23 July, 2024
अतिसार प्रतिबंधक मोहीम जिल्हास्तरीय जनजागृती कार्यशाळा
हिंगोली (जिमाका), दि. 23 : येथील जिल्हा परिषदेच्या षटकोनी सभागृहात दि. 22 जुलै, 2024 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिसार प्रतिबंध जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, भूजल सर्वेक्षणचे रवींद्र मांजरेकर, प्रकाश जाधव, अरुण पवार प्रामुख्याने उपस्थित होते.
संचालक संजय कुलकर्णी यांनी प्रस्ताविक केले आहे. त्यात 90 टक्के साथरोग हे दूषित पाण्यामुळे होतात. या मोहिमेत आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला बालकल्याण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पाणी व स्वच्छता जिल्हा परिषद यांचा समन्वयाने केले आहे. तसेच स्वच्छतेचे दोन रंग ओला हिरवा, सुखा कचरा निळा हे अभियान राबवले जात आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांनी गावातील सर्व समुदायाच्या सहकार्याने गावातच पाणी नमुने तपासणी जलसुरक्षकाद्वारे गावातील प्रत्येक जल स्त्रोत तपासणी व परिसर स्वच्छता शाळा, अंगणवाडी, येथील परिसर स्वच्छता, आरोग्य विभाग मार्फत ओ आर एस पावडर, झिंक गोळी वाटप तसेच ग्राम पातळीवर वैयक्तिक स्वच्छता बाळगून अतिसार प्रतिबंध यशस्वी करण्याचे आवाहन केले .
जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. प्रकाश जाधव यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता सर्वेक्षण व माहे एप्रिल ते ऑक्टोबर मधील पुनर्वापर करण्यात आला. लोकसहभागाने पूर्ण करून जोखीमग्रस्त गावात वेळीच उपाय योजना करणे बाबत माहिती दिली. तसेच स्वच्छता सर्वेक्षण हे सरपंच, आरोग्य सेवक, सरपंच पाणी पुरवठा स्वच्छता आरोग्य समिती, जलसुरक्षक, आशा वर्कर यांनी सहकार्याने काळजीपूर्वक पूर्ण करावे असे नमूद केले. तसेच गावातील पाणी शुद्धी करणे. ब्लिचिंग पावडरचा उपयोग करणे, नळाची दुरुस्ती नियमित करणे गरजेचे आहे. नळ देण्यात आला. पाणी शुद्ध शुद्धीकरण यत्राचे पाणी शुद्ध करण्यासाठी सूचित केले आहे, असे मत प्रतिपादन केले. प्रत्येक जलसूरक्षक व प्रचारक तपासणी करणे आवश्यक असल्याबाबत मत मांडले.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सतीश रुग्णवाल यांनी शाळा, अंगणवाडी, या ठिकाणी स्वच्छतेचे राखणे ही मोहीम, पाणी उकळून देणे, परिसर स्वच्छता राखणे, तसेच पिण्याचे पाण्याच्या टाक्या स्वच्छ धुणे, तसेच शाळा अंगणवाडी येथील स्वच्छतेबाबत माहिती दिली. तसेच लहान बालकांना अतिसाराचा धोका जास्त असतो. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागात व ओआरएस पाकीट झिंक गोळ्याचे वाटप करण्यात आले आहे. तसेच सदरच्या मोहिमेत आरोग्य विभाग शंभर टक्के काम पूर्ण करणार असल्याची ग्वाही दिली आहे. प्रत्येक गावात आरोग्य सेवक यांनी क्लोरीन बाबत चाचणी करणे गरजेचे असल्याने सांगितले आहे. तसेच शिक्षणाधिकारी यांनी अतिसार प्रतिबंध मोहीम सर्व शाळांमध्ये जनजागृती मोहीम प्रभात फेरी काढणे. शौचालय दुरुस्ती बाबत व शाळेतील पाणी नमुने तपासणी करणे. तसेच याबाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले. महेश थोरकर यांनी अतिसार प्रतिबंध मोहिमेचे अंतर्गत दिनांक 1 जुलै 2024 ते 31 ऑगस्ट 2024 दरम्यान पहिला आठवडा ते आठवा आठवडा यामधील प्रत्येक कार्यक्रमाची माहिती दिली . तसेच विष्णू मेहेत्रे यांनी ओडिफ प्लस गावात बाबत माहिती दिली. माहिती शिक्षण व संवाद तज्ञ शामसुंदर मस्के यांनी स्वच्छतेचे दोन रंग ओला हिरवा सुखा निळा व गृहभेटीबाबत जनजागृती केली. राठोड व सरकटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
सर्व तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी आरोग्य विस्तार अधिकारी , गट समन्वयक, समूह समन्वयक अंगणवाडी , पर्यवेक्षक, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, आरोग्य विभाग व पंचायत समितीतील कर्मचारी उपस्थित होते. तसेच जिल्हा व पाणी स्वच्छता मिशन कक्षातील सर्व तज्ज्ञ सल्लागार मंडळ उपस्थित होते.
*******
_आरोग्य विभागाचा डॉ. रेखा भंडारे यांच्याकडून आढावा_ *पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन*
हिंगोली (जिमाका), दि. 23 : सध्या पावसाळ्याचे दिवस चालू झाले आहेत व पावसाळ्यामध्ये घ्यावयाच्या काळजीबाबत सहायक संचालक (हिवताप) डॉ. रेखा भंडारे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, तालुका आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य सहाय्यक, आरोग्य कर्मचारी यांची आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी सहाय्यक संचालक डॉ. रेखा भंडारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
सध्या पावसाळ्याचे दिवस चालू झाले आहेत व पावसाळ्यामध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याबाबत आवाहन करत, सोबतच उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना सूचना दिल्या. पावसाळ्यात जलजन्य व कीटकजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. जलजन्य आजार टायफाईड, कावीळ, गॅस्ट्रो, अतिसार या आजारापासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. कीटक जन्य आजार डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया, मेंदू ज्वर आजार टाळण्यासाठी वेळीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र स्तरावरील आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयी राहून आरोग्य सेवा द्यावेत, अशा सूचना देण्यात आल्या.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथरोग उद्भभवू नये यासाठी नागरिकांनी घ्यावयाची काळजी
नागरिकानी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. दूषित अन्न खाऊ नये, पिण्याचे पाणी गाळून, उकळून शुद्धीकरण करून पिण्यास वापरावे. पावसाचे साचलेले पाणी वाहते करावे. गटारे, नाल्या स्वच्छ कराव्यात, खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. डास उत्पती होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन सहाय्यक संचालक डॉ. रेखा भंडारे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी केले आहे.
कीटकजन्य आजाराबाबत घ्यावयाची काळजी :
घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळा. या दिवशी घरातील सर्व पाणी साठवायची भांडी, ड्रम घासून स्वच्छ करा. सेप्टिक टँकच्या पाईपला जाळ्या बसवा. कोणताही ताप अंगावर काढू नका. तापात स्वतः च्या मनाने किंवा औषध दुकादारांकडून औषध घेऊ नका. साचलेले डबके, नाल्यांमध्ये जळके ऑईल किंवा रॉकेल टाकावे. नाल्या वाहत्या कराव्यात. नारळाच्या करवंट्या, फुलदाणी, कुलर्स, टायर्स, रिकामी डबकी यामध्ये पाणी साचू देऊ नये, आरोग्य कर्मचारी यांनी दैनंदिन भेटीदरम्यान कीटक शास्त्रीय सर्वेक्षण व अबेटिंग करावी, संशयित ताप रुग्णाचे रक्त नमुने घेऊन वेळेत प्रयोगशाळेत तपासणी करीता पाठवावे.
रुग्ण आढळून आल्यास तात्काळ जलदताप सर्वेक्षण करावे व ग्रामपंचायतच्या मागणीनुसार धूरफवारणी करण्यात यावी. यावेळी सहाय्यक संचालक आरोग्य सेवा हिवताप छत्रपती संभाजीनगर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.गणेश जोगदंड, सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी सी. जी. रणवीर, प्रयोगशाला वैधानिक अधिकारी प्रशांत भालेराव, आरोग्य सहाय्यक बाबासाहेब ठोंबरे, रामदेव जोशी, कीटक समाहरक संजय पवार, संजय बोरबळे, उमेश डाफने, माखने, मल्हारी चौफाडे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
*********
जिल्हाधिकारी कार्यालयात लोकमान्य टिळक यांना जयंतीनिमित्त अभिवादन
हिंगोली (जिमाका), दि. 23 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे, नायब तहसीलदार डी. एस. जोशी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
******
पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 167 सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांची प्राथमिक निवड
हिंगोली (जिमाका), दि. 23 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर (NCS) हिंगोली व शासकीय औद्योगीक प्रशिक्षण सस्था, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 15 जुलै रोजी कै. शिवाजीराव देशमुख सभागृह, हिंगोली येथे जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरीता जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त "पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा व पदवी तसेच पदवीधारक या पात्रतेचे 309 उमेदवारांनी नोंदणी केली होती. या 309 उमेदवारांपैकी 167 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.
या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्रातील विविध नामांकीत कंपनीचे उद्योजक उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील विविध महामंडळाचे स्टॉल लावण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वि. प्र. रांगणे उपस्थित होते. अध्यक्षीय समारोपात श्री. रांगणे यांनी सुशिक्षित बेरोजगार युवकांनी या रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवून संधीचे सोने केले पाहिजे, असे आवाहन केले.
सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी रोजगार मेळावा आयोजनामागील हेतू विशद करत युवकांनी मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवून जास्तीत जास्त रोजगार प्राप्त करावा. या बरोबरच उद्योजक आपल्या दारी या उक्तीचा देखील उच्चार केला. सुक्षिशित बेरोजगार उमेदवारांना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना 2024-25 राबवली जाणार आहे. या योजनेचा लाभ सुक्षिशित बेरोजगार उमेदवारांनी व कंपनीच्या आस्थापनांनी घ्यावे, असे आवाहन सहायक आयुक्त श्री. कोल्हे यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन न.द. टोनपे यांनी केले तर म. ना. राऊत यांनी आभार मानले. या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता हिंगोली या कार्यालयाचे म. शां. लोखंडे, रा.द.कदम, ना. ज. निरदुडे, र. ला. जाधव यांनी परिश्रम घेतले.
******
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा बेरोजगार युवकांनी लाभ घ्यावा --- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
हिंगोली (जिमाका), दि. 23 : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने कार्यरत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये केले आहे.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नुकतेच बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वि. प्र. रांगणे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगोलीचे प्राचार्य आर व्ही. बोथीकर, सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड, शिक्षणाधिकारी (मा.) प्रशांत दिग्रसकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. मगर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस. ए. कादरी, जिल्हा औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मामडे, प्रा. डॉ. प्रकाश राजगुरु, युवा विकास सोसायटीचे आशिष बाजपाई त्याचबरोबर जिल्ह्यातील नामांकित उद्योजक आणि विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी योजनेच्या माध्यमातून उद्योजकांना प्रशिक्षित मनुष्यबळ मिळणार असल्याने व त्यांचे 6 महिन्यांचे विद्यावेतन महाराष्ट्र शासन देत असल्याने, त्यांनीही या योजनेचा प्रचार व प्रसार करावा असे आवाहन केले. त्याचबरोबर प्रत्येक विभागाने जिल्ह्यातील 20 पेक्षा अधिक मनुष्यबळ असणाऱ्या अस्थापनांचा शोध घ्यावा, अशा सूचना दिल्या.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे राबविली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून रोजगार इच्छूक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करुन देणारे उद्योजक जोडले जातील. रोजगार इच्छूक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल. तसेच उद्योजकांना त्यांच्या कामासाठी लागणारे मनुष्यबळ कार्य या योजनेद्वारे उपलब्ध होणार आहे. या योजनेचा कालावधी 6 महिने असणार आहे. या 6 महिन्यात उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन प्रदान केले जाणार आहे. यामध्ये बारावी पास उमेदवारांना 6 हजार रुपये, आय.टी.आय. पदविका उमेदवारांना 8 हजार रुपये तर पदवीधर, पदव्युत्तर उमेदवारांना 10 हजार इतके विद्यावेतन महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त डॉ.रा.म. कोल्हे यांनी उपस्थितांना दिली.
यावेळी हिंगोली जिल्ह्यातील नामांकित उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
********
22 July, 2024
प्रधानमंत्री पिक विमा योजनेत भाग घेण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे - जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम
हिंगोली (जिमाका), दि. 22 : राज्यात खरीप 2016 पासून प्रधानमंत्री पिक विमा योजना केंद्र शासनाच्या नियमानुसार राबविण्यात येत आहे. खरीप-2024 मध्ये केंद्र सरकारच्या विमा पोर्टलवर (www.pmfby.gov.in) थेट ऑनलाईन स्वरुपात विमा अर्ज भरण्याची सुविधा 16 जून 2024 पासून सुरु केली होती व सहभागी होण्यासाठी 15 जुलैची मुदत होती. सोमवार, दि. 15 जुलै रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत या योजनेअंतर्गत 4 लाख 21 हजार 311 विमा अर्जाव्दारे साधारण 2 लाख 75 हजार 550 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले होते. हिंगोली जिल्ह्यात सरासरी खरीप हंगाम पेरणी क्षेत्र 3 लाख 20 हजार 830 हेक्टर आहे.
गतवर्षी म्हणजेच खरीप-2023 मध्ये पिक विमा अर्ज संख्या 5 लाख 13 हजार 303 होती व विमा संरक्षित क्षेत्र 3 लाख 26 हजार हेक्टर होते.
जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकासाठी विमा संरक्षण घ्यावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा योजना देऊ केली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी शासनाने दिनांक 31 जुलै, 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.
****
लेक लाडकी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीसाठी लागणारे खाते उघडा आता पोस्टातही….
हिंगोली (जिमाका), दि. 22 : राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे लेक लाडकी योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजना सुरु करण्यात आल्या असून लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारे बँक खाते जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते उघडावे, असे आवाहन परभणी डाक विभागाचे डाक अधीक्षक मोहम्मद खदीर यांनी केले आहे.
या दोन्ही योजनांचा लाभ मिळण्याची कार्यपद्धती शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत असून आर्थिक लाभ DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर) पद्धतीने देण्यात येणार आहे. यासाठी बचत खाते उघडणे आवश्यक असून ते जवळच्या गाव, खेड्यातील कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये उघडता येईल. लेक लाडकी योजनेमध्ये लाभार्थी मुलींच्या खात्यामध्ये निर्देशित केलेल्या टप्प्या-टप्प्याने वयाच्या 18 वर्षापर्यंत एकूण 1 लाख 1 हजार इतकी रक्कम जमा होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने अंतर्गत तिच्या स्वतःच्या बचत खात्यात दर महिन्याला 1 हजार 500 रुपये इतकी रक्कम जमा करण्यात येणार आहे.
लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक असणारे खाते पोस्ट ऑफिसमध्ये काढण्यासाठी मुलीच्या जन्माचा दाखला, मुलीचे आधार कार्ड, आईचे पॅन कार्ड (सध्या पॅन कार्ड नसल्यास फॉर्म 60), आईचे आधार कार्ड आणि मुलगी व आई यांचा संयुक्त फोटो इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक असणारे खाते पोस्ट ऑफिस मध्ये उघडण्यासाठी महिलेचे पॅन कार्ड (सध्या पॅन कार्ड नसल्यास फॉर्म 60), आधार कार्ड, 2 फोटो आवश्यक आहेत.
परभणी डाक विभागांतर्गत येणाऱ्या 388 पोस्ट ऑफिसेसमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. वरील योजनेंतर्गत खात्यांवर वेळोवेळी जमा झालेली रक्कम काढण्यासाठी बाहेरगावी जाण्याचा त्रास तसेच गैरसोय टाळण्यासाठी आपल्याच गावातील पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते काढावे, असे आवाहन मोहम्मद खदीर, अधीक्षक डाकघर, परभणी यांनी केले आहे.
****
Subscribe to:
Posts (Atom)


