21 March, 2025

विशेष लेख - उष्माघात टाळा , आरोग्य सांभाळा

सध्या उन्हाळा सुरु झाला असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. भारतात हवामान खाते व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या निकषानुसार मैदानी भागात 40 डिग्री अंश सेल्सीअस, डोंगराळ भागात 30 डिग्री अंश सेल्सीअसपेक्षा व समुद्र किनारी भागात 37 अंश डिग्रीपेक्षा जास्त तापमान जात असल्यास त्यास उष्मलाट प्रवण क्षेत्र मानले जाते. उष्मा-लहर ही वातावरणीय तापमानाची स्थिती आहे. ज्यामुळे शारीरिक ताण येतो, ज्यामुळे कधीकधी मानवी जीवनावर अतिशय विपरीत परिणाम होत असतो. कोणत्याही ठिकाणचे कमाल तापमान सलग दोन दिवस 45 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहिल्यास त्याला उष्मा लहरी स्थिती म्हणतात. वाढत्या तापमानामुळे उन्हात फिरणाऱ्या व्यक्तीला उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची काळजी, उपाययोजना याची माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या तापमानाचा पारा 37 ते 39 अंशापर्यंत पोहोचला आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात तापमानाचा पारा पुढील तीन महिने 42 ते 45 अंशांच्या घरात राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या शेतीची कामे सुरू असून शेतमजूर आणि शेतकरी उन्हाची पर्वा न करता शेतात राबतात. त्यामुळे त्यांना उष्माघाताचा फटका बसण्याची सर्वाधिक शक्यता असते. त्यामुळे उष्माघाताचा लोकांना त्रास होऊ नये, यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरू केले आहेत. उष्माघात कक्षात रुग्णांसाठी बेड, कुलर, थंड पाण्याची व्यवस्था, फॅन यासह औषधोपचारासाठी आवश्यक असलेली सर्व सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. उष्माघात होण्याची कारणे : शारीरिक श्रमाची, अंग मेहनतीचे व कष्टाची कामे करणे, कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संपर्क येण्याने उष्माघात होऊ शकतो. लक्षणे : मळमळ, उलटी, हात पायात गोळे येणे, थकवा येणे, 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त ताप येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे, क्वचित लाल होणे, घाम न येणे, डि-हायड्रेशन, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे, रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थ, बेशुद्धवस्था इत्यादी लक्षणे आहेत. अति जोखमीच्या व्यक्ती बालके, लहान मुले, खेळाडू, सतत उन्हात काम करणाऱ्या व्यक्ती, वयस्कर व्यक्ती ज्यांना हृदय रोग, फुप्फुसाचे विकार, मूत्रपिडाचे विकार अशा व्यक्तींना अति जोखीम आहे. प्रतिबंधात्मक उपाय : वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळणे व शक्य नसल्यास थोड्या वेळाने सावलीत विश्रांती घेऊन पुन्हा काम करावे. कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत. उष्णता शोषून घेणारे कपडे (काळ्या किंवा भडक रंगाचे) वापरू नयेत. सैल पांढरे किंवा फिक्कट रंगाचे सूती कपडे वापरावेत. तीव्र उन्हाच्या वेळेस बाहेर जाणे टाळावे. बाहेर प्रवासाला जाताना पाणी सोबत ठेवावे. पाणी भरपूर प्यावे. डि-हायड्रेशन होऊ देऊ नये, लिंबू सरबत, लस्सी, ताक, नारळ पाणी इत्यादी प्यावे. उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, छत्री इत्यादीचा वापर करावा. घरामध्ये कामाच्या ठिकाणी कुलर्स, एअर कंडिशनर्स, वाळ्याचे पडदे यांचा वापर करावा. पार्क केलेल्या वाहनांमध्ये मुले किंवा पाळीव प्राण्याना सोडू नका. उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा. उपचार : रुग्णास प्रथम सावलीत आणावे, रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी त्वरित उपचार सुरू करावेत, रुग्णाचे कपडे सैल करुन त्वरित अंग थंड पाण्याने शरीराचे तापमान कमी होईपर्यंत पुसत राहावे. रुग्णास हवेशीर व थंड खोलीत ठेवावे, खोलीतील पंखे, कुलर्स, एअर कंडिशनर्स त्वरित चालू करावेत. रुग्ण शुद्धीवर आसल्यास त्यास थंड पाणी, जल संजीवनी द्यावे व डि-हायड्रोशन टाळावे. चहा, कॉफी देवू नये. रुग्णाच्या काखेखाली आइस पॅक ठेवावेत, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याचा पट्टया ठेवाव्यात. थर्मामीटरने रुग्णाचे तापमान बघत राहावे व 36.8 सेल्सिअस तापमान होईपर्यंत वरील उपचार चालू ठेवावेत. नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा. रुग्णास रुग्णालयात भरतीची गरज पडल्यास 108 ॲम्बुलन्ससाठी कॉल करावा. उष्माघात ही गंभीर स्थिती असून वेळीच उपचार न केल्यास जीवघेणा ठरू शकतो. त्याची लक्षणे ओळखून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. गरम वातावरणात स्वतःची काळजी घेणे आणि इतरांनाही सावध करणे गरजेचे आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी तीव्र उन्हात फिरु नये, आरोग्याची काळजी घ्यावी. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी वरील सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी केले आहे. संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली *******

20 March, 2025

महिला व बाल विकास विभागाची मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनाच नाही, नागरिकांनी फसव्या जाहिरातींना बळी न पडण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 20 : सध्या समाज माध्यमावर 'मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजने'च्या नावाने संदेश प्रसारित केले जात आहे. महिला व बाल विकास विभागाकडून मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना अस्तित्वात नाही. ही फसवी जाहिरात असून नागरिकांनी समाज माध्यमावर येणाऱ्या अशा फसव्या पोस्टवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. दि. 1 मार्च 2020 नंतर ज्यांचे दोन्ही पालक अथवा एक पालक मृत्यू झाला आहे आणि त्या बालकाचे वय 18 वर्षापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील दोन मुलांना बाल सेवा अंतर्गत दरमहा 4 हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेचे अर्ज तहसील कार्यालयामध्ये उपलब्ध करण्यात आल्याचे चुकीचे मेसेज व्हायरल होत आहे. अनाथ किंवा एकल पालक बालकांसाठी महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेबाबत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, कार्यालय एस. 7, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, हिंगोली येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी कोणत्याही फसव्या संदेशांना बळी पडू नये व आर्थिक व्यवहार करु नयेत. तसेच अनाथ किंवा एकल पालक बालकांसाठी महिला व बाल विकास विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनाकरीता कार्यालयांमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. *****

वसमत ग्रामीण पोलीस स्टेशन येथील बेवारस वाहनांची होणार लिलावाद्वारे विक्री

हिंगोली (जिमाका), दि. 20 : वसमत ग्रामीण पोलीस स्टेशन येथे अभिलेखावर नसलेल्या परंतु पोलीस स्टेशन परिसरात पडून असलेल्या बेवारस वाहनांची उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हिंगोली यांच्यामार्फत तपासणी केली असता सदरची वाहने खूप वर्षापासून पोलीस स्टेशनमध्ये पडून असल्याने त्यांचे नंबर प्लेट, चेसीस क्रमांक, इंजिन क्रमांक स्पष्ट दिसत नाही व खोडलेले असल्याने त्याचा मूळ मालक कोण आहे हे कळू शकले नाही. त्यामुळे पोलीस स्टेशन परिसरात बजाज सीटी-100, बजाज डिस्कव्हर सीटी-100, हिरो स्पेलेंडर, डिस्कव्हर, हिरो होंडा, टीव्हीएस, हिरो होंडा सीडी-100 व हिरो स्पेलेंडर सीडी-100 अशी एकूण 08 दूचाकी वाहने पडून आहेत. वरील वाहनांबाबत आजपर्यंत कोणीही मालकी हक्क किंवा त्यासंबंधी दस्तावेज सादर करुन मागणी केलेली नाही. त्यामुळे नजीकच्या काळात या बेवारस वाहनांची लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक , पोलीस स्टेशन वसमत ग्रामीण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. ******

मोटार सायकल संवर्गासाठी नवीन वाहन क्रमांक मालिका चालू

हिंगोली (जिमाका), दि. 20 : यापूर्वीची मोटार सायकल संवर्गासाठीची मालिका एमएच-38-एएच ही संपुष्टात आल्यामुळे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नवीन मालिका एमएच-38-एआय0001 ते 9999 ही मालिका चालू करण्यात येत आहे. ज्या वाहन मालकांना वाहनासाठी आकर्षक क्रमांक राखीव करावयाचा आहे. त्यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधून किंवा ऑनलाईन पध्दतीने आपला आकर्षक क्रमांक विहित शासकीय शुल्क भरुन राखीव करावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आश्विनी स्वामी यांनी केले आहे. ******

ग्राहकांनी नेहमी सजग व जागरुक राहण्याची गरज - जिल्हाधिकारी अभिनव गोयल

हिंगोली (जिमाका), दि. 20 : प्रत्येक क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक हा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे नागरिकांनी नेहमी सजग व जागरुक राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले. येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून ग्राहकांमध्ये जागृती आणण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जागतिक ग्राहक दिनाचे आज आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेंद्र अग्रवाल, ग्राहक तक्रार निवारण समितीचे सदस्य आर. व्ही. धबडे, मानवाधिकार संरक्षण समितीचे अध्यक्ष एम. एम. राऊत, सनदी लेखापाल महेश बियाणी, जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, सहायक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. गोयल म्हणाले, ग्राहकांमध्ये जनजागृती होण्यासाठी दरवर्षी जागतिक ग्राहक दिन साजरा केला जातो. त्यामुळे नागरिकांनी प्रत्येक उत्पादनाची गुणवत्ता तपासून खरेदी करावी. सेवा पुरवणाऱ्या संस्थांकडून योग्य सेवा पुरवल्या जात नाहीत. नागरिकांनी वस्तू खरेदी केल्यानंतर पक्के बिल घ्यावे. तसे केल्यास शासनाकडे महसूल जमा होतो. त्यामुळे विविध सेवा, योजना पुरविताना शासनाकडून चांगल्या दर्जाच्या सोयीसुविधा पुरवल्या जाऊ शकतात. त्यासाठी दरमहा शाळेमध्ये सायबर सह विविध विषयावर कार्यशाळा घेण्यासाठी नियोजन करुन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी. नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी केंद्र शासनाने जनतेची गा-हाणी (पब्लिक ग्रिव्हान्सेस) पोर्टल आणि राज्य शासनाने आपले सरकार पोर्टलची निर्मिती केली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारची तक्रार असेल तर पोर्टलवर करावी. त्याचे वेळीच निराकरण करण्यात येईल, असे सांगितले. सायबर सुरक्षा विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांनी ऑनलाईन खरेदी करताना, कर्ज घेतांना तसेच फेसबूक, इन्स्टाग्रामचा दुरुपयोग करुन फसवणूक होत आहेत. त्यामुळे समाज माध्यमाचा वापर काळजीपूर्वक करावा. सायबर फसवणुकीत होणारे धोके सद्यस्थितीत गुंतागुंतीचे आहेत. त्यामुळे सद्सदद्विवेकबुद्धीचा वापर करावा. आमिषांपासून दूर राहावे. पासवर्ड मजबूत ठेवावे. विनाकारण कोणत्याही साईट्स शोधू नये, अनोळखी कॉल्सपासून सावध राहावे. सायबर चोरांनी आर्थिक फसवणूक केल्यास १९३० वर संपर्क साधण्याचे आवाहन केले. तसेच सायबर फसवणूक होत असल्याचे आपल्या लक्षात येताच जवळच्या सायबर शाखेशी किंवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे सांगितले. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सदस्य श्री. आर. व्ही. धबडे यांनी बोलताना म्हणाले, शेवटच्या माणसाच्या कल्याणासाठी व ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग स्थापन केले आहे. दैनंदिन जीवनाशी हा कायदा सुसंगत असून याची जनजागृती होणे गरजेचे असल्याचे सांगून आपली फसवणूक झाल्यास, वस्तू व सेवा देण्यात त्रुटी आढळून आल्यास आपणाकडे असलेल्या पक्क्या बिलासह जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार द्यावी, त्याचे वेळीच निराकरण करण्यात येईल, असे सांगितले. सनदी लेखापाल महेश बियाणी यांनी शासनाने जुनी पेन्शन बंद करुन एनपीएस प्रणाली लागू केली. या एनपीएस प्रणालीबाबत सविस्तर माहिती दिली. ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश अग्रवाल यांनी ग्राहकांची पिळवणूक थांबविण्यासाठी ग्राहक चळवळीचे प्रणेते बिंदू माधव जोशी यांच्या अथक प्रयत्नातून ग्राहक तक्रार निवारण कायदा अस्तित्वात आला आहे. त्या कायद्यामध्ये असलेल्या सहा अधिकार सांगून कायद्याचे महत्त्व विशद केले. तसेच ग्राहकांनी खरेदी करतांना उत्पादने गुणवत्तापूर्ण असल्याची खात्री करुनच खरेदी करावेत, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. विजय निलावार यांनी केले व शेवटी जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन व ग्राहक चळवळीचे प्रणेते बिंदु माधव जोशी आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. *******

18 March, 2025

हळद पिकासाठीचे प्रशिक्षण संपन्न

हिंगोली (जिमाका), दि. 18 : मसाला मंडळ, प्रादेशिक कार्यालय मुंबई आणि कृषि विज्ञान केंद्र तोंडापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हळद पिकासाठी 'उत्तम कृषि पद्धती आणि स्वच्छ हळद प्रक्रिया' या विषयावर एक दिवसीय शेतकरी क्षमता वृध्दी प्रशिक्षण कार्यक्रम कृषि विज्ञान केंद्र तोंडापूर येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. यावेळी मुंबई मसाले बोर्डाचे विस्तार सहायक किशोर कुमार यांनी स्पाइसेस बोर्डाचे कार्य, उद्देश, 52 विविध स्पाइसेस बोर्डमध्ये समाविष्ट आहेत, तसेच 26 राज्यामध्ये हे बोर्ड कार्य करत आहे व स्पाइसेस पार्क, हळदीचे बॉयलर, पॉलिशर व त्याकरिता असलेल्या अनुदानाविषयी माहिती दिली. मा. बाळासाहेब ठाकरे हळद (हरीद्रा) संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे तंत्र अधिकारी रमेश देशमुख यांनी भौगोलिक मानांकन असलेली वसमत हळद, त्यांची काही उदाहरणे, हळदीच्या विविध वाणाचे महत्त्व व त्याची लागवड करण्याची पध्दत, चांगल्या स्वच्छता पद्धतीने हळद प्रक्रिया ज्यामध्ये जागेची निवड, बियाणे आणि लागवड साहित्य, लागवडीसाठी पिक व्यवस्थापन व कीटकनाशक वापरताना घ्यावयाची काळजी या विषयावर सविस्तर माहिती दिली. श्री दत्तगुरू शेतकरी उत्पादक कंपनी, कळमनुरीचे संचालक गंगाधर श्रृंगारे यांनी हळद उत्पादन कसे वाढवायचे, त्याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करावा. दर दिवशी माणसाला 10 ग्राम प्रती दिवस प्रति व्यक्ती हळद लागते. हे प्रमाण आपण 20 ग्राम प्रती माणशीवर नेऊ शकल्यास जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब ठरेल. त्याकरिता आपण योग्य हळदीचे व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. उद्यानविद्या विषय विशेषज्ञ अनिल ओळंबे यांनी मार्गदर्शन करतांना हळदीचे प्रकार, महत्व, खाण्याची हळद, देशातील हळदीची लागवड आणि उत्पादन, हिंगोली जिल्ह्याचे वर्षनिहाय लागवड क्षेत्र, उत्पादकता वाढविण्याचे सूत्रे, हवामान सरासरी 25 ते 35 अंश सेल्सिअस तापमानामध्ये पिकाची वाढ चांगली होते, चुनखडीयुक्त जमीन लागवडीकरिता टाळावी, माती परीक्षण, पूर्व मशागत, सुधारित वाणाची निवड, योग्य बेण्याची निवड, बेणे प्रक्रिया, जमीन चुनखडीयुक्त जमीन टाळावी, पूर्व मशागत, सुधारित वाणाची निवड, लागवडीची वेळ, तण नाशकाचा वापर, एकात्मिक खत, कीड व रोग व्यवस्थापन तसेच मागील चार वर्षापासून हळदीच्या भावामध्ये चढउतार होत आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी चांगली प्रतीच्या हळदीचे उत्पादन घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अतुल मुराई व आभार प्रदर्शन अनिल ओळंबे यांनी केले. तालुका कृषि अधिकारी महादेव कुंभार, संजय शिंदे, मसाले विस्तार प्रशिक्षणार्थी सूरज गमरे तसेच हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावातील हळद लागवड शेतकरी व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. *******

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कालावधी आता 11 महिन्याचा • प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना पुढील 5 महिन्यासाठी नियुक्ती देतांना निर्देशाचे पालन करावे

हिंगोली (जिमाका), दि. 18 : राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 11 महिने करण्यास दिनांक 10 मार्च, 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेत पुन्हा रुजू झाल्याच्या दिनांकापासून 5 महिन्याच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण अनुज्ञेय असेल. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पुढील 5 महिन्याकरिता नियुक्ती देतांना खालील बाबींची नोंद घ्यावी. या योजनेअंतर्गत सद्यस्थितीत जे उमेदवार कार्यप्रशिक्षण घेत आहेत, त्यांचा कार्यप्रशिक्षण कालावधी ते रुजू झाल्याच्या दिनांकापासून 11 महिने असा असेल याची दक्षता आपल्या स्तरावरून घेण्यात यावी. तसेच ज्या प्रशिक्षणार्थीचा 6 महिन्याचा प्रशिक्षण कालावधी यापूर्वीच पूर्ण झाला आहे. अशा उमेदवारांना पुढील 5 महिन्याच्या प्रशिक्षणासाठी सबंधित आस्थापनेत रूजू होण्याकरिता उमेदवारांना दि. 30 एप्रिल 2025 पूर्वी रूजू करून घेवून आस्थापनेच्या लेटर हेडवर नियुक्ती आदेश हार्ड कॉपीसह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालय हिंगोली येथे प्रत्यक्ष जमा करावे. या योजनेत यापूर्वी सहभागी असलेल्या खाजगी आस्थापनांनी सर्टीफिकेट ऑफ इनकार्पोरेशन (Certificate of incorporation), उद्यम आधार व ईपीएफ, ईएसआयसी, जीएसटी, डीपीआयटी यापैकी एक अशा प्रकारे किमान दोन प्रमाणपत्र विभागाच्या https://www.cmykpy.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर शासन निर्णयाच्या दिनांकापासून ३० दिवसाच्या आत सादर करावे. उमेदवार रूजू होते वेळी तो संबंधित आस्थापनेत तसेच सदर आस्थापनेशी सबंधित इतर आस्थापना, कार्यालयात यापूर्वी कधीही कायम, तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत नसल्याबाबतचे तसेच, कुठलाही हितसबंध नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य राहील. तसेच संबंधित आस्थापनेनेही कार्य प्रशिक्षणासाठी रूजू होणारा प्रशिक्षणार्थी यापूर्वी सदर आस्थापनेत अथवा सदर आस्थापनेशी संबंधित इतर आस्थापना, कार्यालयात कायम, तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आनिवार्य राहील. वरील दोन्ही प्रमाणपत्र संबंधित आस्थापनेने उमेदवार रूजू झाल्याच्या दिनांकापासून 15 दिवसाच्या आत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, एस-3 दुसरा माळा, हिंगोली या कार्यालयास सादर करावे. अधिक माहितीकरिता कार्यालयाच्या 02456-224574 या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे अवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर हिंगोली या विभागाचे सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे. ******