29 August, 2024

तोंडापूर कृषी विज्ञान केंद्रात रोपवाटिका व्यवस्थापन प्रशिक्षण यशस्वी

हिंगोली (जिमाका), दि. 29 : तोंडापूर कृषी विज्ञान केंद्रात दि. 20 ते 24 ऑगस्ट या दरम्यान पाच दिवसीय रोपवाटिका व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचे उद्घाटन वरिष्ठ शास्त्रज्ञ व कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रशिक्षणात परिसरातील शेतकरी, उद्योजक, आणि रोपवाटिका व्यवस्थापनात रुची असलेल्या युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या प्रशिक्षणामध्ये कृषी महाविद्यालय तोंडापूर येथील विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग नोंदविला. त्यांना प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. यावेळी वरिष्ठ शास्त्रज्ञ व कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी आपल्या भाषणात रोपवाटिका व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट केले व त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना होणारे आर्थिक फायदे सांगितले. मुख्य प्रशिक्षक प्रा.अनिल ओळंबे (उद्यानविद्या तज्ञ) यांनी रोपवाटिका उभारणी, मीडियाची निवड, विविध कलमांच्या पद्धती याबाबत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह माहिती दिली. त्याचबरोबर बागकामाची हत्यारे आणि अवजारांच्या उपयोगासह, रोपवाटिका व्यवस्थापनावर सखोल मार्गदर्शन केले. प्रा. राजेश भालेराव यांनी गांडूळ खत निर्मिती, सेंद्रिय शेती व लागवड याविषयी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांसाठी प्रक्षेत्र भेट आयोजित करण्यात आली होती. या भेटीत सहभागी शेतकऱ्यांनी बनाना रायपणींग चेंबर, डोंगरकडा आणि हिरकणी बायोटेक टिशू कल्चर प्रयोगशाळा पार्डी येथे भेट दिली. प्रशिक्षणार्थ्यांनी बनाना रायपणींग चेंबरमध्ये विविध प्रक्रिया आणि व्यवस्थापनाच्या तंत्रांची माहिती घेतली, तर हिरकणी बायोटेकमध्ये जी-9 जातीच्या केळीच्या रोपांची निर्मिती कशी केली जाते याचा अभ्यास केला. प्रशिक्षणाचा समारोप व प्रमाणपत्र वितरण समारंभ माजी खासदार ॲड. शिवाजी माने यांच्या उपस्थितीत पार पडला. या समारोप कार्यक्रमात प्रा. राजेश भालेराव यांनी आभार प्रदर्शन केले. हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रातील सर्व कर्मचारी वृंदांचे सहकार्य लाभले. *****

No comments: