29 November, 2018

जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेचे ऑनलाईन फॉर्म भरण्यास मुदतवाढ


जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेचे ऑनलाईन फॉर्म भरण्यास मुदतवाढ

हिंगोली, दि.29:जवाहर नवोदय विद्यालयाच्या सन 2019-20 साठी इयत्ता 6 वी च्या प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षा-2019 ची ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख ही काही प्रशासकीय कारणास्तव वाढविण्यात आली असून दि.15 डिसेंबर,2018 पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याकरीता मुदतवाढ करण्यात आली आहे. याची संबंधित मुख्याध्यापक, पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांनी केले आहे.
****

27 November, 2018

हिंगोली येथे ग्रंथ जत्रेचे आयोजन


हिंगोली येथे ग्रंथ जत्रेचे आयोजन

            हिंगोली,दि.27: जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत हिंगोली येथे ग्रंथ जत्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील वाचक प्रेमीना या निमित्त हस्तलिखित, दुर्मिळग्रंथ, दिवाळी अंकासह इतर दर्जेदार ग्रंथ या ग्रंथ जत्रेत उपलब्ध होणार आहेत. सदर ग्रंथ जत्रेचे आयोजन येथील नगर परिषदेच्या कल्याण मंडपम येथे शुक्रवार, दि. 30 नोंव्हेंबर, 2018 रोजी करण्यात आले असून, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतीकराव ठाले-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, प्रमुख पाहुणे प्रसिध्द समिक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे, ग्रंथालय संचालय सु.हि. राठोड, राजा राममोहन राय ग्रंथालय प्रतिष्ठानचे क्षेत्रिय अधिकारी अनंत वाघ, सहायक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे यांची उपस्थिती  राहणार आहे.
            यावेळी ग्रंथांचे प्रदर्शन व विक्री देखील  करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त वाचक प्रेमींनी या ग्रंथजत्रेस उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिलींद सोनकांबळे यांनी केले आहे.

****

‘हिंगोली ग्रंथोत्सव-2018’ चे आयोजन 30 नोव्हेंबर आणि 01 डिसेंबर रोजी होणार ‘ग्रंथोत्सव’


‘हिंगोली ग्रंथोत्सव-2018’ चे आयोजन
30 नोव्हेंबर आणि 01 डिसेंबर रोजी होणार ‘ग्रंथोत्सव’

        हिंगोली, दि. 27 : उच्च्‍ व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्या मार्फत ‘हिंगोली ग्रंथोत्सव-2018’ चे आयोजन करण्यात येणार आहे. ‘हिंगोली ग्रंथोत्सव-2018’ निमित्त शुक्रवार दिनांक 30 नोव्हेंबर, 2018 रोजी जिल्हा परिषद बहुविध प्रशाला ते हिंगोलीचे कल्याण मंडपम दरम्यान सकाळी 9.00 वाजता ग्रंथदिंडीचे आयेाजन करण्यात आले आहे. सदर ग्रंथ दिंडीत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी होणार असून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचा शुभारंभ करण्यात होणार आहे.
            याच दिवशी सकाळी 11.00 वाजता कल्याण मंडपम, हिंगोली येथे ‘हिंगोली ग्रंथोत्सव-2018’ उद्घाटन कार्यक्रम होणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी तर उद्घाटक म्हणून मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतीकराव ठाले-पाटील आणि प्रमुख पाहुणे, सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री हिंगोली जिल्हा दिलीप कांबळे आणि प्रसिध्द समिक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. तर जि.प. अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, खासदार राजीव सातव,  सर्वश्री आमदार रामराव वडकुते, विक्रम काळे,  सतिश चव्हाण,  विप्लव बाजोरीया, डॉ. जयप्रकाश मुंदडा, तान्हाजी मुटकुळे, डॉ. संतोष टारफे ,  नगर परिषदेचे अध्यक्ष बाबाराव बांगर,  मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, जिल्हा पोलीस अधिक्षक योगेशकुमार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, ग्रंथालय संचालक सु.ही. राठोड, आणि सहायक ग्रंथालय संचालक (औरंगाबाद विभाग) सुनिल हुसे यांची  प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
            याच दिवशी दुपारी 2.30 वाजता कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून यात प्रा. डॉ. संध्या रंगारी, रामचंद्र सावंत, प्रा. नामदेव वाबळे, डॉ. जब्बार पटेल, बबन मोरे, सुभाष बगाटे, प्रा. राजा बनसकर, कलानंद जाधव, शिलवंत वाढवे, मुरलीधर पंढरकर, शिवाजी घुगे, महारुद्र घेणेकर, रतन आडे, राजकुमार नायक, आण्णा जगताप, सौ. सिंधुताई दहिफळे, प्रकाश परसावाळे, श्रीराम कऱ्हाळे, प्रा. यु.एच. बलखंडे, महासेन प्रधान, शफी बोल्डेकर, धनंजय मुळे, प्रा. मारोती कोल्हे आदीं उपस्थित राहून आपल्या कविता सादर करणार आहेत.
            शनिवार दिनांक 1 डिसेंबर, 2018 रोजी सकाळी 9.00 वाजता ‘अभिरुची संपन्नता व प्रभावी वाचन’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात प्रा. डॉ. विलास डोईफोडे , शिवाजी पवार, प्रा. डॉ. शत्रुघ्न जाधव, प्रा. गोविंद भालेराव, नरेंद्र नाईक, प्रा. डॉ. माधव जाधव, प्रा. महेश मंगनाळे हे सहभागी होणार आहेत.
            तसेच दि. 1 डिसेंबर, 2018 रोजी सकाळी 11.30 वाजता ‘महात्मा गांधी आणि वाचन संस्कृती’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापूरकर आणि विजय वाकडे सहभागी होणार आहे.
            याच दिवशी दुपारी 2.00 वाजता कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून यात बबन शिंदे, हर्षवर्धन परसवाळे, विजय गुंडेकर, संगीता चौधरी, शिवाजी कऱ्हाळे,  सौ. कालिंदी वाघमारे, सुदाम खंदारे, गजानन भोयर, सौ. मीरा कदम, राज थळपते, प्रद्युम्न गिरीकर, विजय ठाकरे, अनिकेत देशमुख, प्रकाश दांडेकर, डॉ. सौ. वंदना काबरा, अभय भरतीया, मुरलीधर नगरकर, बबन दांडेकर, ज्ञानेश्वर लोंढे आणि चंद्रकांत कावरखे आदीं आपल्या कविता सादर करणार आहेत.
            जिल्ह्यातील जास्तीत-जास्त वाचक प्रेमींनी ‘हिंगोली ग्रंथोत्सव-2018’ कार्यक्रमास उपस्थित राहाण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिलींद सोनकांबळे यांनी केले आहे.
****

लघु उद्योग घटकांना जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन


लघु उद्योग घटकांना जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

           हिंगोली,दि.27: उद्योग संचालनालय महाराष्ट्र शासन यांचे वतीने दरवर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लघु उद्योग घटकांना प्रथम व द्वितीय पारितोषिक देऊन गौरविण्यात येते. यात प्रथम पुरस्कारासाठी रु. 15 हजार रोख व गौरवचिन्ह तसेच द्वितीय पुरस्कारासाठी रु. 10 हजार रोख व गौरवचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. सन 2017 व 2018 करीता जिल्हा पुरस्कारासाठी हिंगोली जिल्ह्यातील पात्र लघु उद्योग घटकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी खालील बाबींची पुर्तता करणे आवश्यक आहे.
            उद्योग घटकाची जिल्हा उद्योग केंद्र, कार्यालयाकडे स्थायी लघु उद्योग म्हणून तीन वर्षांपूर्वी म्हणजेच 2017 करीता दि. 1 जानेवारी, 2014 पूर्वी नोंदणी  झालेली असावी तसेच 2018 करीता दि. 1 जानेवारी, 2015 पूर्वीची नोंदणी झालेली असावी. उद्योग घटक मागील दोन वर्षांपासून उत्पादनात असणे आवश्यक आहे. उद्योग घटक कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. यापूर्वी ज्या उद्योग  घटकांना राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय  स्तरावर पुरस्कार मिळालेले नाहीत असेच उद्योग घटक जिल्हा पुरस्कारासाठी पात्र ठरतील. विहित नमुन्यातील अर्ज व अधिक माहितीकरीता जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली कार्यालयाकडे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर, 2018 आहे. सदर पुरस्काराकरीता वरील बाबींची पुर्तता करणाऱ्या जिल्ह्यातील पात्र लघु उद्योग घटकांनी या पुरस्कारासाठी अर्ज करावेत असे आवाहन यु. एस. पुरी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली यांनी केले आहे.

****

जिल्हा गोवर-रुबेला मुक्तीसाठी नागरिकांनी मोहिमेत सहभागी व्हावे - रूचेश जयवंशी गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या हस्ते शुभारंभ














जिल्हा गोवर-रुबेला मुक्तीसाठी नागरिकांनी मोहिमेत सहभागी व्हावे
                                                                         - रूचेश जयवंशी

·      गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या हस्ते शुभारंभ
                          
        हिंगोली,दि.27:  जिल्ह्यात आजपासून गोवर-रूबेला लसीकरण मोहीमेचा शुभारंभ होत असून, नागरिकांनी आपल्या 9 ते 15 वयोगटातील बालकांना ही लस देवून गोवर-रूबेला या गंभीर आजरापासून दूरू ठेवण्यासाठी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
            येथील जिल्हा परिदेच्या शाळेत गोवर-रूबेला लसीकरण मोहीमेच्या शुभारंभ कार्यक्रमात श्री. जयवंशी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, जिल्हा परषिदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार आदींची उपस्थिती होती.
        पुढे श्री. जयवंशी म्हणालेक की, गोवर अत्यंत संक्रामक आणि घातक आजार आहे. जो मुख्यत: मुलांना होतो. गोवर आजारामुळे देशात दरवर्षी सुमारे 50 हजार रूग्ण मृत्युमुखी पडतात. रुबेला या आजाराचा संसर्ग गरोदर मातांना झाल्यास गर्भपात किंवा जन्मजात दोष निर्माण होऊ शकतात. यात बहिरेपणा आणि हृद्यविकृती होऊ शकते. त्यामुळे गोवर-रूबेला लस देण्यात येत आहे. 
            सन 2020 पर्यंत गोवर आजाराचे निर्मुलन व रुबेला या आजाराचे नियंत्रणाचे उद्दिष्टशासनाने ठरविले आहे. त्यानुसार आजपासून जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहीमेअंतर्गत 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील जवळपास 3 लाख 18 हजार 230 बालकांना लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यात जवळपास दिड महीना ही मोहीम शिक्षण विभाग, महिला व बाल कल्याणच्या संयुक्त विद्यमानाने राबविली जाणार आहे. नागरिकांनी ही आपल्या मुलांना गोवर-रुबेलाची लस देवून ही मोहिम यशस्वी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी यावेळी केले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शिवाजी पवार यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य, आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
****