28 October, 2021

 

जिल्ह्यातील सर्व कार्यालयांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक

मास्क न वापरणाऱ्या अभ्यागत, कर्मचारी, अधिकारी यांना कार्यालय प्रमुखांनी दंड आकारावे

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश

 

      हिंगोली (जिमाका) दि. 28 : शासन व जिल्हास्तरावरुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या सर्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक करणे तसेच कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने पूर्ण करण्यासाठी  जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष  बाबत जितेंद्र पापळकर यांनी पुढीलप्रमाणे आदेश व सूचना निर्गमित केले आहेत.

जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये व खाजगी आस्थापनांमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी तसेच कार्यालयात कामकाजास्तव येणाऱ्या सर्व अभ्यागतांनाही कार्यालय व कार्यालयाच्या आवारात नाक व तोंड पूर्णतः झाकले जाईल अशा पद्धतीने मास्क वापरणे बंधनकारक राहील.

जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये व खाजगी आस्थापनांमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झाल्याची खातरजमा संबंधित कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख, आस्थापना प्रमुख यांनी करावी व कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाल्याचे अंतिम प्रमाणपत्र संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून प्राप्त करून घ्यावे. ज्या कर्मचाऱ्यांचे लसीकरणासाठी काही अडचण असल्यास नजीकच्या लसीकरण केंद्रात किंवा सार्वजनिक आरोग्य विभागात संपर्क करुन कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाचे विशेष सत्र आरोग्य विभागाच्या समन्वयाने आयोजित करावे, जेणेकरून सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण होईल याची खातरजमा करावी.

सर्व प्रकारच्या कार्यालयीन आस्थापनांनी दैनंदिन कामकाजादरम्यान मास्कचा सुयोग्य वापर तसेच लसीकरण पूर्ण करुन घेणे, यावर देखरेख करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख हे आस्थापना अधिकारी किंवा एका अधिकाऱ्याला नामनिर्देशित करतील.

सर्व कार्यालये व कार्यालयाच्या आवारात अभ्यागतांसह मास्कचा वापर अनिवार्य करण्यात येत असल्याने विनामास्क वावरणाऱ्या अभ्यागत, कर्मचारी, अधिकारी यांना संबंधित अभ्यागत, कर्मचारी, अधिकारी ज्या विभागाच्या क्षेत्रात, आवारात विनामास्क आढळला त्या कार्यालयाच्या नामनिर्देशित अधिकारी (कार्यालय प्रमुखाने नामनिर्देशित केलेला अधिकारी) दंड करण्यास सक्षम प्राधिकारी राहील.

असे सक्षम प्राधिकारी विनामास्क आढळणाऱ्या अभ्यागत, कर्मचारी, अधिकाऱ्यांना दंड आकारणी करुन त्याबाबतची पावती देईल. सक्षम प्राधिकारी, विभाग प्रमुख, आस्थापना प्रमुख सदर दंडाची रक्कम संबंधित कार्यालयाच्या आहरण व संवितरण अधिकाऱ्याकडे जमा करेल व आहरण व संवितरण अधिकारी सदर दंडाची रक्कम खाली नमूद केलेल्या लेखाशीर्षा खाली असलेल्या जमा सांकेतांकाखाली भरणा करेल.

मराठी

English

महसूल जमा

(सी) इतर कराव्यतिरिक्त महसूल

(एक) सर्वसाधारण सेवा

००७०-इतर प्रशासनिक सेवा

८०० इतर जमा रक्कम

Revenue Receipt

(c) Other non-Tax Revenue

(1) General services

0070-Other Administrative Services

800 Other Receipts

यानुसार वरीलप्रमाणे निर्गमित केलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी व औद्योगिक आस्थापना येथील प्रमुखांची असेल, असेही आदेशात नमूद केले आहे.

*****

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू

                                                                                          जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू

हिंगोली (जिमाका), दि. 10 : जिल्ह्यात कोरोना (कोविड-19) या विषाणूचा प्रादूर्भाव, संसर्ग होत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यात बंदोबस्त चालू आहे. तसेच दि. 10 व 11 नोव्हेंबर , 2021 रोजी माहेन भागवत, सरसंघचालक (आरएसएस) यांचा दौरा आहे. दि. 14 नोव्हेंबर , 2021 रोजी प्रबोधिनी स्मार्त एकादशी , दि.19 नोव्हेंबर, 2021 रोजी गुरुनानक जयंती आहे.

 तसेच नागरिकांच्या वतीने, विविध संघटना, पक्ष यांच्यातर्फे त्यांच्या मागण्यासाठी मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे करीत असतात. अशा विविध घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रकारचे प्रश्न हाताळण्यासाठी तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दिनांक 10 नोव्हेंबर, 2021 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 24 नोव्हेंबर 2021 रोजीचे 24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी  आदेश काढले आहेत.

            त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे, अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणून बुजून दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात आले आहे. हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 

                 


 

अटल बांधकाम कामगार आवास योजनेतील घरकुलाच्या प्रस्तावातील त्रुटीसाठी

अर्जदारांनी पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा

हिंगोली (जिमाका), दि.28 : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम मंडळ, मुंबई अंतर्गत हिंगोली येथील सरकारी कामगार अधिकारी यांच्या कार्यालयात नोंदणीकृत असलेले बांधकाम कामगार यांनी अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुलाचे प्रस्ताव सरकारी कामगार अधिकारी, हिंगोली यांच्याकडे सादर केले होते. हे सर्व प्रस्ताव जिल्ह्यातील त्या-त्या तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयाकडे पाठविण्यात आलेले आहेत. बांधकाम कामगार अर्जदारांनी सादर केलेल्या प्रस्तावात असलेल्या त्रुटीची पूर्तता करण्यासाठी त्या-त्या पंचायत समिती स्तरावर संपर्क साधावा.

तसेच नवीन प्रस्ताव सुध्दा पंचायत समिती स्तरावरच सादर करण्यात यावेत, असे आवाहन टी. ई. कराड, सरकारी कामगार अधिकारी तथा सदस्य सचिव, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई जिल्हा हिंगोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

*****


27 October, 2021

 



स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची स्वच्छता

प्लास्टीक मुक्तीसाठी जनजागृती

 

हिंगोली (जिमाका), दि.27 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हा युवा कार्य व क्रीडा मंत्रालय भारत सरकार आणि जायंटस वेलफेअर ग्रुप, हरी ओम योग ग्रुप, योग विद्याधाम ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा व प्लास्टीक एकत्र करुन नगर परिषदेच्या घंटागाडीमध्ये टाकून परिसर स्वच्छ करण्यात आला.

यावेळी नेहरु युवा केंद्राचे अधिकारी आशिष पंत व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्लास्टीकचे गंभीर परिणाम या विषयावर मार्गदर्शन व जनजागृती केली.

याप्रसंगी डॉ. संजय नाकाडे, गोविंद झुनझुनवाला, डॉ. सूर्यकिरण, डॉ.कुमावत, डॉ. श्रीधर कंदी, रत्नाकर महाजन, संजय भन्साळी, संजय उहान, सुदर्शन महाजन, काशिनाथ दराडे, शिवाजी पद्मने तसेच नेहरु युवा केंद्राचे राष्ट्रीय स्वयंसेवक प्रविण पांडे, संदीप शिंदे, नामदेव फरकंडे व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

*****

26 October, 2021

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही, तर 01 रुग्ण बरा झाल्याने डिस्चार्ज

04 रुग्णांवर उपचार सुरु

 

हिंगोली, (जिमाका) दि. 26 : जिल्ह्यात  कोविड-19 चा नवीन एकही पॉझिटिव्ह रुग्ण  आढळून आलेला नाही, तर 01 रुग्ण बरा झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज घडीला 04 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 50 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 652 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 04 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 394 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

*******

 



कळमनुरी येथे ग्राम बाल संरक्षण समितीच्या सक्षमीकरणासाठी अंगणवाडी सेविका व पोलीस पाटील यांची प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

 

हिंगोली (जिमाका), दि.26 : ग्राम बाल संरक्षण समितीच्या सक्षमीकरणासाठी कळमनुरी येथे नुकतीच दि. 25 ऑक्टोबर, 2021 रोजी एक दिवशीय ग्राम बाल संरक्षण समिती प्रशिक्षण कार्यशाळा दोन सत्रात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय हिंगोली अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत  संपन्न झाली .

            हा प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय कळमनुरी येथील भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम   सभागृह  येथे आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षण कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी कळमनुरी येथील तहसीलदार सुरेखा नांदे ह्या उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) श्री. धापसे, कळमनुरीचे पोलीस उपनिरीक्षक सिद्धिकी,  पोलीस पाटील श्री. धोडबे हे उपस्थित होते.

            या प्रशिक्षणा दरम्यान जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी  ग्राम बाल संरक्षण समितीचे महत्व व कार्यशाळेचा उद्देश या बाबत माहिती दिली तर बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम, 2012 व बाल विवाह प्रतिबंध कायदा 2006 या विषयीची माहिती कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडीत यांनी दिली. चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श बद्दलची माहिती समुपदेशक सचिन पठाडे यांनी दिली. बाल संरक्षण विषयक यंत्रणेची माहिती सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे यांनी दिली. ग्राम बाल संरक्षण समितीचे गठन आणि समिती मधील सदस्य यांची भूमिका या बाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ता रेशमा पठाण यांनी  दिली. ग्राम बाल संरक्षण समितीच्या सदस्यांचे कार्य व जबाबदाऱ्या या बद्दल माहिती  बाल सरंक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण यांनी दिली. बालकांचे हक्क व अधिकार याविषयीची माहिती सामाजिक कार्यकर्ता रेश्मा पठाण यांनी दिली. चित्रफितीचे प्रदर्शन समुपदेशक सचिन पठाडे,  डाटा एंट्री ऑपरेटर राहूल सिरसाट यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडीत यांनी केले तर शेवटी लेखापाल शितल भंडारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सर्व  कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या प्रशिक्षण कार्यशाळेस अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील यांची उपस्थिती होती.

*****

 

25 October, 2021

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही, तर 05 रुग्णांवर उपचार सुरु

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 25 : जिल्ह्यात  कोविड-19 चा नवीन एकही पॉझिटिव्ह रुग्ण  आढळून आलेला नाही, तर 05 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 50 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 651 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 05 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 394 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

*******