20 September, 2024

विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त पथक प्रमुखांनी आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी - जिल्हाधिकारी अभिनव गोयल

• निवडणूक पथक प्रमुखांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा हिंगोली, दि.20(जिमाका) : जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया शांततामय आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथक प्रमुखांनी सजग राहून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक पथक प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघाचे सर्व उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व तहसीलदार, पोलीस यंत्रणेचे अधिकारी यांच्यासह सर्व पथक प्रमुख, सहायक पथक प्रमुखांची‌ यावेळी उपस्थिती होती. निवडणुकीसाठी नियुक्त प्रत्येक पथकाची जबाबदारी अतिशय महत्त्वाची आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व पथक प्रमुखांनी आपापली जबाबदारी समजून घेऊन ती काळजीपूर्वक पार पाडावी. निवडणूकविषयक कामाला प्राधान्य देत आपल्या पथकातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचा योग्य समन्वय ठेवून काम करावे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही, याची काळजी घ्यावी. आतापासूनच आपल्यावर सोपविलेल्या जबाबदारीच्या अनुषंगाने कार्यवाही सुरु करावी, असे जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी एसएसटी, एफएसटी, व्हीएसटी पथके नेमण्यासाठी दूरसंचार नेटवर्कचा विचार करुन ठिकाणे निश्चित करताना ती योग्य जागेवर निवडावीत. कारण त्या ठिकाणची माहिती घेण्यासाठी संवाद साधणे सोयीचे होईल, असे सांगितले. अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनीही विधानसभेच्या आदर्श आचारसंहिता पालनाबाबत सूचना केल्या. नियुक्त सर्व पथक प्रमुखांनी नेमून दिलेली कर्तव्ये व जबाबदारी पार पाडताना अतिशय दक्ष राहण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या. उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे यांनी सर्व पथक प्रमुख अधिकारी यांना त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदारीबाबत माहिती दिली. तसेच प्रत्येक पथक प्रमुख अधिकारी यांनी आपल्याला आवश्यक मनुष्यबळाचे योग्य नियोजन करुन निवडणूक कामकाजात कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या. *****

19 September, 2024

नुकसानग्रस्त खरीप पिकांच्या विमा दाव्याची पुर्वसूचना दाखल क्षेत्राचे सर्वेक्षण करण्याचे विमा कंपनीला आदेश

हिंगोली (जिमाका), दि. 19 : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम-2024 राबविण्यासाठी शासनाने दि. 26 जून, 2023 अन्वये मान्यता दिली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये एचडीएफसी इरगो जनरल इन्शुरन्स कंपनीकडून योजना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील 4 लाख 72 हजार 15 शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये दि. 2 सप्टेंबर, 2024 रोजी अतिवृष्टी झाल्यानंतर 4 लाख 54 हजार 71 शेतकऱ्यांनी विमा दाव्याची पूर्वसूचना कंपनीकडे दाखल केल्याचे कंपनीने कळविले आहे. केंद्र शासनाच्या दि. 17 ऑगस्ट, 2020 च्या मार्गदर्शक सूचनेतील तरतुदीप्रमाणे जिल्ह्यातील तूर, कापूस इत्यादी सर्व पिकामधील दिलेल्या पूर्वसुचनांचे 30 टक्के सॅम्पल सर्वे करुन झालेल्या नुकसानीच्या व क्षेत्राच्या प्रमाणात मदत देण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी एचडीएफसी इरगो जनरल इन्शुरन्स कंपनीला दिले आहेत. या सर्वेक्षणासाठी क्षेत्रीय स्तरावर संबंधित कृषि सहाय्यक, विमा प्रतिनिधी व शेतकरी यांची उपसमिती नेमली असून त्यांच्या कामाचे सनियंत्रण संबंधित मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी व तालुकास्तरीय विमा प्रतिनिधी यांनी करावेत, असे आदेशही जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी दिले आहेत. ******

18 September, 2024

दिव्यांगमुक्त जिल्हा करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज - जिल्हाधिकारी अभिनव गोयल

हिंगोली (जिमाका), दि. 18 : लहान मुलांमध्ये असलेल्या दिव्यंगत्वाचा शोध घेऊन त्याच्यावर वेळेत उपचार केल्यास 90 टक्के मुले यातून दुरुस्त होऊ शकतात. याचे योग्य नियोजन केल्यास आगामी काळात आपला जिल्हा दिव्यांगमुक्त होण्यास मदत होणार आहे. यामुळे या क्षेत्रात काम करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले. येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालयाअंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागामार्फत देशातील 75 आकांक्षित जिल्ह्यात एडिप योजनेतून दिव्यांगाना विविध साहित्याचे मोफत वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. विरेंद्र ठाकूर यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे सर्वांना ऑनालाईन मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी यावेळी सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, भारतीय कृति अंग निर्माण निगम (एलिम्को) कानपूरचे किरण पावरा, अस्थिरोग तज्ञ डॉ. मनीष बगडीया, मधुकर राऊत, लक्ष्मण मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी श्री. गोयल म्हणाले, अपंग अधिनियमान्वये 21 प्रकारच्या अपंगत्वाचा समावेश करण्यात आलेला आहे. अपंगत्वाचे प्रामुख्याने दोन भागात वर्गीकरण करावे. यामध्ये पहिल्या भागात ओळखलेले किंवा सध्या अस्तित्वात असलेल्या दिव्यांगाना उपकरण उपलब्ध करुन देऊन सक्षम करणे तर दुसऱ्या भागामध्ये दिव्यांगमुक्त जिल्ह्याकडे वाटचाल करण्यासाठी शोध मोहिम राबविण्याची गरज आहे. यासाठी ग्रामपातळीवरील सर्व अधिकारी, कर्मचारी, सर्व आरोग्य केंद्र तसेच विविध स्वयंसेवी संघटना यांनीही जिल्हा प्रशासनास दिव्यांगमुक्त हिंगोली जिल्हा करण्यास मदत करावी. शासनाने दिव्यांगासाठी 5 टक्के निधी राखून ठेवला आहे. तसेच त्यांना विशिष्ट ओळख म्हणून युडीआयडी कार्डाचेही वितरण करण्यात आले आहे, त्यामुळे या क्षेत्रात सर्वांनी पुढे येऊन योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी यावेळी केले. यावेळी प्रास्ताविकात जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांनी जिल्ह्यात 1069 दिव्यांगांना विविध उपकरण साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींवर विविध उपचार, तपासण्या मोफत करण्यात येणार असल्याचे सांगितले. यासाठी वंचित दिव्यांगांना याबाबत आपण सर्वांनी माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी प्रमुख मान्यवराच्या हस्ते हिंगोली तालुक्यातील 111 दिव्यांगांना तीन चाकी, सायकल, बॅटरी ऑपरेटेड सायकल, कानाची मशीन, अंधाची सेंसर काठी, कुबडी, व्हीलचेअर, कृत्रिम अवयव, चष्मे इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील इतर तालुक्यातील लाभार्थ्यांना पुढील कालावधीत तालुकास्तरावर साहित्य वाटप शिबीरे घेण्यात येणार असल्याची माहिती संबंधितांनी दिली. या कार्यक्रमास दिव्यांग संघटनांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ******

जिल्हा प्रशासनाकडून ‘ई-पीक पाहणी’साठी अधिकारी पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर

• गावातील युवकांची मदत घेण्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे निर्देश हिंगोली (जिमाका),दि.18 : जिल्ह्यात सप्टेंबरच्या सुरुवातीला अतिवृष्टीने शेती आणि उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे जिल्ह्यात झालेल्या शेती आणि पिकांच्या नुकसानीचे सर्व्हे करण्यासाठी जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून, जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी ‘ई-पीक पाहणी’ करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले आहेत. या विशेष मोहिमेत कमीत कमी वेळेत ई-पीक पाहणी पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने गावातील शिक्षित युवकांची मदत घ्यावी. या युवकांनी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्याबाबत योग्य मार्गदर्शन करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी कळमनुरी तालुक्यातील शिवनी खुर्द तर वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी तालुक्यातील गिरगाव येथे या विशेष मोहिमेमध्ये शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीची प्रात्यक्षिके करून दाखवत मार्गदर्शन केले. सप्टेंबरच्या सुरुवातीला जिल्ह्यातील सर्वच मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली होती. त्यामुळे हिंगोलीसह ग्रामीण भागात नदी-नाल्यांच्या काठावरील गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामध्ये अनेक शेतकरी-शेतमजूर पुराच्या पाण्यामुळे शेती-आखाड्यावर अडकून पडले होते. वेळीच जिल्हा प्रशासनासह आपत्ती व्यवस्थापन विभागाची मदत मिळाल्यामुळे त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. या अतिवृष्टीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेतली. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि त्यानंतर मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी पुरबाधित गावांचा दौरा करून बाधितांना धीर देत पंचनामे पूर्ण होताच शासनाकडून तात्काळ मदत करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येतील, असे सांगितले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सर्वत्र जिल्हा प्रशासनातील विविध अधिकारी चमूसह ‘ई-पीक पाहणी’ करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचल्याचे दिसून येत आहे. यावेळी गिरगावच्या मंडळ अधिकारी प्रियंका खडसे, वसमतचे राजु क्षीरसागर, तलाठी वंदना म्हस्के, पालीस पाटील श्री. शिवनकर, सरपंच श्रीमती पी. पी. नागरे यांच्यासह शेतकरी बांधवांची यावेळी उपस्थिती होती. *******

‘अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान’ बाबीअंतर्गत सोयाबीन पिक विम्यासाठी 25 टक्के अग्रीम

हिंगोली (जिमाका), दि. 18 : जिल्ह्यात सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित पिकांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत शासनाकडून निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार क्षेत्रीय संयुक्त समितीमार्फत केलेल्या सर्वेक्षणानुसार सर्व महसूल मंडळामध्ये सोयाबीन पिकामध्ये मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थिती लागू होत असल्याने संबंधित विमा धारकांना पिक नुकसानीच्या प्रमाणात विमा संरक्षित रकमेच्या 25 टक्के अग्रीम देण्याचे आदेश सोमवारी पारित केले आहेत. प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2024 अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान ही जोखीम लागू करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हास्तरीय संयुक्त समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये क्षेत्रीय स्तरावरील संयुक्त समितीच्या सर्वेक्षणानुसार सोयाबीन पिकाचे नजर अंदाजानुसार अपेक्षित उत्पादन हे मागील 7 वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या 50 टक्के पेक्षा कमी आल्याचे निदर्शनास आले आहे. तर तूर व कापूस पिकांच्या नजर अंदाजानुसार अपेक्षित उत्पादनात 50 टक्के पेक्षा जास्त घट दिसून आली नाही. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम-2023 ते रब्बी हंगाम 2025-26 करिता राज्यात राबविण्याबाबत दि. 26 जून, 2023 च्या शासन निर्णय निर्गमित केला आहे. या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांच्यामार्फत नुकसानीचा अहवाल व अधिसूचना जाहीर झाल्यानंतर एक महिन्याच्या आत वरील तरतुदीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीमार्फत नुकसान भरपाई देण्यात येईल. उपरोक्त बैठकीतील चर्चेनुसार तसेच प्राप्त सर्वेक्षण अहवालानुसार अधिसूचित पिक विमा क्षेत्रातील सोयाबीन पिकासाठी संभाव्य नुकसान भरपाई रक्कमेच्या 25 टक्के आगाऊ रक्कम सर्व विमाधारक शेतकऱ्यांना देण्याचे आदेश एचडीएफसी ईरगो कंपनी लि. यांना जिल्हास्तरीय संयुक्ती समितीच्या मान्यतेने जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. ******

सशस्त्र दलातील माजी सैनिकांना भरतीसाठी संधी

हिंगोली (जिमाका), दि. 18 : मराठवाडा पर्यावरण बटालियन अंतर्गत 136 इन्फंट्री बटालियन (टीए)(इको) महारमध्ये सशस्त्र दलातील माजी सैनिक, पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभाग व राज्य वन विभागाच्या माजी महिला कर्मचाऱ्यातून 53 पदे भरावयाची आहेत. यासाठी छत्रपती संभाजीनगर मिल्ट्री कॅम्प (सर्वत्र स्टेडियम) येथे दि. 23 ते 28 सप्टेंबर, 2024 या कालावधीत भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरतीअंतर्गत उमेदवारांनी छत्रपती संभाजीनगर मिल्ट्री कॅम्प (सर्वत्र स्टेडियम) येथे दि. 23 ते 28 सप्टेंबर, 2024 या कालावधीत शारीरिक पात्रता तपासणी उपस्थित राहणे आवश्यक आहे. या बटालियनमध्ये सोल्जर जीडी सामान्य कर्तव्य 42 पदे, लिपिक 6 पदे, घरकाम करणारी व्यक्ती 1 पद, लोहार 1 पद, मेस किपर कारागीर 1 पद, आर्टेशियन 1 पद, तसेच स्टीवार्ड 1 पद असे एकूण 53 पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी माजी सैनिकांचा सेवानिवृत्त झाल्याचा कालावधी 5 वर्षाच्या आतील असावा. माजी सैनिक 50 वर्षापर्यंत सेवा करु शकतात. तसेच वैद्यकीय श्रेणी SHAPE-1 उमेदवार असावा. वजन 50 किलो, छाती माजी सैनिकासाठी 82 सें.मी. (किमान विस्तार 5 सें.मी.) असावा. माजी सैनिकांसाठी पीपीओ, डिस्चार्ज बूक, अलीकडील पासपोर्ट आकाराच्या रंगीत छायाचित्राच्या 8 प्रती, शिक्षण प्रमाणपत्र, निवासी प्रमाणपत्र, आधार व पॅन कार्ड आवश्यक आहे. शारीरिक तंदुरुस्ती चाचणी केवळ पुरुषांसाठी : निर्धारित वेळेत 1.6 किमी धावणे, 8 ते 9 फूट खंदक (वयानुसार) उडी मारुन पार करण्यास सक्षम असावा. पूल अल्पस स्वत:ला पातळीपर्यंत खेचण्यास सक्षम असावा. झिगझॅग शिल्लक-उंच प्लॅटफॉर्मवर चालण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. मेळाव्याचे आयोजन करणारे अधिकारी भरती मेळाव्यादरम्यान उमेदवारांना झालेल्या अपघात, दुखापतीस जबाबदार राहणार नाहीत. उमेदवारांसाठी 9168168136 हा संपर्क क्रमांक आहे. अधिक माहितीसाठी तसेच अटी व शर्तीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली येथे संपर्क साधावा. हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिकांनी या भरती मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली यांनी कळविले आहे. *******

जिल्ह्यातील 6 महाविद्यालयात शुक्रवारी होणार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरु

• प्रधानममंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्ध्यात ऑनलाईन प्रारंभ हिंगोली (जिमाका), दि. 18 : राज्यातील एक हजार महाविद्यालयामध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा प्रारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथून ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील 6 महाविद्यालयांचा समावेश करण्यात आला आहे. कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक-युवतींना व्हावा या दृष्टिकोनातून राज्यातील नामांकित महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहे. महाविद्यालयीन युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टिकोनातून आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील 6 महाविद्यालयांना आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यासाठी मान्यता प्राप्त झाली आहे. या कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून महाविद्यालयातील व महाविद्यालयाबाहेरील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रामध्ये कौशल्याधारित प्रशिक्षण घेण्याची संधी प्राप्त होणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी, नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी केले आहे. ******