27 November, 2023

 

सामाजिक न्याय विभागातर्फे संविधान दिन मोठया उत्साहात साजरा

 



                हिंगोली (जिमाका). दि. 27 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभांगाच्या वतीने हिंगोली जिल्ह्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, हिंगोली येथे दिनांक 26 नोव्हेंबर, 2023 रोजी संविधान दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

                भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा येथे  सकाळी 7.00 वाजता पुष्पहार अर्पण करुन संविधानाचे वाचन करण्यात आले. तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा, संविधान कॉर्नर, महात्मा गांधी पुतळा, इंदिरा गांधी पुतळा, अग्रेसन पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथेही राजू एडके, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

                तद्नंतर संविधान दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,हिंगोली येथे सकाळी 10.00 वाजता मुख्य कार्यक्रमाचे अध्यक्ष समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजू एडके हे होते. तर प्रमुख पाहुणे संविधानाचे देणे या मराठी चित्रपटातील कलाकार सुर्यकांत माळगे, किशन खिल्लारे, बाळू खिल्लारे, विस्तार अधिकारी मधुकर राऊत, आत्माराम वागतकर, अशोक इंगोले, नामदेव रवणे, गुलाबराव सापनर आदी उपस्थित होते.

                प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महामानव क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहु महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

                या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजू एडके यांनी केले तर सूत्रसंचालन बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ गोवंदे तर आभार प्रदर्शन नवीन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या गृहपाल सुलोचना ढोणे यांनी केले.

                यावेळी "संविधानच देणं " हा मराठी चित्रपट दाखऊन संविधानाचे महत्व पटवून देण्यात आले. हा चित्रपट पाहण्यासाठी 300 ते 350 जनसमुदाय उपस्थित होता.

                तसेच हिंगोली जिल्हयातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत 08 शासकीय वसतिगृह, 01 शासकीय निवासीशाळा व 20-विजाभज आश्रमशाळा, 17 दिव्यांग शाळा येथे मोठया उत्साहात संविधान दिन साजरा करण्यात आला.

                या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सर्व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.

*******

 

जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन


 

 

            हिंगोली (जिमाका). दि. 27 : भारतीय संविधान दिनानिमित्त दि. 26 नोव्हेंबर, 2023 रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

            यावेळी  उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, नायब तहसीलदार डी. एस. जोशी यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची  उपस्थिती होती.

*****

25 November, 2023

 अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा हिंगोली दौरा

 

हिंगोली (जिमाका), दि. 25 :  राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे रविवार, दि. 26 नोव्हेंबर, 2023 रोजी हिंगोली दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

रविवार, दि. 26 नोव्हेंबर, 2023 रोजी सकाळी 9.45 वाजता श्री गुरुगोविंदसिंगजी विमानतळ नांदेड येथून मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन व राखीव. नंतर रामलीला मैदान हिंगोली येथे आगमन व ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेस उपस्थिती. दुपारी 2.30 वाजता हिंगोली येथून कळमनुरीकडे प्रयाण. 2.45 वाजता कळमनुरी जि. हिंगोली येथे आगमन व राखीव. 3.15 वाजता मोटारीने नांदेडकडे प्रयाण .

******

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा हिंगोली दौरा

 

हिंगोली (जिमाका), दि. 25 :  महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार रविवार, दि. 26 नोव्हेंबर, 2023 रोजी हिंगोली दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

रविवार, दि. 25 नोव्हेंबर, 2023 रोजी सकाळी 6.30 वाजता कमलाई निवास नागपूर येथून हिंगोलीकडे प्रयाण करुन सकाळी 10.20 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन व राखीव. सकाळी 11.00 वाजता सकल ओबीसी समाज हिंगोली, यवतमाळ, नांदेड जिल्हाद्वारा आयोजित ओबीसी एल्गार महामेळावा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2.00 वाजता हिंगोली येथून उमरेड जि. नागपूरकडे प्रयाण .

******           


24 November, 2023

 ओबीसी एल्गार महामेळाव्यानिमित्त जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी

 विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती 


हिंगोली (जिमाका), दि. 24 :  जिल्ह्यात दि. 26 नोव्हेंबर, 2023 हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर ओबीसी एल्गार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून आयोजित महामेळाव्यास जिल्ह्यातून व इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात जनसमुदाय येण्याची शक्यता आहे. तसेच महामेळाच्या ठिकाणी येणारा जनसमुदाय हा जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीतून वाहनाने मेळाव्याच्या ठिकाणी येणार आहे व मेळावा संपल्यानंतर वाहनाने परत जाणार आहे . सध्या जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षण संबंधाने प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत साखळी उपोषण व गाव बंदी चे पोस्टर लावण्यात आलेले असून त्यावरून काही वाद निर्माण होऊन  अचानक उद्भवलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस तोंड देण्यासाठी बंदोबस्तातील अधिकाऱ्यांसोबत विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची आवश्यकता असते. त्यामुळे वरील परिस्थिती लक्षात घेऊन संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात दि. 25 नोव्हेंबर, 2023 ते 26 नोव्हेंबर,2023 या कालावधीत उद्भवणारा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी जिल्ह्यातील 13 पोलीस स्टेशनसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे 13 विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यानी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अन्वये नियुक्ती केली आहे.  

हिंगोली शहर पोलीस स्टेशनसाठी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी, हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी हिंगोली उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार पी. एन. रुषी,  नरसी नामदेव पोलीस स्टेशनसाठी हिंगोली तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी नवनाथ वगवाड, बासंबा पोलीस स्टेशनसाठी हिंगोली महसूल विभागाचे नायब तहसीलदार नकुल पोळेकर, वसमत शहर पोलीस स्टेशनसाठी वसमतचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांची, वसमत ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी वसमत उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार अशोक भोजने, हट्टा पोलीस स्टेशनसाठी वसमतचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी शारदा दळवी, कुरुंदा पोलीस स्टेशनसाठी वसमतचे महसूल विभागाचे नायब तहसीलदार विलास तेलंग, कळमनुरी पोलीस स्टेशनसाठी कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी क्रांती डोंबे, बाळापूर पोलीस स्टेशनसाठी कळमनुरीच्या तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी सुरेखा नांदे यांची, औंढा नागनाथ पोलीस स्टेशनसाठी तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी विठ्ठल परळीकर यांची, सेनगाव पोलीस स्टेशनसाठी तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी सखाराम मांडवगडे यांची, गोरेगाव पोलीस स्टेशनसाठी सेनगाव येथील महसूल विभागाचे नायब तहसीलदार डी. के. गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वरील नियुक्ती केलेल्या दंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कार्यक्षेत्राच्या हद्दीत दि. 26 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर,2023 या कालावधीत विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. तसेच उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनी नेमून दिलेल्या पोलीस स्टेशनशिवाय त्यांच्या उपविभागावर दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवावे. तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या पोलीस स्टेशनशिवाय त्यांच्या तालुक्यात कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवावेत, असे आदेश दिले आहेत.  

*****

 

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू

 

                हिंगोली (जिमाका), दि. 24 :  जिल्ह्यात मराठा आरक्षण  मागणी संदर्भाने सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आमरण उपोषणे, उपोषणे, साखळी उपोषणे व विविध प्रकारचे आंदोलने चालू असून दि. 26 नोव्हेंबर, 2023 रोजी ओबीसी एल्गार महामेळावा, दि. 27 नोव्हेंबर, 2023 रोजी गुरुनानक जयंती कार्यक्रम केले जाणार आहेत. तसेच सध्या घडणाऱ्या राजकीय घडामोडी, नागरिकांच्या वतीने, विविध संघटना, पक्ष यांच्यातर्फे हिंगोली जिल्ह्यात त्यांच्या मागणी संदर्भात मोर्चे, धरणे आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे करीत असतात. अशा विविध घटनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित  राखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दिनांक 19  नोव्हेंबर, 2023 रोजीचे 23.59 वाजल्यापासून ते दिनांक 04 डिसेंबर, 2023 रोजीचे 23.59 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.

            त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास  सक्त मनाई करण्यात आले आहे. हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी दिलीप कच्छवे  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.     

**** 

 

परभणी पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या

गोळीबार सरावासाठी मौजे वगरवाडी येथील क्षेत्र उपलब्ध

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 24 : महाराष्ट्र जमीन  महसूल  अधिनियम 1966 चे कलम 22 अन्वये व मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील  कलम 33 (1) (ख) व (प)  नुसार मौजे  वगरवाडी  ता. औंढा, जि. हिंगोली  येथील फायरींग रेंज सर्वे नं. 25 व 29 या परिसरात  दि. 29 ऑक्टोबर, 2023 रोजी परभणी पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना दि. 20 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर, 2023 या कालावधीत गोळीबार सराव घेण्यासाठी  परवानगी  देण्यात येत आहे.

            या कालावधीत पुढील अटीवर गोळीबार  सरावासाठी  मैदान उपलब्ध  करुन देण्यात येत आहे. हे ठिकाण  धोकादायक  क्षेत्र म्हणून  घोषित करण्यात आले आहे. परिसरात  गुरांना न सोडणे व कोणत्याही व्यक्तीने त्या क्षेत्रात प्रवेश करु नये, अशा सूचना  पोलीस अधिकारी यांनी  दवंडीद्वारे  व ध्वनीक्षेपकाद्वारे  संबंधित  गावी सर्व संबंधितांना  द्याव्यात. तसेच तहसीलदार औंढा नागनाथ व पोलीस  स्टेशन हट्टा यांनी मौ. वगरवाडी  फायरींग बट परिसरात  दवंडीद्वारे व ध्वनीक्षेपकाद्वारे  या आदेशाची  प्रसिध्दी  करावी, असे जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

****