28 August, 2024
मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना जिल्ह्यातील शेतक-यांचे अंदाजे 46 कोटी रुपये होणार वीजबील माफ
हिंगोली (जिमाका), दि. 28 : मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना लागू करण्यात आली असून, जिल्ह्यातील कृषि पंप ग्राहकांचे अंदाजे 46 कोटी रुपयांचे वीज बील माफ करण्यात येणार आहे.
हिंगोली मंडळांतर्गत हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि सेनगाव अशा एकूण पाच तालुक्याचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यात महावितरणमध्ये 30 जून, 2024 अखेर 7.5 एचपी पर्यंत 76 हजार 566 एवढे कृषीपंप ग्राहक आहेत. यामध्ये औंढा नागनाथ तालुक्यातील 12 हजार 359, वसमत तालुक्यातील 21 हजार 292, हिंगोली 12 हजार 720, कळमनुरी 14 हजार 201 आणि सेनगाव तालुक्यातील 15 हजार 994 कृषि पंपाचा समावेश आहे.
वरील सर्व 7.5 एचपीपर्यंत कृषीपंप ग्राहकांना महावितरण कंपनीकडून दर तीन महिन्याला वीज बिल देण्यात येतात. वर्ष 2023-2024 मध्ये 7.5 एचपी पर्यंत कृषी पंप ग्राहकांना देण्यात आलेल्या वीज देयकाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील 12 हजार 359 कृषि पंप ग्राहकांचे 24.74 कोटी रुपये, वसमत तालुक्यातील 21 हजार 292 कृषि पंप ग्राहकांचे 48.16 कोटी रुपये, हिंगोली तालुक्यातील 12 हजार 720 कृषि पंप ग्राहकाचे 27.76 कोटी रुपये, कळमनुरी तालुक्यातील 14 हजार 201 कृषि पंप ग्राहकांचे 36.58 कोटी रुपये आणि सेनगाव तालुक्यातील 15 हजार 994 कृषि पंप ग्राहकांचे 34.08 कोटी असे एकूण जिल्ह्यातील 76 हजार 566 कृषि पंप ग्राहकांचे 171.32 कोटी रुपये आहे.
राज्य शासनाच्या दि. 25 जुलै, 2024 च्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना-2024 राबविण्यात येत आहे. त्यानुसार 7.5 अश्वशक्तीपर्यंत शेतकऱ्यांच्या कृषि पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरविले आहे. ही योजना एप्रिल, 2024 ते मार्च, 2029 या 5 वर्षासाठी राबविण्यास मान्यता दिली आहे.
या योजनेंतर्गत माहे एप्रिल ते जून, 2024 पर्यंत हिंगोली जिल्ह्यातील 7.5 एचपीपर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांचे अंदाजे 46 कोटी माफ करण्यात येणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता, महावितरण मंडळ, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment