21 August, 2024
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेत 2 लाख 65 हजार 950 महिलांचे अर्ज प्राप्त
हिंगोली (जिमाका), दि. 21 : राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2 लाख 65 हजार 950 पात्र लाभार्थी महिलांनी अर्ज भरले असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. मगर यांनी दिली आहे.
जिल्ह्यात दि. 21 ऑगस्ट, 2024 पर्यंत ॲपवर 1 लाख 79 हजार 208 अर्ज व पोर्टलवर 86 हजार 742 अर्ज प्राप्त झाले आहेत. ॲपवर प्राप्त झालेल्या 1 लाख 79 हजार 208 प्राप्त अर्जापैकी 1 लाख 77 हजार 241 अर्ज मंजूर करण्यात आले असून 1403 अर्ज तात्पुरत्या स्वरुपात रद्द करण्यात आलेल्या आहेत. मंजूर अर्जाची टक्केवारी 98.9 अशी आहे. तर पोर्टलवर प्राप्त झालेल्या 86 हजार 742 अर्जापैकी 3 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत, तर 25 हजार 501 अर्ज तात्पुरते मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित अर्जाची छाननी करुन मंजुरी देण्याचे काम सुरु आहे.
ग्रामीण भागातील जास्तीत जास्त पात्र महिला लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधून अर्ज भरावेत.
"मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण" योजनेंतर्गत महिला लाभार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी www.ladkibahin.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ दि.1 ऑगस्ट पासून सुरु करण्यात आले आहे,
ज्या लाभार्थ्यांनी "नारी शक्ती दूत" ॲपवर अर्ज भरले आहेत त्यांना पुन्हा या पोर्टलवर अर्ज भरण्याची गरज नाही. ज्या पात्र इच्छुक महिला लाभार्थांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत त्यांनी www.ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज भरावेत, असे आवाहनही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. मगर यांनी केले आहे.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment