29 January, 2025

आदिवासी लाभार्थ्यांनी विविध योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 29 : सन 2024-25 मधील केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत मंजूर आराखड्यानुसार परभणी व हिंगोली जिल्ह्यातील त्या-त्या भागातील सर्व इच्छूक आदिवासी लाभार्थ्यांसाठी विविध योजनांच्या लाभासाठी अर्ज वितरण व स्वीकारण्याचे अंतर कमी व्हावे यासाठी प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी जि. हिंगोली व पंचायत समिती जिंतूर जि. परभणी येथे दि. 3 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी, 2025 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शासकीय सुटीचे दिवस वगळून अर्ज वितरण व स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आदिवासी समाजातील लाभ घेण्यासाठी इच्छूक लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. आदिवासी समाजातील उच्चशिक्षित लाभार्थ्यांना 85 टक्के अनुदानावर लॅपटॉप घेण्यासाठी अर्थसहाय्य करणे, वन हक्क अधिनियम 2006 अन्वये शेती मिळालेल्या लाभार्थ्यांना 85 टक्के अनुदानावर शेती अवजारे घेण्यासाठी अर्थसहाय्य करणे (फक्त वन विभागाची जमीन असलेल्या लाभार्थ्यानीच अर्ज सादर करावेत.) . आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना 85 टक्के अनुदानावर फवारणी पंप घेण्यासाठी अर्थसहाय्य करणे, भूमिहीन प्रमाणपत्र असलेल्या आदिवासी लाभार्थ्यांना 85 टक्के अनुदानावर मळणीयंत्र घेण्यासाठी अर्थसहाय्य करणे, आदिवासी लाभार्थ्यांना आपत्कालीन मदत करणे, आदिवासी बचत गटांना शेळी गट (10 शेळी व 1 बोकड) घेण्यासाठी अर्थसहाय्य करणे आदी योजनांचा समावेश आहे. विहित मुदतीनंतर आलेले व परिपूर्ण नसलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. वरील योजनांमध्ये अंशत:, पूर्णत: बदल करण्याचे तसेच वरीलपैकी कोणतीही योजना राबविण्याचा अथवा न राबविण्याचा अधिकार प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी जि. हिंगोली यांनी राखून ठेवलेला आहे. प्रकल्पांतर्गत असलेल्या लाभार्थ्यांनी वरील योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प कार्यालयात अर्ज सादर करावे, असे आवाहन सुनिल बारसे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांनी केले आहे. ******

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारासाठी सेनगाव येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

हिंगोली (जिमाका), दि. 29 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर व सेनगाव येथील तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टिने दि. 3 फेब्रुवारी, 2025 रोजी तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सेनगाव येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात नॅशनल स्कील डेव्हलेपमेंट कार्पोरेशन महाराष्ट्र इंदरनॅशनल (नोकरी ठिकाणी इस्त्राईल) . मनसा मोटर्स (महिंद्रा)/(टाटा मोटर्स) हिंगोली, टेक्नीकल सर्व्हीस प्रा.लि.पुणे, नवभारत फर्टिलायझर लि. छत्रपती संभाजीनगर, भारत फायनांन्स लि. हिंगोली, नम्र फायनांन्स लिमिटेड नांदेड, पिपल्स ट्री ऑनलाईन प्रा.लि. पुणे/नागपूर, क्रिडेट एक्सेस ग्रामीण लि.हिंगोली, उत्कर्ष स्मॉल फायनांस बँक नांदेड, सॉपिओ आनेलिटिक्स नोडल एजन्सी हिंगोली, भारतीय जीवन विमा निगम हिंगोली, एसबीआय लाईफ इन्श्युरन्स हिंगोली अशा महाराष्ट्रातील नामांकित कंपनी व हिंगोली जिल्ह्यातील शासनाचे विविध महामंडळ रोजगार मेळाव्यात सहभागी होणार आहेत. हिंगोली जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, पदवीधर या शैक्षणिक अर्हतेनुसार 450 पेक्षा अधिक रिक्त पदे https://rojgar.mahaswyam.gov.in व www.ncs.gov.in या संकेतस्थळावर अधिसूचित केली आहेत. आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करुन ऑनलाईन अर्ज करुन स्वत: मूळ कागदपत्रासह तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सेनगाव येथे सोमवार, दि. 3 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 10 वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावे. याबाबत काही अडचण आल्यास 02456-224574 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे. ******

28 January, 2025

ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित कवी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंगोली (जिमाका), दि. 28 : आज ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या सत्रामध्ये कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कवि संमेलनात कवींनी सामाजिक, शैक्षणिक, गेय तसेच राजकीय विडंबनविषयक कवितांचे सादरीकरण केले. या कवि संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील कै. रं.रा.बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयात आयोजित हिंगोली ग्रंथोत्सव-2024 चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. राजाराम बनसकर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन घेण्यात आले. यावेळी प्रमुख कवी प्रा. विलास वैद्य हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कवी संमेलनात प्रा. विलास वैद्य यांनी काल माझ्या सपना कागुद ग आला, प्रकाश अंभोरे यांनी पाऊस मोलाचा, गोडाजी काळे यांनी तुका, श्रीमती पारिजात देशमुख यांनी माझं घरटे, गणेश आघाव यांनी पोरी शाळेत निघाल्या, सिंधूताई दहिफळे यांनी अवकाळी पावसाचा कहर होतो, करण हरण यांनी कुठे आहे आराम जीवाला, संगीता चौधरी यांनी नेहमीच पाँझेटीव्ह राहायचे, अनिकेत देशमुख यांनी नांगराचा फाळ असते, भजनाचा टाळ असते, सुमन दुबे यांनी गजल, दिगांबर जाधव यांनी शाळा अनुदान, राधिका देशमुख यांनी बोबड्या बाळाची कविता, राजकुमार मोरगे यांनी तिला भेटलो म्हणून बरे वाटते, प्रिया धुमाळ यांनी सखी, गणेश येवले यांनी गझल, दर्शना भुरे यांनी नात्यातील गैरसमज, हर्षवर्धन परसवाळे यांनी माय मराठी, प्रा. डॉ.अंजली टापरे यांनी वाट, विजय गुंडेकर यांनी स्वातंत्र्य सैनिक, सुप्रिया दापके यांनी निपुण हिंगोली, रघुनाथ घुगे यांनी स्वार्थ, डॉ. वंदना काबरा यांनी मायची माया, बबन दांडेकर यांनी मानवता, राजाभाऊ बनसकर यांनी टाळ, शिला कांबळे यांनी रमाई, प्रशांत बाहेती यांनी मेरी नौकरी, डॉ.दिलीप धामणे यांनी झोका, शिलवंत वाढवे यांनी शेतकऱ्यांची व्यथा ही कविता सादर केली. यावेळी प्रा. विलास वैद्य यांनी कविता हा माझा प्राण असल्याचे सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर या कवि संमेलनाचा अध्यक्षीय समारोप प्रा. राजाराम बनसकर यांनी केले. प्रास्ताविक अशोक अर्धापूरकर यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रतन आडे, कलानंद जाधव यांनी केले. तर शेवटी आभार मिलींद सोनकांबळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष ससे, संतोष सामाले, रामेश्वर गांजने, लक्ष्मण लाड, लक्ष्मण सावळे, मिलींद सोनकांबळे, शंभुनाथ दुभळकर यांनी परिश्रम घेतले. या कवी संमेलनास जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयाचे प्रतिनिधी, ग्रंथपाल, शिक्षक, विद्यार्थी, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ******

पुस्तके आयुष्यात दिशादर्शकाचे काम करतात -- ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आसाराम लोमटे

हिंगोली (जिमाका), दि. 28 : सांस्कृतिक उंची वाढविण्यासाठी ग्रंथोत्सव महत्वाचे आहेत. ग्रंथोत्सवातून आचार-विचारांचे प्रदान झाले पाहिजे. त्यामुळे पुस्तके हे आयुष्याला, दिशा, गती आणि आकार देण्याचे काम करतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आसाराम लोमटे यांनी ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले. येथील कै. रं.रा.बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयात आयोजित हिंगोली ग्रंथोत्सव-2024 चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आसाराम लोमटे यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी हे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उप शिक्षणाधिकारी नितीन नेटके, प्रा. विलास वैद्य, प्रा.खंडेराव सरनाईक, गजेंद्र बियाणी, प्रा.जी. पी. मुपकलवार, श्रीमती सुमन दुबे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. लोमटे म्हणाले, पुस्तके आपणाला एकत्र आणण्याचे काम करतात. ग्रंथ वाचनातून ऊर्जा मिळते. जीवनात पुस्तके दृष्टी देतात. दृष्टी असेल तर अनेक महत्वाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम ते करतात. कला, साहित्य, संस्कृती हे एकमेकास पूरक असून ते हातात हात घालून चालत असतात. कला आयुष्य उजळून टाकतात. पुस्तक हे आपले आयुष्य बदलते. संत ज्ञानेश्वरी, तुकारामाची अभंग गाथा ही मराठीची समृध्द परंपरा आहे. ज्ञानदीप लावू जगी या म्हणीप्रमाणे संत नामदेवांनी मराठी साहित्य समृध्द करण्याचे काम केले आहे. मराठी साहित्याला संत साहित्याची दिशा असल्यामुळे मराठी साहित्य समृध्द आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही आनंदाची बाब आहे. त्यामुळे खरे ज्ञान हे पुस्तकात आहे. पुस्तके आरपार दृष्टी देण्याचे काम करतात. शहीद भगतसिंग यांना फाशीची शिक्षा झाल्यानंतर त्यांनी पुस्तक वाचनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावरुन क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांची ज्ञानावरची निष्ठा दिसून येते. ज्ञानावरची निष्ठा खरे आदर्श आहे. पुस्तके वाचली पाहिजेत. ज्ञान हे सगळ्यात मोठी संपत्ती आहे. त्यामुळे ज्ञान हे कशानेही कमी होत नाही. त्यामुळे ग्रंथ हेच सगळ्यात मोठी संपत्ती असल्यामुळे सर्वांनी ग्रंथाचे वाचन करावे. ग्रंथाचे मंथन, चिंतन व्हावे, ग्रंथाविषयी प्रेम वाढावे, या हेतूने हा ग्रंथोत्सव अत्यंत प्रेरणादायी आहे. संत नामदेव महाराजामुळे हिंगोलीची ओळख संपूर्ण देशात झाली आहे. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना मोबाईल आणि टीव्ही वापरापासून दूर ठेवले पाहिजे. तरुण पिढीला ग्रंथ वाचनाकडे वळविणे गरजेचे असल्याचे सांगितले. मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी वाचन संस्कृती रुजवा- पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे ग्रंथ हे आपल्याला दिशा देतात. त्यामुळे ग्रंथाचे वाचन करण्याची गरज आहे. ग्रंथ हे मनाला आनंद देण्याचे काम करतात. मुलांच्या आवडीनुसार मुलांना पुस्तके वाचायला देऊन त्यांच्यामध्ये पुस्तके वाचण्याची आवड निर्माण करावी लागणार आहे. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासोबतच वाचन संस्कृती रुजविण्यासाठी ग्रंथ वाचन आवश्यक असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले. या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचन चळवळ विकसित होईल व त्यातून व्यक्तीमत्व विकास साधता येईल. पालकांनी पुस्तके खरेदी करावीत व त्यांचे वाचन करावे आणि आपले भविष्य उज्ज्वल करावे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी म्हणाले, सध्या समाज माध्यमाचा वापर वाढला आहे. त्यातूनही त्याला विविध पर्याय आहेत. त्यामुळे पुस्तके वाचण्यासाठी स्टोरी टेल यासारखे विविध व्यासपीठ उपलब्ध झाले आहेत. याचा वापर करुनही पुस्तके वाचता येतात. त्यामुळे ग्रंथ वाचने आवश्यक असून ही ग्रंथ चळवळ लोकापर्यंत पाेहोचविणेही तितकेच महत्वाचे आहे. विविध मान्यवर लेखकांची पुस्तके वाचून आपले ज्ञान वाढवले पाहिजेत. ज्ञानाचा गाभारा ग्रंथ आहेत. पुस्तके वाचल्याशिवाय संस्कृती समजत नाही. पुस्तकाच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत ज्ञान पोहोचले पाहिजेत, असे सांगितले. यावेळी गजेंद्र बियाणी यांनी प्रत्येक घरात पुस्तके असली पाहिजेत. मुलांमध्ये पुस्तक वाचनाची आवड निर्माण करावी. ग्रंथावर प्रेम करण्यासाठी आवड निर्माण करावी, ग्रंथ हे आपणाला प्रकाशाची वाट दाखवतात. असे सांगितले. तर अशोक अर्धापूरकर यांनी मराठी भाषा टिकविण्यासाठी ग्रंथवाचन आवश्यक आहे. मराठी भाषेची गळचेपी थांबविण्यासाठी ग्रंथ चळवळ पालक व मुलांमध्ये रुजली पाहिजे, असे सांगितले. याप्रसंगी लेखिका सुमनताई दुबे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ग्रंथांमध्ये पिढ्या घडविण्याची ताकद आहे. त्यामुळे ग्रंथ चळवळीचा प्रचार, प्रसार व्हावा म्हणून ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. नामदेव दळवी यांनी केले, तर सर्व उपस्थितांचे आभार गजानन शिंदे यांनी मानले. यावेळी सुमन दुबे लिखित ‘बैरंग लिफाफे’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गंगादेवी देवडा अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयाचे प्रतिनिधी, ग्रंथपाल, पत्रकार, शिक्षक, विद्यार्थी, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित ग्रंथदिंडीला उस्फूर्त प्रतिसाद ग्रंथोत्सवानिमित्त आज सकाळी येथील कै. रं.रा.बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयापासून ते जुनी नगर परिषद येथून ग्रंथोत्सव कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत ग्रंथदिडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीचे उद्घाटन जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक यांच्या हस्ते ग्रंथाचे पूजन करुन करण्यात आले. या ग्रंथदिंडीला शालेय विद्यार्थी, नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या ग्रंथदिंडीमध्ये सरजूदेवी भिकूलाल भारुका आर्य कन्या विद्यालय, सत्यनारायण विद्या मंदीर, सिध्देश्वर वारकरी संस्था सापडगाव, शांताबाई मुंजाजी दराडे माध्यमिक विद्यालय, गुरुदास काम माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या ग्रंथदिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी अत्यंत सुदर असे वेशभूषा, लेझीम नृत्य सादर केले. या ग्रंथोत्सवामध्ये शासकीय ग्रंथागार छत्रपती संभाजीनगर, बालभारती पाठ्यपुस्तक मंडळ, जिल्हा माहिती कार्यालयाचे लोकराज्य मासिकाचे स्टॉल, अभंग पुस्तकालय, श्री गणेश बुक डेपो, विद्याधन प्रकाशन, प्रगती बुक डेपो, सार्थक बुक सेल्स यासह विविध पुस्तकाचे स्टॉल लावण्यात आले आहेत. यावेळी शासकीय ग्रंथ भांडाराचेही मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच मान्यवरांनी येथे लावलेल्या ग्रंथ स्टॉल भेटी देवून ग्रंथांची पाहणी केली. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, माहिती सहायक चंद्रकांत कारभारी, कैलास लांडगे उपस्थित होते. ******

27 January, 2025

जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरात 31 जानेवारी रोजी स्वच्छता श्रमदान

हिंगोली (जिमाका), दि. 27 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसात विविध अशा सात कलमी कार्यक्रमांतर्गत दि. 31 जानेवारी, 2025 रोजी सकाळी 7 ते 9 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरात स्वच्छता श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासकीय इमारतीमधील सर्व विभाग प्रमुख यांनी आपल्या अधिनस्त सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासह दि. 31 जानेवारी, 2025 रोजी सकाळी 7 ते 9 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत. ******

करिअर मार्गदर्शन व रोजगाराच्या संधी या विषयावर ऑनलाईन शिबीर 31 रोजी

हिंगोली (जिमाका), दि. 27 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर मार्फत शंभर दिवसात राबविण्यात येणाऱ्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत करिअर मार्गदर्शन व रोजगाराच्या संधी या विषयावर दि. 31 जानेवारी, 2025 रोजी दुपारी 2 ते 3 या वेळेत https://meet.google.com/sxw-gend-sdm या लिंकवर ऑनलाईन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये नवनाथ टोनपे, यंग प्रोफेशनल, मॉडेल करिअर सेंटर, हिंगोली हे मार्गदर्शन करणार आहेत. या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचा लाभ घेण्यासाठी meeting URL: https://meet.google.com/sxw-gend-sdm या ऑनलाईन लिंकवर क्लिक करावे. आपल्याकडे गुगल मीट ॲप (google meet app) यापूर्वी इन्स्टॉल केलेले नसेल तर इन्स्टॉल करुन घ्यावे. आपण गुगल मीट ॲप (google meet app) मधून कनेक्ट झाल्यानंतर आस्क टू जॉइन (Ask to join) वर क्लिक करावे. या सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी 10 मिनिटे अगोदर जॉईन करावे. दिलेल्या लिंकमधून कनेक्ट झाल्यावर लगेच आपला व्हिडिओ व माईक बंद करावा. सत्राच्या शेवटी काही प्रश्न विचारावयाचे असल्यास माईक सुरु करुन विचारावे व लगेच माईक बंद करण्याची दक्षता घ्यावी. प्रश्न विचारताना मोजक्या शब्दात विचारावेत. या सर्व सूचनांचे पालन करुन मार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी व्हावेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील उमेदवारांनी ऑनलाईन मोफत मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. रा. म. कोल्हे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. ******

निशुल्क ग्रंथालय सदृश्य अभ्यासिकेचा लाभ घ्यावा

हिंगोली (जिमाका), दि. 27 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर मार्फत शंभर दिवसात राबविण्यात येणाऱ्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील युवक, युवतीसाठी ग्रंथालय सदृश्य अभ्यासिका सुरु आहे. या ग्रंथालय सदृश्य अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षा, बँकीग, रेल्वे विभाग, चालू घडामोडी, वर्तमानपत्रे व मासिके इत्यादी विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत. तसेच सुशिक्षित युवक व युवतींना रोजगार व स्वंयरोजगार मार्गदर्शन शिबीर व ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशनाचे नियमितपणे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील गरजू युवक व युवतींनी या निशुल्क ग्रंथालय सदृश्य अभ्यासिकेत प्रवेश करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय मध्यवर्ती इमारत, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा अथवा 02456-224574 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी केले आहे. ******