03 July, 2023

 

स्वस्तिक आकारात वृक्ष लागवड करावेत

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

 

 

                हिंगोली (जिमाका), दि. 03 : भारत वृक्ष क्राती मोहिमेंतर्गत अकोला वृक्ष क्रांती मिशनचे संस्थापक तथा समाजसेवक ए. एस. नाथन यांनी संपूर्ण भारत देशात 8 हजार कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे. त्याअनुषंगाने  वृक्ष लागवडीचा एक भाग म्हणून स्वस्तिक पॅटर्न हा वृक्षारोपणाचा उपक्रम अकोला जिल्ह्यामध्ये 20 प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने राबविण्यात आला. त्याचप्रमाणे हा उपक्रम लातूर, वाशिम, बुलढाणा व पुणे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात राबविण्यात आलेला आहे. तसेच या उपक्रमामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण झालेले आहे.

            त्याअनुषंगाने सन 2023 च्या पावसाळ्यात हा वृक्षारोपणाचा उपक्रम आपल्या हिंगोली जिल्ह्यात राबवायचा असल्याने हिंगोली जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, सर्व पोलीस स्टेशन, शाळा व महाविद्यालय तसेच ग्रामपंचायतीनी गायरान जमिनीवर स्वस्तिक आकारात वृक्ष लागवड केल्यास मोकळ्या जमिनीचा वापर लोकांना बसण्यास होऊ शकतो. हा पॅटर्न राबविल्यास याचा फायदा मोठ्या प्रमाणात हिंगोली जिल्ह्याला होणार आहे. या उपक्रमांसाठी लागणारी रोपे प्रत्येक तालुक्यात झालेल्या हजर घर नर्सरी उपक्रमातून निर्माण झालेली रोपे वापरण्यात यावी किंवा वन विभाग व सामाजिक वनीकरण विभाग यांच्याकडून उपलब्ध करुन घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. 

*****

 

एक विद्यार्थी-एक वृक्ष उपक्रम राबविण्याचे आवाहन

 

                हिंगोली (जिमाका), दि. 03 : एक विद्यार्थी-एक वृक्ष हा उपक्रम सन 2019 पासून दरवर्षी अकोला पॅटर्न म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. हा उपक्रम हिंगोली जिल्ह्यामध्ये राबविण्यासाठी सविस्तरपणे निर्देश दिले आहेत. हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम यावर्षी सुध्दा हिंगोली जिल्ह्यामध्ये राबविण्यासाठी सर्व शासकीय विभाग व जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते बारावीतील विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संख्येएवढे दरवर्षी वृक्ष जिल्हा प्रशासनामार्फत मोफत पुरविण्यात येत आहेत. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होऊन पर्यावरण संतुलन राखले जाईल. या उपक्रमांबाबत सर्व विभाग प्रमुखांनी खालील मार्गदर्शक सूचनांचा तंतोतंत अवलंब करावा.

            हा उपक्रम दरवर्षी 01 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये राबवायचा असल्याने प्रत्येक वर्षी प्रत्येक विद्यार्थ्यांने एक वृक्ष लावणे आवश्यक आहे. या उपक्रमाबाबतच्या परिपत्रकाची प्रत प्रत्येक शिक्षकास देण्यात यावी व एक प्रत शाळेच्या नोटीस बोर्डावर लावावी. या उपक्रमांबाबत शाळेतील विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक, वर्ग शिक्षकांनी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करावे. सर्व विद्यार्थ्यांनी वृक्ष लावले किवा कसे याबाबतची माहिती घेण्याची जबाबदारी वर्गशिक्षकांकडे असणे अनिवार्य आहे.

            विद्यार्थ्यांनी या उपक्रमात वृक्ष हे फक्त शाळेत लावण्यासाठी सक्ती करु नये. विद्यार्थ्यांस त्यांच्या सोईच्या ठिकाणी जेथे तो वृक्षाचे चांगल्या प्रकारे संगोपन करेल अशा ठिकाणी लावता येईल. विद्यार्थ्यांने लावलेल्या झाडास त्या विद्यार्थ्यांचे नाव देणे तसेच त्यांचा वाढदिवस झाडासोबत साजरा करण्याबाबत प्रेरणा द्यावी. कोणतेही झाड लावण्यासाठी शासनाच्या यंत्रणेमार्फत, प्रयोजकामार्फत किंवा स्वत: घेऊन किंवा बिजाद्वारे तयार करुन प्रत्येक विद्यार्थ्याला झाड लावण्याबाबत सूचित करावेत. विद्यार्थ्यांनी लावलेल्या वृक्षाबाबत दर महिन्याला त्या वृक्षाची स्थिती जाणून घ्यावी. एखादे वृक्ष काही कारणाने सुखल्यास त्या वृक्षाऐवजी दुसरे नवीन वृक्ष लावण्याबाबत त्यांचे प्रबोधन करावे. जे विद्यार्थी वृक्ष लावतील व त्या वृक्षाचे चांगल्या प्रकारे संगोपन करतील, त्या विद्यार्थ्यांना त्यांचे शालेय वर्षात गुणपत्रकात काही गुणांचा समावेश करावा. या उपक्रमात सर्व शिक्षकांनी त्यांच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वृक्ष लावण्याबाबतचा अहवाल सादर करावा. या अहवालामध्ये शाळेचे नाव, विद्यार्थ्यांचे नांव, वृक्षाचे नाव याचा समावेश असावा.

            वरील सर्व सूचनांचे पालन करुन एक विद्यार्थी-एक वृक्ष उपक्रम राबवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यानी केले आहे.

******

 

अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकातील नवउद्योजक लाभार्थ्यांनी

मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

 

                हिंगोली (जिमाका), दि. 03 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 125 वे जयंती वर्ष भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन मोठ्या प्रमाणात साजरे करीत असताना यामध्ये केंद्र शासनाने सन 2015 मध्ये स्टँड अप इंडिया ही योजना घोषित केली आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकातील नव उद्योजक लाभार्थ्यांची मार्जिन मनी भरण्याची क्षमता नसल्यामुळे या नव उद्योजक लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प किंमतीच्या लाभार्थी हिस्‌स्यामधील 15 टक्के मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्याची योजना सुरु केली आहे.

            या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र असलेला अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नव उद्योजक यांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित 15 टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येणार असून लाभार्थ्यांनी खालील अटी व शर्ती पूर्ण करणे आवश्यक आहे.

            या योजनेचा लाभ स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या राज्यातील अनुसूचित जाती तथा नवबौध्द घटकातील सवलतीस पात्र लाभार्थ्यांना देण्यात येईल. संबंधित लाभार्थ्यांचे आयुक्त, समाज कल्याण पुणे यांच्या नावे अनुदानासाठी मागणीपत्र विहित विवरणपत्रात सादर करणे आवश्यक आहे. उद्योग आधार नोंदणी प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. बँकेचे कर्ज मंजुरी पत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड व बँक कर्ज खात्याचे विवरणपत्र आवश्यक आहे.

            हिंगोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नव उद्योजक इच्छूक पात्र व्यक्तींनी विहित नमुन्यात तीन प्रतीत प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली या कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.

*****

 

पीक कर्जाचे निर्धारित लक्ष साध्य करण्यासाठी

शेतकरी बांधवांनी पीक कर्जाचे वेळेवर नुतनीकरण करावेत

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

 

 

                हिंगोली (जिमाका), दि. 03 : खरीप पीक कर्ज वाटपाचे निर्धारित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवीन पीक कर्ज वाटप करणे, विद्यमान पीक कर्ज वाढीसह नुतनीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व बँका गावागावात शिबीरे आयोजित करुन पीक कर्ज वाटपाचे निर्धारित लक्ष साध्य करण्यासाठी शेतकरी बंधूना घरोघरी भेटून वेळेवर पीक कर्ज नुतनीकरण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.

            रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वानुसार अल्प मुदतीच्या पीक कर्जाची परतफेड 365 दिवसांच्या आत किंवा दरवर्षी 30 जून रोजी किंवा त्यापूर्वी केली पाहिजे. पीक कर्जाचे नुतनीकरण केल्यानंतर शेतकरी मार्गदर्शक तत्वानुसार कर्जाच्या रकमेत वाढीस पात्र होतात.

            जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात त्यांना डॉ. पंजाबराव देशमुख योजना आणि केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत प्रत्येकी 3 टक्के व्याज सवलत मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना शून्य व्याजाने कर्ज मिळते. पीक कर्जाचे वेळेवर नुतनीकरण केल्यामुळे शेतकरी बँकांच्या इतर सुविधांचा सुध्दा लाभ घेऊ शकतात. कर्ज चुकते न झाल्यास पीक कर्ज खाती थकीत खाती बनतात व अशा शेतकऱ्यांसाठी बचत खात्यातील व्यवहारावर मर्यादा येतात.

            पीक कर्जाचे निर्धारित लक्ष साध्य करण्यासाठी शेतकरी बांधवांनी पीक कर्जाचे वेळेवर नुतनीकरण करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

*****

 

बदलत्या हवामानाला समजून घेऊन शेती करणे आवश्यक

वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.पी.पी.शेळके

 

 

हिंगोली (जिमाका), दि.03 : मान्सूनच्या पावसाची पाहिजे तशी सुरुवात या वर्षी झाली नाही, अनेक अंदाज चुकले आणि अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची पेरणी सुद्धा अजून झाली नाही. अशा परिस्थितीत आता काय करावे ? असे सर्वाना वाटत आहे. त्यासाठी अनेक हवामान विभागाच्या तज्ञांच्या सोबत चर्चा केली असता असे लक्षात आले आहे. आतापर्यंत आपल्या राज्यात 60 टक्के तुटीचा पास झाला आहे आणि असाच आणखी दोन आठवडे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.  भारतीय हवामान विभागाच्या एक्सटेनडेड रेंजच्या अंदाजानुसार सुद्धा मध्य भारतावर हलका ते मध्यम असाच पास दिसतो आहे. मात्र जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यात पास दिसतो आहे, ही सुद्धा शेतकऱ्यांच्या दृष्टीने जमेची बाब आहे.

                हे वर्ष कमी पावसाचे आहे असे समजून शेतकऱ्यांनी आपले नियोजन करणे गरजेचे आहे. वेळोवेळी पेरणी योग्य पास झाल्यावर शेतकऱ्यांना नियमित कृषी सल्ला देण्यात येईल.  त्यासाठी दररोज दुपारी 12 ते 4 या वेळेत कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ ऑनलाइन पद्धतीने आणि दूरध्वनीवर तसेच प्रत्यक्ष सुद्धा उपलब्ध राहतील. त्यांचा सल्ला घेवून शेतकऱ्यांनी आलेल्या समस्येचे निवारण करुन घ्यावे.

                आपत्कालीन परिस्थितीत म्हणजे ज्या ठिकाणी पास पेरणीयोग्य झालाच नाही तर काय करावे यासंबंधी विद्यापीठाने दिलेली पिके पेरावी.  जसे 1 ते 7 जुलै दरम्यान जवळ जवळ सर्वच  पिके पेरता येतील. 8 जुलै ते 15 जुलै पर्यंत पेरणी करायची वेळ आली तर सोयाबीन, तूर, कापूस, ज्वारी, बाजरी, तीळ आणि सुर्यफुल हि पिके पेरता येतात.  मात्र मुग, उडीद, आणि भुई मुग  पेरु नये. ज्या ठिकाणी 16 जुलै ते 31 जुलै दरम्यान पेरणी करण्याची वेळ आली तर सोयाबीन + तूर ( 4 : 2), सुर्यफुल, बाजरी + तूर ( 3 : 3), एरंडी +धने, एरंडी+तूर या प्रकारची योजना करुन पिके घ्यावी. कापूस, ज्वारी आणि भुईमूग मात्र पेरु नये.

                हळद पिकाची लागवड तशी 15 जून पर्यंतच करायची असते.  मात्र उशीरा लागवड केल्यास उत्पादनात घट येते हे गृहीत धरुन लागवड केली असल्यास हरकत नाही. लागवड करताना योग्य ती बीज प्रक्रिया करावी आणि अशा लागवड केलेल्या हळद पिकास पाण्याचा ताण पडू देवू नये. खताचा बेसल डोस द्यावा, तसेच लागवडीच्या 1-2 दिवसात जमीन ओली असेल तेव्हा उगवण पूर्व तणनाशक अट्राझीन 5 ग्राम प्रती लिटर पाण्यात फवारुन द्यावे. हळदीसाठी कृषी विज्ञान केंद्रात उपलब्ध बायोमिक्स, ट्रायकोडरमा, हळद स्पेशल आणि जीवामृत या निविष्ठांचा वापर करावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ.पी.पी.शेळके यांनी केले आहे. 

*****

 

तलाठी पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी

जिल्हास्तरीय मदत कक्ष स्थापन

अर्ज करण्यास अडचण आल्यास मदत कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन

 

                हिंगोली (जिमाका), दि. 03 : राज्यातील महसूल विभागातील गट-क संवर्गातील तलाठी पदभरतीचे अनुषंगाने महसूल व वन विभागाने तलाठी गट-क या पदांची पदभरती प्रक्रिया राबवून संपूर्ण भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी शासनस्तरावरुन जाहिरात प्रसिध्दीस देण्यात आली आहे.

                तलाठी पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विभागस्तरावर व जिल्हास्तरावर मदत कक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्यासाठी अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांनी सूचना दिलेल्या आहेत.

                त्याअनुषंगाने तलाठी पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय मदत कक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्यात आले आहे. या मदत कक्षात पुढील अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नावे व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.

                1) श्री. दिलीप कच्छवे, निवासी उपजिल्हाधिकारी, हिंगोली (भ्रमणध्वनी 9763783001), कार्यालय दू. क्र. 02456-221450, 2) श्री. अब्दुल बारी सिध्दीकी, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी हिंगोली (भ्रमणध्वनी 9359454840), कार्यालय दू. क्र. 02456-224401, 3) श्री. उमाकांत मोकरे, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, हिंगोली (भ्रमणध्वनी 9970680612) कार्यालय दू.क्र. 02456-221450, 4) श्री. महादेव डाखोरे, महसूल सहायक (भ्रमणध्वनी क्र.9011738828) कार्यालय दू. क्र. 02456-222400.

                तलाठी पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना काही अडचण आल्यास जिल्हास्तरीय मदत कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

*****

 

निदेशक व संगणक ऑपरेटर पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

                हिंगोली (जिमाका), दि. 03 : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बसमतनगर जि. हिंगोली या संस्थेत निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात 11 महिन्यासाठी तासिका तत्वावर निदेशक व संगणक ऑपरेटरची तात्पुरत्या स्वरुपात नेमणूक करण्यात येणार आहे.

यासाठी (1) एम्प्लॉयबिलिटी स्किल निदेशक पदासाठी उमेदवार आयटीआयचा कोर्स पूर्ण करुन सीटीआय पास असणे आवश्यक/डिप्लोमा इन इंजिनियरिंग/कोणत्याही शाखेतील इंजिनियरिंग पदवी असणे आवश्यक आहे. (2) संगणक ऑपरेटर पदासाठी उमेदवार बी.सी.ए. , बी.कॉम पदवीधारक किंवा एम.सी.ए. , एम.कॉम. पदव्युतर असावा तसेच उमेदवार मूळ पात्रता प्राप्त केल्यानंतर संगणकावर काम केल्याचा 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. (3) शिल्पनिदेशक जोडारी व तारतंत्री साठी व्यवसाय पात्रता आय.टी.आय., सीटीआय पास व अनुभव असणे आवश्यक आहे.

                औद्योगिक प्रशिक्षण संस्था वसमत नगर जि. हिंगोली येथील वरील पदे भरण्यासाठी संबंधित उमेदवारांनी मूळ कागदपत्रे घेवून व आपल्या बायोडाटा तयार करुन संस्थेस जमा करावेत व संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य , औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बसमत नगर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****