. तहसीलदारांनी गटविकास अधिकारी यांच्यासोबत समन्वय साधून दर महिन्याच्या ग्रामसेवकांच्या आढावा बैठकीत सारथीच्या योजनांची माहिती द्यावी.
सारथीच्या योजनेची माहिती जिल्ह्यातंर्गत असलेल्या महाविद्यालयातील नोटीस बोर्डावर लावावी. तहसीलदार यांनी तलाठी व ग्रामसेवक यांच्या माध्यमातून गावपातळीपर्यंतच्या योजनेची माहिती ग्रामस्थांना देण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. तसेच एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक व तालुकास्तरीय संस्थाचालकाची बैठक घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिल्या आहेत.
या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment