05 August, 2024

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेत 1 लाख 79 हजार 114 महिलांचे अर्ज प्राप्त

हिंगोली (जिमाका), दि. 05 : राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 79 हजार 114 पात्र लाभार्थी महिलांनी अर्ज भरले असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. मगर यांनी दिली आहे. जिल्ह्यात दि. 4 ऑगस्ट, 2024 पर्यंत औंढा नागनाथ तालुक्यात 27 हजार 863, वसमत तालुक्यात 48 हजार 570, हिंगोली तालुक्यात 36 हजार 5, कळमनुरी तालुक्यात 34 हजार 967, सेनगाव तालुक्यात 31 हजार 709 असे एकूण 1 79 हजार 114 लाभार्थी महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या प्राप्त अर्जाची छाननी करुन अप्रोल देण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 77 हजार 345 अर्जावर अप्रोल देण्यात आले असून त्याची टक्केवारी 43.18 अशी आहे. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त पात्र महिला लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधून अर्ज भरावेत. "मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण" योजनेंतर्गत महिला लाभार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी www.ladkibahin.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ दि.1 ऑगस्ट पासून सुरु करण्यात आले आहे, ज्या लाभार्थ्यांनी "नारी शक्ती दूत" ॲपवर अर्ज भरले आहेत त्यांना पुन्हा या पोर्टलवर अर्ज भरण्याची गरज नाही. ज्या पात्र इच्छुक महिला लाभार्थांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत त्यांनी www.ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज भरावेत, असे आवाहनही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. मगर यांनी केले आहे. *******

No comments: