03 August, 2024

शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांचा लाभ ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक-युवतींनी घ्यावा- अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी

• तालुकानिहाय आयोजित विशेष शिबिरामध्ये मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची दिली माहिती हिंगोली (जिमाका), दि. 03 : राज्य शासनाने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या व अशा अनेक महत्वाकांक्षी योजना सुरु केलेल्या आहेत. या सर्व योजनेचा लाभ जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक-युवतींनी घ्यावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले. महसूल पंधरवाड्याच्या निमित्ताने येथील आदर्श महाविद्यालयात आज मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांना व्हावा यासाठी आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास आघाव यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी उपस्थित होते. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यादव गायकवाड, तहसीलदार नवनाथ वगवाड, आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास आघाव उपस्थित होते. पुढे बोलताना श्री. परदेशी म्हणाले, सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थ स्थळांना जाऊन मन:शांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची, दर्शनाची संधी देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु केली आहे. या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे तातडीने उपलब्ध व्हावीत व त्याची माहिती होण्यासाठी हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यासह शासनाच्या अनेक महत्वपूर्ण योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा उद्देश विशद करुन योजनेची माहिती दिली. यावेळी समाज कल्याण कार्यालयाचे सिध्दार्थ गोवंदे, नागनाथ नकाते, सुनिल वडकुते, प्रा. जी. पी. चव्हाण, सुलोचना ढोने, वर्षा घुगे, नितिन राठोड, विजय सोनटक्के, विनोद कागने, विश्वनाथ बिहाडे, नितीन खरात, निलेश सुदुलवार यांच्यासह नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज येथील आदर्श महाविद्यालयासह जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणीही महसूल पंधरवाड्यानिमित्त विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करुन मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची माहिती देण्यात आली. या शिबिरामध्ये हिंगोली जिल्ह्यातील 1237 नागरिक, लाभार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये हिंगोली 308, कळमनुरी 181, वसमत 273, औंढा नागनाथ 197, सेनगाव तालुक्यातील 278 जणांचा समावेश आहे. *******

No comments: