22 August, 2024

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत तात्काळ नियुक्त्या देऊन युवा कार्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन द्यावी - जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी

हिंगोली (जिमाका), दि. 22 : ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी केलेल्या, 18 ते 35 वयोमर्यादा असलेल्या तसेच आवश्यक किमान शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या पात्र उमेदवारांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत त्यांना तात्काळ नियुक्त्या देऊन युवा कार्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी सर्व नियुक्ती अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना स्थानिक पातळीवर शासकीय कार्यालयात काम करण्याच्या संधीसोबत मानधन देण्यासाठी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा आज जिल्हाधिकारी श्री. परदेशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. परदेशी बोलत होते. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी कौशल्य विकास विभागाकडून पात्र इच्छूक उमेदवारांची यादी उपलब्ध करुन घ्यावी. त्या पात्र उमेदवारांना दूरध्वनी करुन बोलावून घ्यावे. त्यांच्या कागदपत्राची तपासणी करुन जास्तीत जास्त युवकांना युवा कार्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत तात्काळ नियुक्त्या देण्यात याव्यात व त्यांना रुजू करुन घ्यावेत. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पाठविण्याचे निर्देशही सर्व नियुक्ती अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्य शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली असून, या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त बेरोजगार युवक-युवतींना स्थानिक पातळीवर रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा मुख्य हेतू आहे. तसेच शासकीय कार्यालयांमध्ये काम करण्याच्या संधीसोबत कार्य प्रशिक्षण मानधन देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. त्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या संकेतस्थळावर नावनोंदणी करणे अनिवार्य आहे, असे जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी सांगितले. या आढावा बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, संदीप सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके यांच्यासह विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी दूरदृष्यप्रणालीव्दारे ऑनलाईन उपस्थित होते. *****

No comments: