27 August, 2024
कपाशीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन
हिंगोली (जिमाका), दि. 27 : सद्यस्थितीत कपाशीचे पीक पाते, फुले व बोंडे धरण्याच्या अवस्थेत असून काही ठिकाणी रस शोषक किडी प्रामुख्याने तुडतुडे, फुलकिडे तसेच गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कपाशीच्या पिकांमध्ये डोमकळ्या ( पूर्णपणे न उमलेल्या कळ्या) दिसून येत आहेत. अशा डोंमकळ्यामध्ये गुलाबी बोंडअळीच्या दुसऱ्या अवस्थेतील अळ्या असतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनी कपाशी पिकाचे लगेच सर्वेक्षण करुन या रस शोषक किडी तसेच गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना करणे गरजेचे आहे.
रस शोषण करणाऱ्या किडी : मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी इत्यादी.
बोंडअळी : गुलाबी बोंडअळी .
आर्थिक नुकसान पातळी : मावा 15 ते 20 टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे किंवा 10 मावा प्रती पान, तुडतुडे दोन ते तीन पिल्ले प्रती पान, 10 फुलकिडे प्रती पान, पांढरी माशी 8 ते 10 प्रौढ माशा प्रती पान, गुलाबी बोंडअळी 5 ते 10 टक्के कळ्या, फुले, बोंडाचे नुकसान किंवा 8 ते 10 पतंग सापळा सलग तीन दिवस.
एकात्मिक व्यवस्थापन : शेताच्या कडेने तसेच पडीक जमिनीतील किडींच्या पर्यायी वनस्पती नष्ट कराव्यात. शेतीची कोळपणी व खुरपणी करुन शेत तण विरहीत ठेवावे. रस शोषण करणाऱ्या किडी व बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नत्र खताचा संतुलित वापर करावा. पांढऱ्या माशांना आकर्षित करण्यासाठी शेतामध्ये 12 ते 15 पिवळे चिकट सापळे प्रती हेक्टरी लावावेत. मित्र कीटकांचे संवर्धन करावे. रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी लिकॅनीसिलियम (व्हर्टिसिलियम) लिकॅनी 1.15 टक्के, डब्ल्यूपी 50 ग्रॅम या जैविक कीटकनाशकाची प्रती 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी घ्यावी.
गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षणासाठी 4 ते 5 कामगंध सापळे व मोठ्या प्रमाणात नर पतंग पकडण्यासाठी प्रति हेक्टरी 25 सापळे लावावेत. पक्षांना बसण्यासाठी 25 पक्षी थांबे प्रती हेक्टरी लावावेत. त्यामुळे पक्षी त्यावर बसून शेतातील किडी टीपून खातील. प्रादुर्भावग्रस्त व गळलेली पाते, बोंडे जमा करुन नष्ट करावी. गुलाबी बोंडअळीग्रस्त डोमकळ्या तोडून आतील अळीसह नष्ट कराव्यात. गुलाबी बोंडअळीसाठी ट्रायकोग्रामाटायडिया बॅक्ट्री या परोपजीवी गांधील माशीच्या अंड्याचे कार्ड (1.5 लाख अंडी प्रती हेक्टर) पिकावर लावावेत. 5 टक्के लिंबोळी अर्काची किंवा ॲझाडीरॅक्टीन 10 हजार पीपीएम 10 मिली किंवा 1500 पीपीएम 25 मिली किंवा ॲझाडिरॅक्टीन 3 हजार पीपीएम 50 मिली प्रती 10 लिटर पाण्यातून प्रतिबंधात्मक फवारणी करावी. किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतरच लेबल क्लेमनुसार रासायनिक किटकनाशकाचा आलटून पालटून वापर करावा.
वरील कीटकनाशकाचे प्रमाण साध्या पंपासाठी आहे. पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीन पट वापरावेत. शेतात कीटकनाशचे द्रावण करताना व फवारणी करताना चष्मा, हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा. पायरेथ्राईड गटातील किटकनाशकाची (लॅमडा सायहॅलोथ्रीन) फवारणी नोव्हेंबर महिन्याअखेर सुरु करु नये. यामुळे पांढऱ्या माशीचा उद्रेक होऊ शकतो.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकावरील कीड व रोग नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment