23 August, 2024
हिंगोली तालुक्यातील सवड येथील शेती शाळेत सोयाबीन पिकावरील पिवळा मोझॅक नियंत्रणाबाबत मार्गदर्शन
हिंगोली (जिमाका), दि. 23 : तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत आज हिंगोली तालुक्यातील सवड येथे राज्य पुरस्कृत मूल्य साखळी योजनेअंतर्गत सोयाबीन पिकावरील शेतीशाळा आयोजित करण्यात आली होती. या शेती शाळेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी सोयाबीन पिकावरील चक्री भुंगा व खोडमाशी नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांना शेती शाळेचे महत्त्व समजावून सांगितले.
याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी कमलाकर सांगळे यांनी सोयाबीन पिकावरील पिवळा मोझॅक नियंत्रणाबाबत माहिती देताना "सोयाबीनवरील पिवळा मोझॅक हा विषाणूजन्य रोग असून त्याचा प्रसार पांढरी माशीमुळे होत असतो. यासाठी शेतकऱ्यांनी पांढऱ्या माशीचे वेळीच नियंत्रण करणे आवश्यक आहे. पांढरी माशी ही रस शोषण करणारी कीड असून ती नैसर्गिकरित्या पिवळ्या रंगाकडे आकर्षित होते. यासाठी शेतकऱ्यांनी एकरी दहा पिवळ्या रंगाचे चिकट सापळे सोयाबीन पिक असलेल्या शेतामध्ये लावावे, तसेच रोगाच्या सुरुवातीच्या अवस्थेत कमी संख्येने असलेली प्रादुर्भावग्रस्त झाडे तातडीने उपटून शेताबाहेर दूर नेऊन नष्ट करावेत. पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही कीटकनाशक इमिडाक्लोप्रिड 17•8 टक्के किंवा डायफेनथीरॉन 50 टक्के किंवा फिप्रोनील 15 टक्के + फ्लोनीक्यामिड 15 यापैकी कोणतेही एका कीटकनाशकाची फवारणी करावी" असे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना केले.
कृषी पर्यवेक्षक एस. एम. कोटे यांनी कीटकनाशकांची फवारणी करताना घ्यायची काळजी याबाबत प्रात्यक्षिक करून उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शशिकांत कऱ्हाळे यांनी "स्थानिक सामग्री मधून जैविक कीटकनाशकांची निर्मिती व फवारणी" याबाबत मार्गदर्शन केले. तर सुशांत जाधव यांनी नॅनो युरिया व नॅनो डीएपी बाबत मार्गदर्शन केले.
या शेतीशाळेचे यशस्वी नियोजन कृषी सहाय्यक गजानन शिंदे यांनी केले. याप्रसंगी कृषी सहाय्यक दामोदर रोडगे, यशवंत चोपडे, शिवप्रसाद धोंडगे , गणेश बिचारे, विलास गिरी, श्रीमती शिल्पा जंपणगिरे, श्रीमती संजीवनी शिंदे या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
या शेती शाळेत गणेश थोरात, मारुती फाजगे, राजकुमार थोरात, केदारलींग थोरात , जयवंत जोजार, अमोल तारे, शंकर ताटे ,अशोक जावळे, ईश्वर जावळे व इतर शेतकरी उपस्थित होते.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment