19 August, 2024
जर्मनीच्या क्षितिजावर मराठी युवकांना रोजगाराच्या संधी • युवकांना जर्मन भाषा शिकण्याची सुवर्णसंधी
हिंगोली, दि. 19 (जिमाका): महाराष्ट्र राज्यातील युवकांना युरोपियन देशांमध्ये नोकरी व रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने जर्मनीतील बाडेन बुटेनबर्ग या राज्याशी कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करून उपलब्ध करून देण्याबाबत नुकताच सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे जर्मन भाषा शिकण्यासोबतच जर्मनीमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होत आहे. या सुवर्णसंधीचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त युवक-युवतीने घेण्याचे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. दीपक साबळे यांनी केले आहे.
या कामकाजाची दिशा ठरविण्यासाठी दि. 11 जुलै, 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, या अनुषंगाने जर्मन भाषा शिकविण्यासाठी ग्योथे इन्स्टिट्यूट, मॅक्सम्युलर भवन, पुणे व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. यानुसार महाराष्ट्र राज्य व जर्मनीचे वाटेन-बूटेनवर्ग राज्य यांच्यामधील सामंजस्य करारानुसार जिल्हा स्तरावर शिक्षक व कुशल युवकांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात येणार आहेत.
देशातील ही पहिली आणि ऐतिहासिक योजना असून, राज्यातील कुशल-अकुशल बेरोजगार युवक-युवतींना जर्मनी येथे रोजगारासाठी अधिकृतरित्या पाठविण्यासाठीची राज्य शासनाची योजना आहे. युवक-युवतींना आपल्याच जिल्ह्यात मोफत्त व जवळच जर्मन भाषेचे प्रशिक्षण मिळणार आहे. तसेच आवश्यक कौशल्य सुधारणेचे निवासी आणि मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
जर्मनी येथे नोकरी मिळवण्यासाठी महाराष्ट्रातच निवड प्रक्रिया व नोकरीच्या नियुक्तीचे वाटप, व्हिसा आणि पासपोर्टसाठी संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जर्मनी येथील सुरुवातीच्या काळातील आवश्यक मदतही महाराष्ट्र शासन करणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी सहभागी होऊन कौशल्य विकसित करून राज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकवता येणार आहे. रोजगाराच्या संधीतून स्वतः, कुटुंब आणि समाजाची प्रगती करण्याची ही संधी शासनाने उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये आरोग्य सेवांमधील तंत्रज्ञ, परिचारिका (रुग्णालय), वैद्यकीय सहाय्यक (एमएफए), प्रयोगशाळा, रेडियोलॉजी, दंतशल्य सहाय्यक, आजारी व वृद्ध व्यक्तींसाठी शुश्रूषा सेवक, फिजिओथेरपीस्ट, दस्तऐवजीकरण आणि संकेतीकरण, तृतीय पक्ष प्रशासन, लेखा व प्रशासन, आतिथ्य सेवांमधील तंत्रज्ञ, वेटर्स / सर्व्हर्स, स्वागत कक्ष संचालक, रिसेप्शनिस्ट आचारी, हॉटेल व्यवस्थापक, लेखापाल, हाऊसकीपर, क्लीनर, स्थापत्य सेवांमधील तंत्रज्ञ, विद्युततंत्री (इलेक्ट्रीशियन), नविनीकरण उर्जेमधील विशेष विद्युततंत्री (रिन्यूएबल एनर्जी, सोलर इ.), औष्णिक विजतंत्री (हिटिंग तंत्रज्ञ), रंगारी, सुतार, वीट, फरशीकरिता गवंडी, प्लंबर्स, नळ जोडारी, वाहनांची दुरुस्ती करणारे (हलकी व जड वाहने), विविध तंत्रज्ञ, वाहन चालक (बस, ट्राम, ट्रेन, ट्रक), सुरक्षा रक्षक टपाल सेवा वितरक, सामान बांधणी व वाहतूक करणारे (पॅकर्स व मुव्हर्स), विमानतळावरील सहाय्यक, स्वच्छताकर्मी, सामान हाताळणारे, हाऊसकीपर विक्री सहाय्यक गोदाम सहाय्यक पदांचा यामध्ये समावेश आहे. जर्मन भाषा शिकण्याबाबतच्या अधिक माहितीसाठी आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी क्यू आर कोड स्कॅन करून https://maa.ac.in/GermanyEmployme. या योजनेत सहभागी होता येणार आहे, असे प्राचार्य डॉ. साबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment