25 January, 2026
24 January, 2026
22 January, 2026
शहीदी समागम कार्यक्रमासाठी भव्य लंगरची व्यवस्था
लाखो भाविकांसाठी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब व लंगर साहिब गुरुद्वारांकडून मोफत भोजन सेवा
नांदेड, दि. २२ जानेवारी :- नांदेड येथे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त २४ व २५ जानेवारी रोजी मोदी मैदानावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही दिवशी नांदेडमध्ये दाखल होणाऱ्या लाखो भाविकांच्या भोजनासाठी १२ भव्य लंगरची व्यवस्था करण्यात आली असून, ही सेवा तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा व लंगर साहिब गुरुद्वारा यांच्या वतीने पुरविण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पार्किंग स्थळांपासून रेल्वे स्थानक, बसस्थानक व विमानतळ परिसरात विविध ठिकाणी मोफत सेवा स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. याशिवाय तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा तसेच गुरुद्वारा लंगर साहिब येथेही भाविकांसाठी भोजनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच या दोन गुरुद्वारांद्वारे भव्य निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या मोफत लंगर सेवेचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा अबचलनगर, नांदेडचे मुख्य जथ्थेदार संत बाबा कुलवंत सिंगजी तसेच गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदर सिंगजी यांनी केले आहे.
०००००
‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमानिमित्त २४ व २५ जानेवारी रोजी नांदेड शहरात वाहतूक नियमन
नांदेड, दि. 22 जानेवारी :- “हिंद-दी-चादर” या कार्यक्रमानिमित्त दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड शहरात देशातील व राज्यातील अनेक अतिमहत्वाचे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दिल्लीच्या मुख्यमंत्री श्रीमती रेखा गुप्ता, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह इतर मान्यवरांचा समावेश आहे. हे सर्व मान्यवर नांदेड येथील मोदी मैदान येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास देश-विदेशातून मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल होणार असल्याने नांदेड शहरात वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील शांतता, सुव्यवस्था व वाहतुकीचे सुरळीत नियोजन राखण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत वाहतूक नियमनाबाबत अधिसूचना निर्गमित केली आहे.
या कालावधीत व्हीव्हीआयपी दौऱ्यादरम्यान तात्पुरत्या स्वरूपात आसना ब्रिज–शंकरराव चव्हाण चौक–गुरुद्वारा मालटेकडी रोड–मालटेकडी ओव्हरब्रिज, नमस्कार चौक ते नाईक चौक, अण्णाभाऊ साठे पुतळा, हिंगोली गेट ओव्हरब्रिज, चिखलवाडी चौक, आय.टी.आय. ते अण्णाभाऊ साठे पुतळा, अण्णाभाऊ साठे पुतळा ते नाईक चौक (आनंदनगरकडे), हिंगोली गेट अंडरब्रिज ते अण्णाभाऊ साठे पुतळा, चिखलवाडी ते हिंगोली गेट ओव्हर/अंडरब्रिज, चिखलवाडी ते गुरुद्वारा हनुमान मंदिर–भगतसिंग चौक, बर्की चौक ते जुना मोंढा मार्गे वजिराबाद, कविता हॉटेल ते जुना मोंढा कौठा, एम.जी. हेक्टर शोरूम ते साई कमान कौठा, भगतसिंग चौक ते श्रीराम चौक (पूर्व बाजू), अहिल्यादेवी होळकर चौक–मामा चौक, बी.डी.डी.एस. ऑफिस ते मामा चौक–श्रीराम चौक, लिंबगाव ते वाघी रोड–हसापूर मार्ग (कार्यक्रमास येणारी वाहने वगळून), रविनगर ते नागार्जुन शाळा तसेच कौठा चौकी ते रविनगर, बसवेश्वर पुतळा ते अहिल्याबाई होळकर चौक–पदमजासिटी–भगतसिंग चौक हे मार्ग वाहतुकीस बंद राहणार आहेत.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून चिखलवाडी–अण्णाभाऊ साठे पुतळा–नाईक चौककडे जाणारी वाहतूक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कोर्टाच्या पाठीमागून हिंगोली गेट अंडरब्रिज मार्गे गोकुळनगरकडे वळविण्यात येईल. तसेच वजिराबाद चौक–आय.टी.आप–नवीन मोंढा–महादेव दाल मिल मार्ग, महादेव दाल मिल रोड क्रमांक 26, शिवाजी महाराज पुतळा–रेल्वे स्टेशन–हिंगोली गेट, बसवेश्वर चौक ते लातूर फाटा, लिंबगाव–भवानी चौक–छत्रपती चौक मार्गे वाहतूक सुरू राहील.
नागरिकांनी दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले आहे.
000000
शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त 24 जानेवारी रोजी भव्य मिरवणूक
मिरवणूकीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी व फुलांची सजावट
नांदेड, दि. २२ जानेवारी :- नांदेड येथे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त 24 व 25 जानेवारी रोजी मोदी मैदानावर भव्य व ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमस्थळी दोन्ही दिवस श्री गुरुग्रंथ साहिब विराजमान राहणार आहेत.
या अनुषंगाने 24 जानेवारी रोजी सकाळी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा ते मोदी मैदान पर्यंत मिरवणूक काढण्यात येणार असून त्यावर हेलिकॉप्टरने पुष्पृष्टी करण्यात येणार आहे. संपूर्ण मिरवणूक मार्ग फुलांनी सजविण्यात येणार आहे.
ही भव्य मिरवणूक भाविकांसाठी श्रद्धा, भक्ती व आध्यात्मिकतेचा अविस्मरणीय अनुभव ठरणार असून, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
00000