14 September, 2024
मराठवाडा मुक्तीदिनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
हिंगोली(जिमाका), दि. १४ :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी ८.४० वाजता हिंगोली जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नांदेड रोड देवडा नगर जवळील स्वातंत्र्य सैनिक कै. अण्णाराव टाकळगव्हाणकर नगर परिषद उद्यान येथे उभारण्यात आलेल्या मराठवाडा मुक्ती संग्राम स्मृतीस्तंभास हिंगोलीचे पालकमंत्री तथा राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्याचा कार्यक्रम होईल व त्यानंतर तेथेच सकाळी ९ वाजता राष्ट्रध्वजवंदन समारंभ होणार आहे.
या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, पत्रकार आदीनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.
******
जिल्ह्यात ईद-ए-मिलाद सणाची १६ सप्टेंबरची सुटी कायम
हिंगोली(जिमाका), दि. १४ :- राज्यात ईद-ए-मिलाद सणानिमित्त सोमवार, दि.१६ सप्टेंबर रोजी जाहीर केलेली सुटी कायम ठेवावी अथवा रद्द करावी व त्या बदल्यात दि.१८ रोजी सुटी जाहीर करावी किंवा कसे याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी यांनी निर्णय घ्यावा, अशी अधिसूचना शासनाने जारी केली आहे.
त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी पोलीस विभागाकडून प्राप्त माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यांमध्ये मुख्यालयाच्या ठिकाणी दिनांक २२ सप्टेंबर, २०२४ रोजी व इतरत्र १८ सप्टेंबर रोजी किंवा वेगळ्या तारखेस सदरील सण साजरा केला जात असल्यामुळे जिल्ह्यात सोमवार दि.१६ सप्टेंबर रोजी असलेली सुटी कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
******
13 September, 2024
कृषि सुवर्ण समृध्दी आठवडा निमित्त तोंडापूर कृषि विज्ञान केंद्रामध्ये 23 सप्टेंबर रोजी शेतकरी मेळाव्याचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 13 : कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील कृषि विज्ञान केंद्रात दि. 23 सप्टेंबर, 2024 रोजी कृषि सुवर्ण समृध्दी आठवडा साजरा करण्यात येणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला एका शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते होणार असून या मेळाव्याला वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. डॉ. इंद्रमणी हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार नागेश पाटील आष्टीकर, माजी खासदार ॲड. शिवाजीराव माने उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे सचालक संशोधन डॉ. खिजर बेग, ज्वारी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एल. एन. जावळे, मिलेट मिशन नवी दिल्ली येथून श्री राकेश सिन्हा, मिलेट मॅन ऑफ आंध्र प्रदेश श्री वीर शेट्टी व भारतीय अन्न संशोधन संस्थान, हैदराबाद येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र चापके यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळणार आहे.
या कार्यक्रमाच्या वेळी प्रदर्शनाचे सुद्धा आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनामध्ये भरड धान्याच्या बियाण्याची विक्री सुद्धा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे भरड धान्यापासून तयार होऊ शकणाऱ्या पदार्थाचे प्रदर्शन सुद्धा लावले जाणार आहे.
मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून भरडधान्याचे महत्त्व मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे करून सांगण्यात आलेले आहे. त्या दृष्टिकोनातून हे संपूर्ण दशक हे भरड धान्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरे करण्याचा कृषी विज्ञान केंद्राचा मानस आहे.
या कार्यक्रमास सर्व शेतकरी आणि शेती विषयक काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी या मेळाव्यामध्ये उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये हळद सोयाबीन आणि हरभरा या पिकांसोबतच रब्बी ज्वारीचा पेरा आणि उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
******
छत्रपती संभाजीनगर येथे 23 ते 28 सप्टेंबर या कालावधीत भरती मेळाव्याचे आयोजन माजी सैनिकांनी लाभ घेण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 13 : मराठवाडा पर्यावरण बटालियन, 136 इन्फंट्री बटालियन टीए इको, महार (एमओइएफ आणि सीसी) आणि महाराष्ट्र राज्य व विभागाच्या माजी सैनिक आणि माजी महिला कर्मचाऱ्यांच्या (अकाली निवृत्तीसह) भरतीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील मिल्ट्री कँट येथे दि. 23 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर, 2024 या कालावधीत माजी सैनिक आणि माजी महिला कर्मचाऱ्यांसाठी (समाविष्ट महिला) भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
136 इन्फंट्री बटालियन टीए इको, महामध्ये सहभागी होण्यासाठी स्वयंसेवा करणारे सर्व पात्र उमेदवार दिलेल्या वेळापत्रकानुसार दि. 23 सप्टेंबर, 2024 रोजी संभाजीनगर मिलट्री कैंट (सर्वत्र स्टेडियम) येथे 5.30 वाजता शारीरिक फिटनेस चाचणीसह भरती सुरु होणार आहे.
संभाजीनगर मिलट्री कैंट (सर्वत्र स्टेडियम) येथे दि. 23 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर, 2024 या कालावधीत सोल्जर जीडी, क्लार्क, हाऊस कीपर, ब्लॅकस्मिथ, मेस कीपर, आर्टीशियन (डब्ल्यूडब्ल्यू), स्टेवार्ड अशी एकूण 53 पदे भरण्यात येणार आहेत. सोल्जर जीडी या पदासाठी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे. तर उर्वरित सर्व पदासाठी संपूर्ण भारताचा रहिवाशांना सहभागी होता येणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांसाठी संपर्क क्रमांक 9168168136 हा आहे. तसेच या भरतीच्या अटी व शर्ती तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, हिंगोली यांच्या कार्यालयाशी संपर्क साधता येईल.
हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिकांनी अटी व पात्रता पाहून भरती मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
******
महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या प्रलंबित पात्र लाभार्थ्यांनी 18 सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणिकरण करुन घेण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 13 : महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या (विशिष्ट क्रमांक देण्यात आलेल्या ) परंतु आधार प्रमाणिकरण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी महाआयटी यांनी दि. 12 ऑगस्ट ते दि. 7 सप्टेंबर, 2024 पर्यंत आधार प्रमाणिकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. अद्यापही 251 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण शिल्लक असल्यामुळे दि. 18 सप्टेंबर, 2024 पर्यंत आधार प्रमाणिकरणाची सुविधा सुरु राहणार आहे. या काळात संबंधित शेतकरी बांधवानी आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे.
यादीतील पात्र शेतकरी आधार प्रमाणिकरण कालावधीत मयत झाले असल्यास त्यांच्या वारसांची नोंदी संबंधित बँकेत तातकाळ करुन घ्यावेत. याबाबत बँकानी यापूर्वी पोर्टलवर अपलोड केलेल्या मयत खात्यांच्या डिलीशेनची सुविधा दि. 17 सप्टेंबर, 2024 पर्यत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच मयत खातेदारांच्या वारसांची नोंद घेऊन बँकाना खाती अपलोड करण्याची सुविधा दि. 18 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर, 2024 या कालावधीत उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी आधार प्रमाणिकरण प्रलंबित असलेल्या पात्र लाभार्थ्यांनी आधार प्रमाणिकरण करुन घ्यावेत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, हिंगोली यांनी केले आहे.
*******
12 September, 2024
कळमनुरी आयटीआयमध्ये तासिका तत्वावर निदेशक पदासाठी मुलाखतीचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 12 : औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळमनुरी जि.हिंगोली या संस्थेतील इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रीकल, वायरमन या व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरींग मधील पदवी, पदविका, आयटीआय मधील पदवी, पदविका तसेच इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल, वायरमन हा व्यवसाय घेऊन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण झालेल्या व त्यानंतर सीआयटीएस पूर्ण केलेल्या पात्रताधारक व शिकवण्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांची तासिका तत्वावर (Clock Hour Basis) निव्वळ तात्पुरत्या स्वरुपातील पद भरण्यासाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी संस्थेत येऊन बायोडाटासह अर्ज करावेत, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.
मुबलक प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यास दि. 18 सप्टेंबर, 2024 रोजी मुलाखतीचे आयोजन करुन निवड करण्यात येणार असल्याचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी कळविले आहे.
******
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात 08 ऑक्टोबर रोजी मुलाखतीचे आयोजन
हिंगोली (जिमाका),दि. 12 : भारतीय सशस्त्र सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या परीक्षेची पूर्वतयारी करुन घेण्यासाठी नाशिक येथील नाशिक रोडच्या छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये राज्य शासनातर्फे राज्यातील नवयुवक व नवयुवतींसाठी दि. 14 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. 58 आयोजित करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात येणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी हिंगोली जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात दि. 8 ऑक्टोबर, 2024 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
मुलाखतीस येताना डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअर पुणे (डीएसडब्ल्यू) यांच्या संकेतस्थळावर सर्च करुन त्यामधील एसएसबी-58 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावेत. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये एसएसबी वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेवून यावेत.
उमेदवार हा कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (सीडीएसई-युपीएससी) अथवा नॅशनल डिफेंस ॲकडमी एक्झामिनेशन (एनडीए-युपीएससी) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी सी सर्टीफिकेट ए किंवा बी ग्रेडमध्ये पास झालेले असावेत. एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी : training.pctcnashik@gmail.com अथवा 0253-2451032 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा 9156073306 या व्हॉटसअप क्रमांकावर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
*****
Subscribe to:
Posts (Atom)