30 August, 2024

शासनाच्या सर्व महत्त्वाकांक्षी योजनांच्या प्रगतीबाबत दरमहा घेणार आढावा - नूतन जिल्हाधिकारी अभिनव गोयल • कामाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी घेतला विविध विभागांचा आढावा

हिंगोली (जिमाका), दि. 30 : शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व महत्त्वाकांक्षी योजनांच्या प्रगतीबाबत प्रत्येक महिन्याला सर्व विभाग प्रमुखांचा आढावा घेण्यात येणार आहे, अशा सूचना जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आज आढावा बैठकीत दिल्या. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखाची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी घेतली. यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, गणेश वाघ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. गोयल म्हणाले, दरमहा घेण्यात येणाऱ्या कामकाजाच्या आढाव्याबरोबरच जिल्हा कृती आराखड्याच्या अनुषंगाने करावयाच्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज सवलत योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण यासह महत्त्वाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. सर्व कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची सद्यस्थिती, कामाचा तपशील याची थोडक्यात पीपीटी सादर करावी. याबाबत दरमहा आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनेतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे प्राप्त अर्ज काळजीपूर्वक तपासून मंजुरी द्यावी. तसेच आधार लिंक करण्यासाठी पात्र लाभार्थी महिलांचे खाते तात्काळ लिंक करुन घ्यावेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत सर्व कार्यालयांनी बेरोजगार पात्र युवक-युवतींच्या राहिलेल्या नियुक्या तात्काळ कराव्यात व तसा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्याचे आदेश दिले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज सवलत योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण यासह आदिवासी विकास, जलजीवन, गाळमुक्त धरण, कृषि विभागाच्या योजना, लेक लाडकी योजना, विश्वकर्मा योजना यासह विविध योजनांचा आढावा घेऊन सूचना केल्या आणि सर्व विभाग प्रमुख यांच्याकडून चांगले काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. ******

No comments: