27 February, 2017

जिल्हास्तरीय क्रीडा शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
हिंगोली,दि.27: कळमनुरी तालुक्यातील उमरा येथे जयभवानी विद्यालयात दि. 18 ते 27 फेब्रुवारी, 2017 या कालावधीपर्यंत चाललेल्या जिल्हास्तरीय क्रीडा शिक्षक प्रशिक्षणाचा समारोप संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार हे होते तर प्रमुख पाहुने म्हणून शिवछत्रपती क्रीडा प्राप्त डॉ. बंकट यादव, जयभवानी विद्यालयाचे अध्यक्ष चंद्रकांत निरगुडे, मुख्याध्यापिका सौ. सविता निरगुडे, क्रीडा अधिकारी किशोर पाठक, क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, क्रीडा अधिकारी संतोष फुफाटे, अनंत जाधव उपस्थित होते.
सदरील 10 दिवस झालेल्या प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले तत्पुर्वी श्री. पाठक यांनी प्रास्ताविक केले. सर्व मान्यवरांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले.
बंकट यादव यांनी खऱ्या अर्थाने क्रीडा शिक्षक हा नेहमी मैदानात व खेळाडूच्या सहवासात असावा व काळानुरूप स्वत: मध्ये बदल करावा. श्री. निरगुडे यांनी ही विद्यार्थी म्हणजे कच्चा माल आहे याला परिपक्व करण्याची संधी आपल्या हाती आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी आपल्या समारोपीय मार्गदर्शनातून शाळेतील क्रीडा शिक्षक हा शाळेचा कणा आहे, असे नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंत काळे यांनी केले तर आभार क्रीडा अधिकारी संजय बेतीवार यांनी केले.

*****
जलयुक्त शिवार अभियानातील कामे तात्काळ पूर्ण करावीत  
                --- जिल्हाधिकारी अनिल भंडारी  
हिंगोली,दि.28:- गाव आरखडे तयार करुन देण्यात यावेत. तसेच कार्यालय प्रमुखांनी शिवार फेरीचे दोन दिवसात कार्यक्रम घेण्यात यावेत. तसेच जलयुक्त शिवार अभियानातील कामे तात्काळ पूर्ण करावीत, असे जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांनी निर्देश दिले.
सर्वांसाठी पाणी टंचाई मुक्त महाराष्ट्र -2019 जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन 2015-2016 व 2016-2017 मधील गावाबाबत व तसेच 2017-2018 च्या नियोजबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी कळमनुरी सहाय्यक जिल्हाधिकारी अमोल येडगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एन. देशमुख, उपजिल्हाधिकारी (रोहयो) के. ए. तडवी, वसमत उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाड, जिल्हा वन अधिकारी केशव वाबळे, कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पु) एस.आर. भागानगरे, भुजल सर्वेखण विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक सी. डी. चव्हाण, कृषि विज्ञान केंद्रांचे प्रमुख डॉ. पी.पी. शेळके, उगम ग्रा.वि.सं. अध्यक्ष जयाजी पाईकराव, जिल्ह्यातील सर्व  तालुका कृषि अधिकारी , अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी आदि विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थिती होती.

****   




22 February, 2017

मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार

हिंगोली,दि.22:- श्री. वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून, त्यांनी मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेबद्दल गौरव म्हणून श्री. वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रत यांचा दिनांक 27 फेब्रुवारी हा जन्मदिन " मराठी भाषा गौरव दिन " म्हणून साजरा करण्याच्या मराठी भाषा विभागाच्यावतीने दिनांक 21 जानेवारी, 2017 च्या शासन निर्णयान्वये सुचित केले आहे. राज्यातील सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालय प्रमुख यांनी सोमवार, दिनांक 27 फेब्रुवारी, 2017 रोजी पुढील विविध उपक्रम आयोजित करुन " मराठी भाषा गौरव दिन " सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या वर्षासाठी  " संगणक व महाजालावरील मराठी  " या संकल्पनेवर भर देण्यात येत असून  यावर्षी उपक्रमांची सूची पुढील प्रमाणे राहील.

मातृभाषेची महती आणि माहिती , तसेच मातृभाषेचे व्यक्तिगत व समाजजीवनातील स्थान आणि मातृभाषचे मानसशास्त्रीय व शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने महत्व या विषयावर विचारमंथनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. सकस साहित्याची, नव्या माहितीची, आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाची मराठीतील पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतून राज्यभर ग्रंथप्रदर्शन / ग्रंथोत्सव / ग्रंथदिंडी आयोजित करणे, शाळा / महाविद्यालय / शासकीय व निमशासकीय कार्यालये / खाजगी संस्थांमध्ये विविध स्तरांवर मराठी भाषा , साहित्य आणि संस्कृतीविषयक विविध प्रकारच्या स्पर्धा ( निबंध, वक्तृत्व इ.) आयोजित करणे. न्यायव्यवहार, शासन प्रशासन, प्रसार माध्यमे, केंद्र तथा राज्य शासनाची कार्यालये, इतर अशासकीय कार्यालये इत्यादी ठिकाणी होणारा मराठी भाषेचा वापर याबाबत व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा सादरकरणे यांचे आयोजन , मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शासनाच्या विविध उपक्रमांना प्रसिध्दी देणे, आकाशवाणी व दुरदर्शनवरुन सादर करण्यात येत असलेल्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये मराठी भाषा विषयक मान्यवरांच्या मुलाखती, परिसंवाद आयोजित करणे, मराठी भाषा / साहित्य/ कोश वाड्:मय या विषयावर व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा यांचे आयोजन तसेच तज्ज्ञ, विचारवंत व साहित्यिकांच्या मुलाखतींचे आयोजन, प्रसारमाध्यमे तसेच प्रशासनात मराठी भाषेचा वापर याबाबत व्याख्याने , चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा सादरीकरणे यांचे आयोजन, युनिकोडप्रणित मराठी आणि इन्स्क्रिप्ट मराठी कळफलक संबंधित विषयावरील प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन. समाजप्रसार माध्यमांतील (सोशल मीडिया) मराठी, माहिती तंत्रज्ञान व मराठी महाजालावरील (इंटरनेट) मराठी या क्षेत्रांतील तज्ज्ञांची व्याख्याने सादरीकरणे यांचे आयोजन . कुसुमाग्रज व इतर सुप्रसिध्द थोर मराठी साहित्यिकांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रमांचे आयोजन. कुसुमाग्रज व इतर सुप्रसिध्द थोर मराठी साहित्यिकांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रमांचे आयोजन. दिवंगत साहित्यिकांच्या जन्मगावी /कर्मभुी ( उदा: नाशिक-कुसुमाग्रज, मालगुंड-कवी केशवसुत, खोपोली र. वा. दिघे) येथे शाळांच्या / ग्रंथालयांच्या मदतीने शाळा/ ग्रंथालय/वाचनालय येथे स्थानिक शिक्षण संस्था / महाविद्यालये यांच्यामार्फत दिवंगत साहित्यिकांचे स्मरण करुन त्यांच्या गौरवार्थ कार्यक्रमांचे आयोजन , बोली भाषावरील कार्यक्रमांचे आयोजन ( व्याख्याने , चर्चासत्रे, सादरीकरणे…इ.) शब्दभंडार आणि नवीन पर्यायी शब्दनिर्मिती याबाबतच्या स्पर्धा, म्हणी , वाक् प्रचार, प्राचीन शब्द यांची व्युत्पत्ती या विषयांवर रंजक व्याख्याने / सादरीकरणे, मराठी सुलेखन, सुंदर मराठी हस्ताक्षर स्पर्धा व संबंधित कार्यशाळांचे आयोजन , मराठी कविता, प्रसिध्द उतारे , मराठी भाषा विषयक घोषवाक्ये यांचे भित्तीचित्र प्रदर्शन किंवा स्पर्धांचे आयोजन, मोडी लिपीचे प्रशिक्षण, व्याख्यान किंवा परिसंवादाचे आयोजन, मराठी भाषंच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या नि:स्पृह व्यक्ती व त्यांनी निर्माण केलेल्या संस्थांना किंवा प्रकल्पांना भेट देणे.
यात सर्व मंत्रालयीन विभाग, विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपआपल्या विभागातील कार्यक्षेत्रातील संबंधितांचे सहकार्य घेवून हा सोहळा पार पाडण्यात येणार असल्याचे मराठी भाषा विभागाने शासन परिपत्रकान्वये कळविले आहे.
**** 

21 February, 2017

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत प्रवेश
हिंगोली,दि.21: हिंगोली जिल्ह्यातील नांमाकित निवासी शाळा प्रवेशासाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या दोन जिल्ह्यातील परभणी व हिंगोली सर्व अनुसूचित जमातीच्या पालकांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शांळांमध्ये सन 2017-2018 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली वर्गांकरिता प्रवेश देण्यात येत आहे. खालील प्रमाणे अटी व शर्तीची पुर्तता करणाऱ्यांना सदर शाळेत प्रवेश देण्यात येणार आहेत.  
याकरीता पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र एक लाखापेक्षा कमी असावे, पालक शासकीय नौकरीत नसल्याचे प्रमाणपत्र, पालकांचे जातीचे प्रमाणपत्र,  जन्माचा दाखला / शाळा शिकत असल्याचा दाखला, वैद्यकीय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वरील सर्व बाबींची पुर्तता करणाऱ्या विद्यार्थ्यास सदर निवासी शाळेत प्रवेश मिळणार आहे. वरील कागदपत्रं चुकीचे अढळून आल्यास पालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी. तसेच कोणत्याही पालकांनी किंवा शाळांनी परस्पर विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेशित करु नये. तसे केल्यास सदर विद्यार्थ्यांची संपूर्ण जबाबदारी शाळेची राहील असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकस प्रकल्प कळमनुरी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
*****


19 February, 2017

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन
हिंगोली, दि. 19 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी  यांची उपस्थिती होती.         

*****

18 February, 2017


प्रधान सचिव शाम तागडे यांनी घेतला अल्पसंख्यांक योजनांचा आढावा
हिंगोली,दि.18:- हिंगोली दि. १८: महाराष्‍ट्र शासन अल्‍पसंख्‍यांक आयोगाचे प्रधान सचिव शाम तागडे यांनी आज येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयातील सभाग़हात जिल्‍हयामध्‍ये अल्‍पसंख्‍याक विभागाचया राबविण्‍यात येणा-या विविध योजनांचा आढावा घेतला.
यावेळी यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, सहाय्यक जिल्हाधिकारी अमोल येडगे,  जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे नईम कुरुशी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वच्छता व पाणी पुरवठा श्रीमती दिपाली कोतवाल, हिंगोली तहसीलदार विजय अवधाने, कळमनुरी तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे, वसमत तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे, औंढा नागनाथ तहसीलदार शाम मदनुरकर, शिक्षणाधिकारी (माध्य) दिपक चवणे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी द. रा. आव्हाड तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.  

****

17 February, 2017

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी
जिल्ह्यात 73.77 टक्के मतदान

हिंगोली, दि.17: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जिल्ह्यात सरासरी 73.77 टक्के इतके मतदान झाले. दि. 16 फेब्रुवारी, 2017 रोजी पार पडलेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी जिल्हा निवडणूक विभागाने दिली आहे. जिल्ह्यात 3 लाख 78 हजार 190 पुरुष मतदार तर 3 लाख 37 हजार 555 स्त्री मतदार असे एकुण 7 लाख 15 हजार 745 मतदार आहेत. यापैकी 2 लाख 80 हजार 787 पुरुष मतदार आणि  2 लाख 47 हजार 191 स्त्री मतदार असे एकूण 5 लाख 27 हजार 978 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण 73.77 टक्के मतदान झाले.
जिल्हा परिषद / पंचायत समिती निवडणूकीची मतमोजणी गुरुवार दि. 23 फेब्रुवारी, 2017 रोजी संबंधीत तालुक्यांच्या ठिकाणी होणार आहे.

*****