03 August, 2024

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशक्षिण योजनेचा अधिकाधिक युवकांनी लाभ घ्यावा- अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी

• मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत निवड झालेल्या 8 उमेदवारांना अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचे वाटप हिंगोली (जिमाका), दि. 03 : राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली आहे. याचा अधिकाधिक तरुण युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले. महसुल पंधरवाड्याच्या निमित्ताने येथील शिवाजी महाविद्यालयात दि. 2 ऑगस्ट, 2024 रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते अध्यक्षपदावरुन बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे, सांख्यिकी उपसंचालक एस. एम. रचावाड, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवाजी पवार, प्राचार्य क्षीरसागर, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त रा. म. कोल्हे उपस्थित होते. पुढे बोलताना श्री. परदेशी म्हणाले, पूर्वी या विभागाचे नाव सेवायोजन कार्यालय होते ते आता कौशल्य विकास करण्यात आले. पूर्वी नोकरीसाठी या कार्यालयामध्ये जावे लागत होते. परंतू आज सदरचे कार्यालयच आपल्यापर्यंत पोहचत असल्यामुळे ही फार मोठी संधी निर्माण झाली असून, या संधीचा बेरोजगार युवक-युवतींनी सोने करावे आणि जास्तीत जास्त युवक-युवतींपर्यंत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची माहिती पोहचवावी, असे आवाहन केले. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी समाधान घुटूकडे, सांख्यिकी उपसंचालक एस. एम. रचावाड, शिवाजी पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहायक आयुक्त राजपाल कोल्हे यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा उद्देश स्पष्ट केला. या योजनेमुळे बेरोजगार युवकांना शासकीय तसेच खाजगी कार्यालयातील कामाचा अनुभव प्राप्त होणार असून, यामुळे त्यांच्यातील कौशल्य विकसित होण्यास व भविष्यामध्ये रोजगार मिळविण्यास मोठी मदत होणार आहे. त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत विविध शासयकीय व खाजगी आस्थापनांवर एकुण 2 हजार पदे भरावयाची आहेत. यामध्ये शासकीय कार्यालयांमध्ये जवळपास 700 पदे भरावयाची आहेत, अशी माहिती दिली. या मार्गदर्शन शिबिरात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणांतर्गत शासकीय व खाजगी आस्थापनावर निवड झालेल्या 8 उमेदवारांना अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या हस्ते निवडपत्रांचे वाटप करण्यात आले. यामध्ये सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामध्ये एक, विद्युत निरीक्षक कार्यालयामध्ये एक, जिल्हा सांख्यिकी कार्यालयामध्ये एक, शिवाजी महाविद्यालयामध्ये एक तर आत्मनिर्भर फॅसेलिटी मॅनेजमेंट प्रा.लि. येथे चार उमेदवारांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या उमेदवारांना या योजने अंतर्गत शैक्षणिक पात्रतेनुसार अनुक्रमे 6 हजार रुपये, 8 हजार रुपये आणि 10 हजार रुपये अशाप्रकारे विद्यावेतन महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणार आहे. ***

No comments: