19 August, 2024

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत दोन दिवसात नियुक्त्या द्या - जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी

हिंगोली, दि. 19 (जिमाका) : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत जिल्ह्यातील स्थानिक युवकांना प्राधान्य देत उर्वरित सर्व नियुक्त्या दोन दिवसात द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी सर्व नियुक्ती अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना स्थानिक पातळीवर शासकीय कार्यालयात काम करण्याच्या संधीसोबत मानधन देण्यासाठी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा आज जिल्हाधिकारी श्री. परदेशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृष्यप्रणालीव्दारे आढावा घेतला. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. परदेशी बोलत होते. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत जिल्ह्यातील स्थानिक युवकांना प्राधान्य देऊन त्यांना तात्काळ नियुक्त्या देण्यात याव्यात. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पाठविण्याचे निर्देशही सर्व नियुक्ती अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्य शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली असून, या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त बेरोजगार युवक-युवतींना स्थानिक पातळीवर रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा मुख्य हेतू आहे. तसेच शासकीय कार्यालयांमध्ये काम करण्याच्या संधीसोबत कार्य प्रशिक्षण मानधन देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. त्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या संकेतस्थळावर नावनोंदणी करणे अनिवार्य आहे, असे जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी सांगितले. या आढावा बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजाभाऊ मगर, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वि. प्र. रांगणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके आदी उपस्थित होते. *****

No comments: