17 August, 2024
शासकीय यंत्रणांनी योग्य समन्वयातून सर्वसामान्य जनतेची कामे करावीत • मावळते जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे अधिकाऱ्यांना आवाहन
हिंगोली,दि.१७(जिमाका): जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचा जिल्हा प्रशासनातील महसूल विभाग, ग्रामीण जनतेशी निगडीत असणारा जिल्हा परिषद आणि पोलीस प्रशासनावर प्रचंड विश्वास असून, या शासकीय यंत्रणांनी योग्य समन्वय राखून जनतेची कमीत कमी वेळेत प्राधान्याने कामे करावीत,असे आवाहन हिंगोलीचे मावळते जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केले.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची नुकतीच धुळे येथे बदली झाली असून, जिल्हा प्रशासकीय यंत्रणेच्या वतीने त्यांचा शुक्रवार (दि.16) रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृहात हृदय सत्कार आणि निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी श्री. पापळकर बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी तर प्रमुख पाहूणे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती सुप्रिया पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, सेवा सदनच्या संचालिका श्रीमती मिरा कदम यांची प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थिती होती.
ग्रामीण भागातून येणारा नागरिक, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी हा त्याचे काम होईलच, असा विश्वास ठेवून प्रचंड अपेक्षा घेऊन आलेला असतो. कारण त्याला त्याचा प्रश्न, अडचणी सोडवून घ्यायच्या असतात. मार्गदर्शन हवे असते. त्यामुळे त्याचे म्हणणे ऐकून घेतलेच पाहीजे. सर्वसामान्य नागरिकांचा जिल्हाधिकाऱ्याच्या खुर्चीवर विश्वास आजही कायम आहे. त्यामुळे त्यांच्या संवेदना, व्यथांमधून जिल्ह्यातील नेमकी परिस्थिती माहीत होते, असेही श्री. पापळकर यांनी सांगितले.
आजही सर्वसामान्य नागरिकांचा जिल्हा यंत्रणेवर विश्वास कायम असल्याचे सांगताना प्रशासनात नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांनी काळानुरुप बदलत्या आव्हानांना सोबत घेत जनतेची कामे प्राधान्याने, चांगल्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळेत अधिक कार्यक्षमतने यंत्रणा राबवून ती पूर्ण करावीत, अशा शब्दांत मावळते जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी पदाची खुर्चीवर केवळ काटे, आणि खिळेच असतात असे नव्हे तर ती नवनवीन आव्हानांच्या स्फोटकांनी भरलेली असते. ऐनवेळी कोणती परिस्थिती उद्भवेल हे सांगता येत नाही, असे सांगून त्यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीवर प्रकाश टाकला. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, महसूल उपायुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ते जिल्हाधिकारी पदी असताना आलेले विविध आव्हानात्मक अनुभव त्यांनी सांगितले. मराठवाड्यात काम करताना येथील आव्हानात्मक परिस्थिती, दुष्काळ, महापूर आदींचा सामना करावा लागतो. हिंगोली जिल्ह्यात काम करताना कुरुंदा गावातील सततच्या महापुराच्या आठवणी सांगताना वसमतचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनीही सतत पाठपुरावा केल्याचे सांगत हा प्रश्न कायमचा मार्गी लागल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले. त्याशिवाय जवळा बाजार येथील देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या समस्या, त्यांच्या व्यथा, त्यांच्या अपत्यांचे शिक्षण, आरोग्यविषयक काम, रेशन कार्ड, कपडे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि ती सोडवताना आलेली आव्हाने याचा तपशील त्यांनी सांगितला.
तसेच येथे काम करताना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव, महानाट्य, महासंस्कृती, शासन आपल्या दारी आणि लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आदी कामे केल्याचे नमूद करत, त्यांनी जिल्ह्यात दिव्यांगांसाठी काम करणारी सेवा सदन ही संस्था, त्यांच्या संचालिका श्रीमती मिरा कदम यांच्या कामाचा विशेषत्वाने उल्लेख केला. या संस्थेतून एक मुलगा परिस्थितीशी दोन हात करत आज वैद्यकीय शिक्षण घेण्यास मदत करता आल्याचे समाधान व्यक्त करून यापुढेही ही कामे सुरुच ठेवणार असल्याचे श्री. पापळकर यांनी सांगितले.
प्रशासनातील माणुसकीचा चेहरा सोबत घेऊन चालणारा अधिकारी – खुशालसिंह परदेशी
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे पाहिल्यावर प्रशासनात आजही मानवता आहे, माणुसकी आणि संवदेनशिलता जीवंत आहे. या संवेदनशिलतेमुळे काहींच्या आयुष्यातील अंधार दूर झाला आहे तर अनेकांच्या आयुष्यातील तो अंधार दूर करण्याचे अविरत प्रयत्न जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर करत आहेत. त्यांच्यामुळे प्रशासनात माणुसकी जिवंत असल्याचे पदोपदी जाणवते. त्यामुळे प्रशासनातील माणुसकीचा चेहरा सोबत घेऊन चालणारा अधिकारी अशा शब्दांत प्रभारी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कठीण प्रसंगात यातना सोसल्या. दु:ख सोसले मात्र सोबतच्या अधिकाऱ्याला-कर्मचाऱ्याला आनंदच शेअर केल्याचे सांगत, सोबतच्याला मानवी संवेदना जीवंत ठेवत मार्ग काढला. हीच त्यांची खरी कमाई असल्याचे सांगताना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातील लोकप्रतिनिधींनी केलेल्या आंदोलनाची आठवणही प्रभारी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी यावेळी सांगितली.
प्रशासकीय यंत्रणेत जिल्हाधिकारी पदाच्या खुर्चीला काटेरी खिळे असून, ते फक्त त्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीलाच जाणवतात. असे असले तरीही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी गेल्या तीन वर्षात कित्येक कठीण प्रसंगांना हसतमुखाने तोंड दिले. कधीही त्या प्रसंगाची त्यांनी समोरील व्यक्तीला जाणीव होऊ दिली नसल्याचे सांगत त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा ग्रामीण यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, सेवा सदनच्या संचालिका श्रीमती मिरा कदम यांनीही समायोचित मनोगत व्यक्त केले. तर निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक यांनी प्रास्ताविक आणि तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी आभार मानले.
अश्रू भरल्या नयनांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा घेतला हृदयी सत्कार व निरोप
मावळते जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना त्यांच्या सुविद्य पत्नीसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी हृदयी सत्कार व निरोप दिला. गेल्या तीन वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळात जिल्हाधिकाऱ्यांसोबत काम करताना पालकत्वाच्या भूमिकेतून मार्गदर्शन केल्याचे अनेकांनी सांगितले. तर कधी काही चुकले तरीही कधी रागावले नाहीत तर उलट प्रेमळपणे चूक लक्षात आणून दिल्याचे सांगताना अनेकांचे डोळे पानावले होते.
यावेळी जिल्हाधिकारी व त्यांच्या अर्धांगिनी श्रीमती सुप्रिया पापळकर यांचा फेटा बांधून आणि त्यांच्या दालनापासून ते नियोजन समिती सभागृहापर्यंत गुलाबपाकळ्या अंथरल्या होत्या. शिवाय निरोपाची लक्षवेधक आणि तितकीच आकर्षक रांगोळीही काढण्यात आली होती. यावेळी त्यांच्या दोन्ही कन्या उपस्थित होत्या. यावेळी जिल्हा प्रशासनासोबतच विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी आणि पत्रकार, नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. *****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment