29 August, 2024

क्षयरोगमुक्त ग्राम पंचायत अभियानासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज - जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी

• क्षयरोगमुक्त ग्राम पंचायत जिल्हास्तरीय गौरव सोहळा हिंगोली (जिमाका), दि. 29 : क्षयरोगापासून आपले गाव, आपला तालुका तसेच आपला जिल्हा मुक्त करण्यासाठी गाव पातळीपासून सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत कार्यक्रमा अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील 41 ग्राम पंचायतीना क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत म्हणून घो्षित करण्यात आले आहे. या सर्व ग्रामपंचायतींचा आज जिल्हा नियोजन सभागृहात गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, डॉ. कौस्तुभ दासगुप्ता, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, डॉ. अभिजीत बांगर, सर्व गट विकास अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यासह ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच आशाताई उपस्थित होत्या. यावेळी जिल्हाधिकारी श्री. परदेशी पुढे बोलताना म्हणाले, आपला भाग टीबीमुक्त करण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. केवळ सार्वजनिक आरोग्य विभागावर अवलंबुू न राहता आपण आपल्या परिसरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा प्रदान केल्या पाहिजेत, सर्वात चांगल्या आणि दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान केल्यामुळेच आज आपण या ग्राम पंचायत टीबी मुक्त करु शकलो आहोत. हिंगोली जिल्ह्यातील टीबी विभाग हा सर्व आधुनिक यंत्रणांनी संपन्न असल्याने सर्व तपासण्या आणि औषधोपचार देखील मोफत केले जातात. याचा सर्व नागरीकांनी लाभ घेतला पाहिजे. हिंगोली जिल्ह्यात येत्या सप्टेंबर महिन्यापासून टीबी मुक्तीसाठी लसीकरण कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. सर्वांनी ही लस घेतली पाहिजे आणि आपला जिल्हा टीबी मुक्त म्हणून राज्य पातळीवर आला पाहिजे. यासाठी कोणतीही शंका असेल तर टीबी विभागाशी संपर्क करून आपण ही लस घेतली पाहिजे. जेणे करून भविष्यात आपल्याला टीबी होणार नाही याची दक्षता आरोग्य विभाग घेणार आहे. परंतु यासाठी सर्व नागरिकांनी विभागाला सहकार्य करणे गरजेचे आहे. टीबी आजाराबाबत जास्तीत जास्त जनजागृती करुन आपला जिल्हा टीबीमुक्त करण्याासाठी एकत्रित प्रयत्नाची गरज आहे. हिंगोली जिल्हा राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत राज्यात दुस-या क्रमांकावर आहे. तसेच हिंगली जिल्हा एसएनसी उपक्रमात कास्यपदकासाठी पात्र ठरला आहे. हिंगोली जिल्ह्याची कामगिरी पाहता यावेळी जिल्हाधिकारी श्री. परदेशी यांनी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले तसेच यावेळी जिल्हा क्षयरोग कार्यक्रमासाठी एक्सरे मोबाईल व्हॅनची मागणी केली असता जिल्हाधिकाऱ्यांनी सदर मागणी पूर्ण करणार असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये यांनी देखील मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत बांगर यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिंगोली तालुक्यातील खरबी, खांबाळा, चोरजवळा, बोराळा, चिंचोली, वसमत तालुक्यातील कळंबा, सुकळी, लहान, रेणकापूर, बोरगाव खु. , रोडगा फाटा, बोरगाव बु., चोंढी तांडा, चोंढी बहिरोबा, औंढा तालुक्यातील पांगरा, टेंभुरदरा, सोनवडी, कोंडशी, हिवरखेडा, उमरा, सुरवाडी, नंदगाव, रांजाळा, लांडाळा, कळमनुरी तालुक्यातील नवखा, गुंडलवाडी, रेडगाव, जटाळवाडी, तेलंगवाडी, चाफनाथ आणि सेनगाव तालुक्यातील तपोवन, गारखेडा, माहेरखेडा, किरखेडा, धोतरा, उमरदरा, लिंगी, खडकी, खुटाडी, सालेगाव, व्होलगीरा, गोंडाळा या टीबी मुक्त ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्षयरोग विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. ******

No comments: