17 August, 2024

जिल्ह्यातील प्रत्येक पात्र महिलेच्या खात्यात रक्कम जमा होईपर्यंत योजनेचे काम सुरूच राहणार - जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी

• मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शुभारंभ • लाडकी बहीण योजनेच्या लाभातून महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावे हिंगोली, दि.17 (जिमाका): राज्य शासन विविध घटकांना मदत करणाऱ्या योजना राबवित आहे. नव्याने सुरू झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील असंख्य महिलांना लाभ देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत योजनेच्या नावनोंदणीचे काम सुरूच राहणार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी उपस्थित लाभार्थी महिलांना आज रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, निवासी उप जिल्हाधिकारी गणेश महाडीक, उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी राजाभाऊ मगर, तालुका महिला व बालविकास अधिकारी विलास चव्हाण, विवेक वाकडे आदी उपस्थित होते. जिल्ह्यात माझी लाडकी बहिण योजनेत आतापर्यंत 2 लाख 60 हजार महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 1 लाख 76 हजार 794 लाडक्या बहिणी पात्र ठरल्या आहेत. ही नावनोंदणीची आकडेवारी दि. 1 जुलै ते 31 जुलैदरम्यान करण्यात आलेली आहे. काही अर्ज तात्पुरत्या स्वरुपात नामंजूर झाले आहेत. अर्जातील त्रुटी पूर्तता झाल्यावर त्यांच्याही खात्यात रक्कम जमा होणार आहे. यात टप्प्याटप्याने महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. केवळ बँक खाते आधार संलग्न नसल्याने योजनेची मदत देण्यास अडचण येत आहे. त्यामुळे महिलांनी प्राधान्याने बँक खाते आधारशी संलग्न करावे, असे जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी सांगितले. जिल्हा आणि तालुकास्तरासह ग्रामीण भागात या योजनेत पात्र महिलांची नावनोंदणी करण्याचे काम जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्या चमूने अतिशय मेहनतीने केले. त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविकांसह सर्वांचे अभिनंदन केले. तसेच या पुढील टप्पा हा अतिशय महत्त्वाचा असल्याचे सांगून, तात्पुरत्या स्वरुपात अपात्र ठरलेल्या अर्जामधील त्रुटी पूर्तता करण्याचे काम वेगाने हाती घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले. याशिवाय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुलींना उच्च शिक्षणासाठी 100 टक्के मोफत योजना यासह इतरही योजनांसाठी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले आहे. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांनी आभार मानताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि प्रधानमंत्री व मुख्यमंत्री शेतकरी निधी सन्मान योजनेतील रक्कम एकत्रित केल्यास शेतकरी कुटूंबाला मोठा आर्थिक हातभार लागणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालविकास अधिकारी विलास चव्हाण यांनी केले. *****

No comments: