22 January, 2026

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रम स्थळी जाण्यासाठी मोफत वाहतूक सुविधा; 


भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन


नांदेड दि.२२ जानेवारी:-“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित भव्य व ऐतिहासिक कार्यक्रम असर्जन परिसरातील मोदी मैदानावर संपन्न होणार आहे.

या पावन शहीदी समागमास नांदेड शहरासह आजूबाजूच्या ग्रामीण भागातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, त्यांच्या सोयीसाठी नांदेड शहर व परिसरातील विविध गावे व ठिकाणांहून कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी २०० पैक्षा अधिक वाहनांची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. यात स्कुलबस व इतर वाहनांचा समावेश आहे.

या मोफत वाहतूक सुविधेमुळे भाविकांना सुरक्षित, सुलभ व वेळेत कार्यक्रमस्थळी पोहोचता येणार असून, ज्येष्ठ नागरिक, महिला व कुटुंबीयांसाठी ही व्यवस्था विशेष लाभदायक ठरणार आहे.

तरी सर्व भाविक व नागरिकांनी या मोफत वाहतूक सुविधेचा लाभ घ्यावा व धर्म, मानवता आणि बलिदानाच्या या ऐतिहासिक शहीदी समागम कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी केले आहे.

००००००

 श्री गुरु तेग बहादूर साहिबजी शहीदी समागम पार्श्वभूमीवर २४ जानेवारी रोजी नांदेड तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी


नांदेड दि.२२ जानेवारी:-“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त असर्जन परिसरातील मोदी मैदानावर भव्य व ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या पावन शहीदी समागमासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक नांदेड येथे उपस्थित राहणार असल्याने शहर व तालुक्यात मोठी वर्दळ अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी तसेच वाहतूक व सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने शनिवार, दि. २४ जानेवारी रोजी नांदेड तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे विद्यार्थी, पालक व नागरिकांना कोणतीही अडचण होऊ नये, तसेच कार्यक्रमाचे आयोजन सुव्यवस्थित आणि शांततेत पार पडावे, हा यामागील उद्देश आहे.

तरी सर्व नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा व धर्म, मानवता आणि बलिदानाच्या या ऐतिहासिक शहीदी समागमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी केले आहे.

०००००


 ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहेब यांचा ३५० वा शहीदी दिन – महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाचे मनिंदर पाल सिंग यांच्याकडून कौतुक


पुणे , दि. २२ (जिमाका वृत्तसेवा):‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्या ३५० व्या शहीदी दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाबद्दल सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस मनिंदर पाल सिंग यांनी समाधान व्यक्त करत शासनाचे मनापासून अभिनंदन केले.

आज पुणे ग्रँड टूरच्या तिसऱ्या टप्याचे सासवड ते बारामती हे १३७ किलोमीटरच्या स्पर्धेच्या वेळी ही प्रतिक्रिया दिली.

नांदेडच्या पवित्र भूमीवर श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्या विचारांचा आणि बलिदानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणारा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, ही बाब प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. गुरु तेग बहादूरजींनी धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवतेसाठी दिलेले बलिदान सर्वांनी जाणून घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

पुणे ग्रँड टूरचा संदर्भ देऊन ते म्हणाले की, गुरु तेग बहादूरजींची विचारधारा ही समाजात एकता, बंधुभाव आणि धार्मिक सौहार्द टिकवण्याची प्रेरणा देणारी आहे. त्याच विचारधारेतून सायकलिंगच्या माध्यमातून एकात्मतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील जनतेने तसेच प्रशासनाने गुरुजींच्या विचारांचा प्रसार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल मनिंदर पाल सिंग यांनी आभार मानले. नांदेड येथे २४ तारखेला होणारा मुख्य सोहळा यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गुरु तेग बहादूर साहेब यांनी दिलेला धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवतेचा संदेश आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा असून, तो खेळाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवला जात आहे, ही समाधानाची बाब असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

*******

 हिंगोली जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रमांतून ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी


हिंगोली, दि. २२ (जिमाका) : ‘हिंद दी चादर’ या नांदेड येथे‌ आयोजित गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी भव्य व ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक व सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हिंगोली जिल्हा प्रशासनाकडून विविध स्तरावर व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. शहरात ठिकठिकाणी होर्डिंग्ज व बॅनर लावून कार्यक्रमाची प्रसिद्धी करण्यात आली असून नागरिकांमध्ये या उपक्रमाबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी वारकरी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, शिक्षण विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन, वक्तृत्व, चित्रकला, घोषवाक्य लेखन आदी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक सलोखा, देशभक्ती व ऐतिहासिक जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव देवेंद्र फडणवीस, नरहरी झिरवाळ तसेच राहुल गुप्ता यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या सन्मानामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळून सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये अधिक सक्रिय सहभाग घेण्याची प्रेरणा मिळणार आहे.

जिल्हा प्रशासनाच्या या उपक्रमांमुळे ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाचा संदेश घराघरात पोहोचत असून सामाजिक एकात्मता, सांस्कृतिक जाणीव व राष्ट्रीय ऐक्य मजबूत करण्यास मोठी मदत होत असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

**** 




नैसर्गिक आपत्ती, अनुदानासाठी तात्काळ  ईकेवायसी करा- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता



• जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांची दुचाकीवरून ‘जलजीवन’ कामांची पाहणी


हिंगोली, दि. २२ (जिमाका) : गतवर्षी झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान खात्यावर मिळण्यासाठी तात्काळ ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन  जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले. तसेच मुख्यमंत्री पाणंद रस्ते व शेतरस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

या गावभेटी दौऱ्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, उप मुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड, संजय कुलकर्णी, विजय बोरोटे, जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील, गटविकास अधिकारी गणेश बोथीकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील माळेगाव, बिबगव्हाण, कळमनुरी, झरा, तुप्पा, नवखा व शिवणी बु. या गावांचा जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी आज गावभेटींवर भर देत दौरा करून ग्रामीण भागातील विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, महसूल व सेवाविषयक कामांचा सखोल आढावा घेतला.

माळेगाव येथील जलजीवन मिशनची झालेली कामे पाहण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दुचाकीवर बसून प्रत्यक्ष कामाची पाहणी केली.

दौऱ्यादरम्यान नैसर्गिक आपत्ती, सार्वजनिक वितरण प्रणाली, संजय गांधी निराधार योजना आदी योजनांतर्गत प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्वरित निराकरण करण्याच्या सूचना करण्यात आल्या.

जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या दप्तर तपासणीसह ई-चावडी, ई-हक्क प्रणाली, ई-फेरफार (नोंदणीकृत व अनोंदणीकृत) प्रकरणांची तपासणी करून ती तात्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले. नागरिकांच्या निवेदनांवर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यात आली. तसेच तीन स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करून लाभार्थ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले.

तुप्पा येथील जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली असून केवळ वीज जोडणी अभावी नागरिकांना पाणीपुरवठा सुरू होऊ शकलेला नाही, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. यावर महावितरणला तात्काळ वीजजोडणी करून देत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश देण्यात आले.

या दौऱ्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचून त्यावर तातडीने उपाययोजना केल्या जाणार असून, शासकीय सेवा अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी नमूद केले.

*****









हिंद दी चादर कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन



हिंगोली, दि. 22 (जिमाका): हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त भव्य व ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन दि.24 व 25 जानेवारी 2026 रोजी मोदी मैदान, वाघाळा –नांदेड येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील जास्तीत-जास्त सर्व समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन क्षेत्रिय समितीचे अशासकीय सदस्य ॲङ संतोष राठोड यांनी केले आहे. 

नांदेड येथे तख्त श्री हुजूर साहिब हिंद दी चादर, श्री गुरु तेग बहादूर साहिबजी 350 वी शहीदी राज्यस्तरीय समिती, समस्त गुरु नानक नाम लेवा संगत, शिख, सिकलकर, लभाना, बंजारा, मोहयाल, सिंधी, उदासीन, तथा नामदेव भगत, आणि वाल्मिकी संप्रदाय समाज महाराष्ट्र आयोजित कार्यक्रमात वरील सर्व समाजबांधवांनी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे. या भव्य व ऐतिहासिक कार्यक्रमातून मानवता, धर्मरक्षण सर्वधर्म समभावाची शिकवण वृद्धिंगत होणार आहे, असे श्री. राठोड यांनी सांगितले. 

 श्री. गुरु तेग बहादूर साहिब यांच्या या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह विविध राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्री या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. श्री गुरु तेग बहादूर यांच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करण्यासाठी आणि ते ‘याची देही, याची डोळा’ पाहण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त सर्वधर्मिय भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन अशासकीय सदस्य ॲङ संतोष राठोड यांनी केले आहे. 

******

21 January, 2026

 हिंद-दी-चादर” कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांची कार्यक्रमस्थळी पाहणी

तयारी अंतिम टप्यात


नांदेड, दि. २१ जानेवारी:-“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचा भव्य कार्यक्रम दि. २४ व २५ जानेवारी रोजी नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी नांदेड येथे मोठ्या प्रमाणावर भाविक येणार असल्याने, त्यांच्या सोयी-सुविधांच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कामांची पाहणी आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कार्यक्रम स्थळी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मैदानाची सज्जता, प्रवेश व निर्गमन मार्ग, वाहनतळ व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, सुरक्षा व आपत्कालीन व्यवस्थापन,लंगर व्यवस्था, मुख्य मंडप आदी बाबींच्या कामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. 

भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने व काटेकोरपणे काम वेळेत  पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व यंत्रणा सज्ज असून, कार्यक्रमपूर्व तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

०००००