07 August, 2024
शेतकऱ्यांनी गटशेतीची कास धरून कृषि उत्पन्न वाढवावे -जिल्हाधिकारी मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रम कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूर येथे संपन्न
शेतकऱ्यांनी गटशेतीची कास धरून कृषि उत्पन्न वाढवावे
-जिल्हाधिकारी
मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रम कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूर येथे संपन्न
हिंगोली, दि.०७ (जिमाका): शेतकऱ्यांनी नियमितपणे माती परीक्षण करून खत व्यवस्थापन करावे. हिंगोली जिल्हा हा हळद उत्पादनामध्ये प्रसिद्ध असून, शेतकऱ्यांना हळदीपासून तयार होणारे विविध पदार्थ तयार करावे. तसेच शेतकऱ्यांनी गटशेतीची कास धरून कृषि उत्पन्न वाढवावे, असे आवाहन ऑनलाईन माध्यमाद्वारे मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी गट शेती करून शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करावी. तसेच नवीन योजनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व लाडकी बहीण योजनेमध्ये सर्व महिलांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
संत नामदेव सेवाभावी संस्था, हिंगोली संचलित कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूर जि. हिंगोली, महसूल विभाग, आणि कृषी विभाग, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने महसूल पंधरवाडानिमित्त आयोजित सोमवार (दि.5) रोजी झालेल्या कृषि मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमात आवाहन केले.
यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, तर दूरदृष्यप्रणालीद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी उपस्थित होते.
कृषि, महसूल विभाग व जिल्ह्यातील इतर विभागासोबत के. वी. के. नियमितपणे विस्तार कार्य तसेच शेतकऱ्यांचे शंकांचे निरसन करत आहे. सोबतच विविध माध्यमांचा वापर करून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचत असल्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शेळके यांनी मत व्यक्त केले.
प्रास्ताविकात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची पेरणी झाली असून यावर्षी दहा हजार हेक्टर हळदीचे क्षेत्र जिल्ह्यात वाढलेले आहे. सोबतच हळद संशोधन केंद्र वसमत येथे ३२ विविध हळदीच्या जाती लागवड केल्या असून आपल्या हळदीला भौगोलिक मानांकन मिळालेला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी APEDA या वेबसाईटवर जाऊन आपली नोंदणी करावी, असे आवाहन केले. तसेच, शेतकरी बांधवांनी सोयाबीन, तूर, कापूस, उडीद, हळद व तर विषयांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन नियमितपणे घेण्याचे आवाहन केले. सोबतच शेतकरी बंधूंनी फवारणी करताना काळजी घ्यावी. कृषि विभागांतर्गत स्मार्ट योजना, परंपरागत कृषि विकास योजना अंतर्गत गांडूळ खत विक्री व उत्पादन जीवामृत, दशपर्णी अर्क असे प्रशिक्षण घेऊन शेतकऱ्यांनी स्वत:चा उद्योग सुरू करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात संत नामदेव सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी माने, मृदा विज्ञानचे विशेषज्ञ साईनाथ खरात, कृषि विद्याचे विशेषज्ञ राजेश भालेराव, पिक संरक्षण विशेषज्ञ अजयकुमार सुगावे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास महेंद्र माने, नितीन घुगे, तालुका कृषी अधिकारी कळमनुरी, के. एच. बोथीकर, श्रीरंग निंबाळकर, प्राचार्य डॉ. विष्णू बोंढारे, यांच्यासह तलाठी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक, कृषि सेवक, महसूल विभागाचे कर्मचारी, शेतकरी बांधव व विद्यार्थी मोठ्य संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन अनिल ओळंबे व डॉ. अतुल मुराई यांनी उपस्थितांचे आभार मानले.
***
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment