18 September, 2024
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत खाजगी आस्थापनांमध्ये नियुक्तीसाठी रोजगार मेळावा
हिंगोली (जिमाका), दि. 18 : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी खासगी आस्थापनांमध्ये त्यांना शिकाऊ प्रशिक्षणार्थी म्हणून 6 महिन्यासाठी नियुक्ती मिळणार आहे. त्यासाठी दि. 20 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत प्रत्येक तालुक्यात 2 रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील खाजगी आस्थापना व सुशिक्षित बेरोजगार युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.
या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून आयोजित रोजगार मेळाव्यात इच्छूक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करुन देणारे उद्योजक जोडले जाणार आहेत. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमतावाढ होणार आहे. तसेच उद्योजकांना त्यांच्या कामासाठी लागणारे मनुष्यबळ या योजनेद्वारे 6 महिने कालावधीसाठी उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत जिल्ह्यातील खाजगी (उद्योग, कंपनी, कृषी उद्योग, गोदाफार्म, व्यवसाय, खाजगी अनुदानित शाळा, विना अनुदानित शाळा, विद्यालय, महाविद्यालय) या आस्थापनांमध्ये हे प्रशिक्षणार्थी काम करू शकणार आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत हिंगोली जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
दि. 20 सप्टेंबर, 2024 रोजी वायव्हीएस, प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र, नर्सी नामदेव ता. हिंगोली व वायव्हीएस, प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र, गोरेगाव ता. सेनगाव येथे रोजगार मेळावा होणार आहे. 23 सप्टेंबर रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हिंगोली येथे 24 सप्टेंबर रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था वसमत, येथे 25 सप्टेंबर रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सेनगाव येथे होणार आहे. 26 सप्टेंबर रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळमनुरी व वायव्हीएस, प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र, आखाडा बाळापूर ता. कळमनुरी, येथे 30 सप्टेंबर रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंढा नागनाथ व वायव्हीएस, प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र, जवळा बाजार ता. औंढा नागनाथ येथे होणार आहे. दि. 1 ऑक्टोबर, 2024 रोजी वायव्हीएस, प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र, कुरुंदा ता. वसमत येथे रोजगार मेळाव्याचे अयोजन करण्यात आले आहे.
उमेदवारांसाठी पात्रता :
उमेदवाराचे किमान वय 18 व कमाल 35 वर्षे असावे. किमान शैक्षणिक पात्रता बारावी, आयटीआय, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर असावी. महाराष्ट्राचा अधिवासी असावा. आधार नोंदणी, बँक खाते आधार संलग्न असावे. उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर अद्ययावत नोंदणी केलेली असावी. बँक खात्याविषयीची कागदपत्रे अपलोड करावीत.
या कार्य प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हता प्रमाणे 12 वी पास शैक्षणिक अर्हतेसाठी 6 हजार, आयटीआय व पदविका शैक्षणिक अर्हता असलेल्यांना 8 हजार आणि पदवीधर व पदव्युत्तर शैक्षणिक अर्हता असलेल्यांना 10 हजार याप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातील 12 वी, आयटीआय, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर या शैक्षणिक अर्हतेनुसार सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in येथे नोंदणी करावी. आपले आधार कार्डशी संलग्न बँक खात्यावरील माहिती भरुन कागदपत्रे अपलोड करावीत व सदरील आस्थापनेस ऑनलाईन अर्ज करावा. तसेच आपल्याकडील कागदपत्रे सोबत घेऊन जवळच्या रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी मुलाखतीस उपस्थित रहावे. याबाबत काही अडचण आल्यास 02456-224574 या दूरध्वनीवर किंवा 99767213394, 7972888970, 7385924589 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त डॉ. कोल्हे यांनी केले आहे.
*******
17 September, 2024
महिला लोकशाही दिनाचे आज आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 17 : राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मुलभूत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी किंवा तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो.
माहे सप्टेंबर, 2024 च्या तिसऱ्या सोमवारी व 17 सप्टेंबर, 2024 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे माहे सप्टेंबर, 2024 च्या महिला लोकशाही दिनाचे आयोजन उद्या बुधवार,दिनांक 18 सप्टेंबर, 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात करण्यात आले आहे. समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र. एस-7, हिंगोली यांच्या कार्यालयात सादर करावेत. यामध्ये न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी, तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल असे अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग आपल्या अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
*******
मोबाईल ॲपवर ई-पीक नोंदणीसाठी बुधवार, गुरुवारी विशेष मोहिम
हिंगोली (जिमाका), दि. 17 : खरीप हंगाम 2024 मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या नुकसानीमुळे प्रधानमंत्री पीक विमा योजना, नैसर्गिक आपत्तीचे सानुग्रह अनुदान अदा करण्यासाठी ई-पीक पाहणीला अन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.त्यामुळे येत्या बुधवारी व गुरुवारी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून, शेतक-यांनी आपल्या पिकांची नोंदणी ई पिक अँपवर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.
हिंगोली जिल्ह्यात सन 2024 मध्ये खरीप सर्व साधारण क्षेत्र 4 लाख 25 हजार 358 हेक्टर आर पैकी 2 लाख 14 हे.आर क्षेत्राची शेतकऱ्यांनी अँप डाऊनलोड करून नोंदणी पूर्ण केलेली आहे. उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी सुध्दा त्यांचा पीकपेरा ई-पीक पाहणी मोवाईल अँपव्दारे विहित मुदतीत नोंदविण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या हेतूने दि. 18 व 19 सप्टेंबर, 2024 रोजी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेत जिल्ह्यात 1 लाख 40 हजार 200 शेतकऱ्यांनी पीकपेरा नोंदणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. त्याबाबतची सर्व जबाबदारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हिंगोली व उपविभागीय अधिकारी (महसूल) यांच्यावर सोपविण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हिंगोली व उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्या अधिनस्त तालुक्यासाठी तालुकास्तरावर सूक्ष्म नियोजन करून सदर मोहिम यशस्वी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहेत.
******
दिव्यांगमुक्त जिल्हा करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज - जिल्हाधिकारी अभिनव गोयल
हिंगोली (जिमाका), दि. 17 : लहान मुलांमध्ये असलेल्या दिव्यंगत्वाचा शोध घेऊन त्याच्यावर वेळेत उपचार केल्यास 90 टक्के मुले यातून दुरुस्त होऊ शकतात. याचे योग्य नियोजन केल्यास आगामी काळात आपला जिल्हा दिव्यांग मुक्त होण्यास मदत होणार आहे. यामुळे या क्षेत्रात काम करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले.
येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत देशातील आकांक्षीत तालुके व इतर ठिकाणी असे 75 जिल्ह्यात अपंगांना साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाचे मंत्री डॉ. विरेंद्र ठाकूर यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे संबोधन केले. तसेच त्यांनी यावेळी सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली.
यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, भारतीय कृति अंग निर्माण निगम (एलिम्को) कानपूरचे किरण पावरा, अस्थिरोग तज्ञ डॉ. मनीष बगडीया यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी श्री. गोयल म्हणाले, अपंग अधिनियमान्वये 21 प्रकारच्या अपंगत्वाचा समावेश करण्यात आलेला आहे. अपंगत्वाचे प्रामुख्याने दोन भागात वर्गीकरण करावे. यामध्ये पहिल्या भागात ओळखलेले किंवा सध्या अस्तित्वात असलेल्या दिव्यांगाना उपकरण उपलब्ध करुन देऊन सक्षम करणे तर दुसऱ्या भागामध्ये दिव्यांगमुक्त जिल्ह्याकडे वाटचाल करण्यासाठी शोध मोहिम राबविण्याची गरज आहे. यासाठी ग्रामपातळीवरील सर्व अधिकारी, कर्मचारी, सर्व आरोग्य केंद्र तसेच विविध स्वयंसेवी संघटना यांनीही जिल्हा प्रशासनास दिव्यांगमुक्त हिंगोली जिल्हा करण्यास मदत करावी. शासनाने दिव्यांगासाठी 5 टक्के निधी राखून ठेवला आहे. तसेच त्यांना विशिष्ट ओळख म्हणून युडीआयडी कार्डाचेही वितरण करण्यात आले आहे, त्यामुळे या क्षेत्रात सर्वांनी पुढे येऊन योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी यावेळी केले.
यावेळी प्रास्ताविकात जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांनी जिल्ह्यात 1069 दिव्यांगांना विविध उपकरण साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींवर विविध उपचार, तपासण्या मोफत करण्यात येणार असल्याचे सांगितले. यासाठी वंचित दिव्यांगांना याबाबत आपण सर्वांनी माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी प्रमुख मान्यवराच्या हस्ते जिल्ह्यातील दिव्यांगांना प्रातिनिधीक स्वरुपात साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. या कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रबोधनकार केशव ठाकरे यांची जयंती साजरी
हिंगोली (जिमाका), दि. 17 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी नायब तहसीलदार डी. एस., निमजे यांच्यासह प्रशासकीय इमारतीतील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनीही प्रबोधनकार केशव ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
*****
जिल्हाधिकारी कार्यालयात अभिनव गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहण
हिंगोली (जिमाका), दि. 17 : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजाल, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी बारी सिध्दीकी, तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.
*****
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण मराठवाडा मुक्ती संग्रामात अनेक हुतात्मे आणि स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले योगदान अमूल्य - पालकमंत्री अब्दुल सत्तार
• अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होताच तातडीने निधी उपलब्ध करुन देण्यात येईल
• महत्वपूर्ण योजनांचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न
• अल्पमुदतीचे पीक कर्ज घेणाऱ्या व या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या 45 हजार 920 पात्र लाभार्थ्यांना 2 कोटी 53 लाख रुपये अनुदान स्वरुपात बचत खात्यामध्ये जमा
हिंगोली (जिमाका), दि. 17 : स्वातंत्र्यानंतरही देशात तीन संस्थाने विलीन झाली नव्हती. काश्मीर, जुनागढ आणि हैद्राबाद या संस्थानांनमुळे भारतीय संघराज्य पुर्णत्वास गेले नव्हते. स्वामी रामानंद तिर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैद्राबाद संस्थानात मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा सुरु झाला होता. मराठवाड्याच्या गावा-गावातून मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढला. हा केवळ संस्थांनाच्या विलिनीकरणाचा लढा नव्हता तर भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा लढा होता. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे हे आंदोलन सतत 13 महिने सुरु होते. या आंदोलनात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अखेर 17 सप्टेंबर, 1948 रोजी निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झाला. या मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी अनेक हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या लढ्याचे योगदान अमूल्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील कै. अण्णासाहेब टाकळगव्हाणकर उद्यानातील हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ प्रसंगी श्री. सत्तार बोलत होते. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय श्रीमती रुक्मिणीबाई देवकते, श्रीमती मालती पैठणकर, आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा 76 वा वर्धापन दिन आज मराठवाड्यात सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे. निजामाच्या हुकूमशाही विरोधात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या संपूर्ण आयुष्याची आहुती देऊन मराठवाडा मुक्त केला. मराठी भाषा, मराठी संस्कृती, धार्मिक स्वातंत्र्य, सामाजिक व राजकीय हक्क प्राप्तीसाठी या भागातील जनतेने जो त्याग केला, तो सुवर्णाक्षरांनी लिहावा असाच आहे. महाराष्ट्र शासन स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि जनतेच्या याच त्यागाबद्दल कृतज्ञ राहून कार्य करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्य शासन विविध महत्त्वाकांक्षी योजना राबवत आहे. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, मुलींना शिक्षणात 50 ऐवजी 100 टक्के शुल्कमाफी योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज सवलत योजना यांच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहचविण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे श्री. सत्तार यांनी सांगितले
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 3 लक्ष 05 हजार 499 बहिणींची नावनोंदणी झाली आहे. त्यापैकी 2 लाख 98 हजार 118 बहिणी पात्र ठरल्या आहेत. या योजनेतून हिंगोली जिल्ह्यातील 1 लाख 49 हजार 219 पात्र लाडक्या बहिणींना दोन महिन्याची रक्कम 44 कोटी 76 लाख 57 हजार रुपये डीबीटीद्वारे वितरीत करण्यात आली आहे. तसेच उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही रक्कम वितरीत करण्याची कार्यवाही लवकरच करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन हप्त्यांचे 3 हजार रुपये जमा झाले असल्याने याचा मनस्वी आनंद होत असल्याचे सांगून लाडक्या बहिणींच्या नावनोंदणीला सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे सांगितले.
तसेच युवक-युवतींसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत आतापर्यंत जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना 6 महिने शासकीय कार्यालयात कामाचा अनुभव आणि त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार 6 हजार, 8 हजार किंवा 10 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 859 युवक-युवतींना नियुक्तीचे आदेश देण्यात आले असून 1 हजार 846 युवक-युवतींनी प्रत्यक्षात रुजू होऊन कार्य प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळाल्याचा आनंद आहे. धार्मिक अधिष्ठान असलेल्या आपल्या देशाला मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. देशातील विविध धार्मिक स्थळे ज्येष्ठ नागरिकांना याची देही याची डोळा पाहता यावीत, त्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु केली आहे. हे ज्येष्ठ नागरिक या योजनेत पात्र ठरावेत, प्रवासात कोणताही त्रास होऊ नये यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने आरोग्य तपासणी शिबिरही घेतले. यामध्ये जिल्ह्यातील किमान 1 हजार लाभार्थ्यांना तीर्थदर्शनासाठी 30 हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार आहे.
राज्यातील एकही व्यक्ती सणसुदीला आणि एरव्हीही उपाशीपोटी झोपू नये, त्यासाठी आवश्यक असणारा आनंदाचा शिधा आणि मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेच्या माध्यमातून तो शिजवण्यासाठी त्या मायमाऊलीला वर्षात 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. यामध्ये जिल्ह्यातील 1 लाख 84 हजार इतक्या माता-भगीनी या योजनेच्या लाभार्थी असून, त्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला आणि मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेतून सिलेंडर मिळत आहेत. तसेच मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून तीन हजार रुपयांपर्यंत साहित्य खरेदीसाठी त्यांच्या थेट खात्यात जमा करण्यात येत आहे. याचा लाभ जिल्ह्यातील किमान 20 हजार ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे, असल्याचे पालकमंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.
राज्य शासन शेतकऱ्यांच्या भक्कमपणे पाठीशी उभे असून, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून 236 गावांमध्ये प्रकल्प राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात 80 हजार शेतकऱ्यांपैकी 40 हजार शेतकऱ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून जवळपास 15 कोटी रुपये त्यांच्या थेट बँक खात्यात लाभाचे वितरीत करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ग्रामीण भागातील रस्ते बांधणीला प्राधान्य देण्यात आले असून, 2015-16 ते 2023-24 या सात वर्षांमध्ये 850 किमी लांबीचे 249 रस्ते मंजूर झाल आहेत. त्यापैकी आतापर्यंत 227 कामे पूर्ण झाली असून, 20 कामे प्रगतीपथावर आहेत. ही सर्व कामे डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होतील, असा विश्वास पालकमंत्री श्री. सत्तार यांनी व्यक्त केला.
याशिवाय प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान आणि मा. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे (हळद) हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध होणार आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे ब्रँडींग आणि विपणन करण्यासाठी, उद्योग उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच नुकतीच वसमत तालुक्यातील पार्डी बुद्रक येथील 40 हेक्टरवर औद्योगिक वसाहतीला मंजुरी दिली आहे. तसेच मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेतून पुढील पाच वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांना कृषी विज बिल भरण्याची गरज राहणार नसल्याचेही श्री. सत्तार यांनी यावेळी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 2 लाख 86 हजार 144 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तर 2 हजार 153 घराची अंशत: पडझड झाली आहे. याचे पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्यात असून आतापर्यंत 98 टक्के काम झाले आहे. पंचनामे पूर्ण होताच शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवून निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच या अतिवृष्टीमध्ये 2 व्यक्ती मयत झाले असून त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपयाचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे. तर 213 पशुधनाचे मयत झाले असून त्यांनाही तालुकास्तरावर सानुग्रह अनुदान वाटप करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती पालकमंत्री श्री. सत्तार यांनी दिली.
वित्तीय संस्थांकडून 3 लाख रुपयापर्यंतचे अल्पमुदतीचे पीक कर्ज घेणाऱ्या व या कर्जाची प्रति वर्षी दि. 30 जूनपर्यंत संपूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना वार्षिक 3 टक्के दराने व्याज सवलत अनुज्ञेय आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये व्याज सवलत योजनेच्या 45 हजार 920 पात्र लाभार्थ्यांना 2 कोटी 53 लाख रुपये अनुदान स्वरुपात त्यांच्या बचत खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. येथील जिल्हा रुग्णालयातील बालरोग विभागास मुस्कान कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय स्तरावरचे मानांकन मिळाले आहे. ही अभिनंदनाची बाब आहे. जिल्हा रुग्णालयातील एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, सिमेंट रोड व शेड, हृदयरुग्ण असणाऱ्या लाभार्थ्यासाठी कार्डियाक कॅथेटेरायझेशन प्रयोगशाळा, सहा मॉड्यूलर ऑपरेशन थिएटरचे बांधकाम प्रगतीपथावर सुरु असल्याची माहिती श्री. सत्तार यांनी दिली.
अनुसूचित जाती उपयोजनेतून समाजातील दुर्बल, वंचित घटकाला समान न्याय व समान हक्क या भूमिकेतून त्यांना उत्पन्नाची साधने वाढविण्यासाठी शासनाने विशेष घटक योजना 1980 पासून सुरु केली आहे. त्यामुळे अनुसूचित जाती उपयोजनेमध्ये 18 विविध विभागांमार्फत 59 योजना राबविण्यात येतात. मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुला-मुलींसाठी शासकीय वसतीगृह सुरु करण्यात आली आहेत. त्यांच्यासाठी विविध शिष्यवृत्ती देण्यात येत आहेत. राज्य शासनाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेतून आतापर्यंत 84 जणांना लाभ दिला आहे. तसेच मिनी ट्रॅक्टर, भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाही राबविण्यात येत असल्याची माहिती श्री. सत्तार यांनी यावेळी दिली.
प्रारंभी राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलीस पथकाने हुतात्म्यांना शोक धून वाजवून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी श्री. सत्तार यांनी स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय रुक्मिनीबाई देवकते, मालतीबाई पैठणकर यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला. तसेच श्री. सत्तार यांनी लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी, नागरिक, पत्रकार यांची भेट घेवून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरात अडकलेल्या लोकांना आपला स्वत:चा जीव धोक्यात घालून मोलाची कामगिरी बजावणाऱ्या बाबाराव रामरावजी पडोळे यांचा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते 'स्वच्छता ही सेवा अभियाना'चा जिल्ह्यात प्रारंभ
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. 2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने स्वच्छता ही सेवा 2024 मोहीम दि. 17 सप्टेंबर ते दि.1 ऑक्टोबर 2024 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. याचा जिल्हास्तरीय प्रारंभ आज राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आज करण्यात आला.
यावर्षीच्या स्वच्छता ही सेवा 2024 साठी स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता ही थीम निश्चित केली आहे. त्या अनुषंगाने स्वच्छता ही सेवा पंधरवडा कालावधीमध्ये विविध उपक्रम राबविण्याबाबत केंद्र व राज्य शासनाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात विविध दैनंदिन उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 17 सप्टेंबर रोजी स्वच्छता ही सेवा अभियानाचा शुभारंभ गाव, तालुका व जिल्हास्तरावर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. सफाई मित्र सुरक्षा शिबीर या उपक्रमाद्वारे सफाई मित्रासाठी एक खिडकी योजनेद्वारे सर्व योजनांच्या अनुषंगाने पात्र लाभार्थ्यांकरिता मोहीम राबविण्यात येणार आहे. 19 सप्टेंबर रोजी एक दिवस श्रमदानासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित अवचार यांनी केले. यावेळी पत्रकार, नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
**
Subscribe to:
Posts (Atom)









