14 August, 2024

‘घरोघरी तिरंगा-२०२४’ अभियानात सहभागी व्हा - जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी हिंगोली, दि.१४ (जिमाका): जिल्ह्यात ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा (हर घर तिरंगा) हे अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत असून, प्रत्येक घरावर तसेच सर्व आस्थापनांवर या कालावधीत तिरंगा फडकवावा. त्यासाठी जिल्ह्यातील सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले आहे. हे अभियान राबविताना सांस्कृतिक कार्य विभाग हा राज्यस्तरावर मुख्य समन्वयक असून, ग्राम विकास विभाग हा ग्रामीण क्षेत्रासाठी तर नगर विकास विभाग हा शहरी भागासाठी समन्वयक राहणार आहे. तर माहिती व जनसंपर्क विभागामार्फत या अभियानाची व्यापक प्रसिद्धी करण्यात येणार आहे. ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानात तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा रन, तिरंगा प्रतिज्ञा, सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनव्हॉस, तिरंगा ट्रिब्युट, तिरंगा मेळा, तिरंगा सेल्फी अशा विविध माध्यमातून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, त्यामुळे जिल्हा प्रशासकीय यंत्रणांनी जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. परदेशी यांनी दिले. शुक्रवार दि. ९ ऑगस्टपासून या अभियानाची सुरुवात झाली असून, यामध्ये तिरंगा यात्रेचे आयोजन करून नागरिकांनी सहभागी व्हावे तसेच तिरंगा रॅली उपक्रमांमध्ये मोटारसायकल रॅली काढावी. तिरंगा प्रतिज्ञा या उपक्रमामध्ये सर्वांना शासकीय कार्यालयांच्या सभागृहांमध्ये एकत्रित येत प्रतिज्ञा घ्यावी. त्याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून नागरिकांमध्ये तिरंगाबाबत जनजागृती करण्याचे निर्देश देत, तिरंगा कॅन्व्हॉसमध्ये विविध स्तरावर जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांना त्यांच्या घरी तिरंगा फडकवावा. राष्ट्र उभारणीसाठी प्रत्येक नागरिकाच्या समर्पणाचे आणि राष्ट्रध्वजाशी संबंधित वैयक्तिक संलग्नतेचे प्रतीक म्हणून हे अभियान कार्य सुरु आहे. हर घर तिरंगा अभियानांतर्गत प्रत्येक घरात तिरंगा ध्वज फडकवला जाणार असून, या मोहिमेसाठी प्रत्येक नागरिकाने स्वयंस्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी श्री. परदेशी यांनी सांगितले. याशिवाय दि. 14 आणि 15 ऑगस्ट रोजी घरोघरी तिरंगा फडकवून त्यासोबत सेल्फी काढत केंद्र शासनाच्या www.harghartiranga.com संकेतस्थळावर अपलोड करायचा आहे. तिरंगा ट्रिब्यूट हा उपक्रम राबवून वीर माता, वीर पत्नी, वीर विधवा, वीर पिता यांचा दि. 15 ऑगस्ट रोजी कार्यक्रमात सत्कार करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी सांगितले. *****

No comments: