07 December, 2019

ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजनासाठी अर्ज करण्याचे आवाहन


ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजनासाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.7 : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान,कोलकत्ता  यांच्या असमान निधी योजनेअंतर्गंत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या मार्फत राबविण्यात येतात.त्या संदर्भांतील नियम, अटी व अर्जाचा नमुना राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध्‍ आहे. राज्यातील इच्छूक शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी  अर्जाचा नमुना सदर संकेतस्थळावर उपलब्ध्‍ करुन घ्यावा.
सन 2019-20 साठीच्या असमान निधी योजना (Non Matching scemes) पुढील प्रमाणे आहे.
ग्रंथालय सेवा देणा-या स्वयंमसेवी संस्थांना ग्रंथ,साधन सामग्री,फर्निचर,इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य,"राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा" विकसीत करण्यासाठी अर्थसहाय्य,महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य,राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र,कार्यशाळा,प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनांसाठी अर्थसहाय्य,बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय कोपरा स्थापन करण्याकरीता अर्थसहाय्य.
या योजनांसाठी करावयाचा अर्ज : वरील योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in  हे संकेतस्थ्ळ पहावे.आवश्कता असल्यास संबंधीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क  साधावा. ग्रंथालयांनी वरील पैकी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहित मार्गाने  व मुदतीत आवश्यक कागदपत्रासह  इंग्रंजी/हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास दि 20 डिसेंबर 2019 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत,असे आवाहन ग्रंथालय संचालक,ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य,नगर भवन,मुंबई यांनी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना केले आहे. 00000

बाल लैंगिक शोषणास प्रतिबंध अधिनियमात नवीन तरतुदींचा समावेश


बाल लैंगिक शोषणास प्रतिबंध अधिनियमात नवीन तरतुदींचा समावेश


             हिंगोली,दि.7 :- केंद्र शासनाने बाल लैंगिक शोषणास प्रतिबंध अधिनियम 2012 (POCSO AcT ) मध्ये सुधारणा केल्या असून बाल लैंगिक शोषणास प्रतिबंध (सुधारीत) अधिनियम 2019 अधिसूचित करण्यात आला आहे. सदर अधिनियम दिनांक 6 ऑगस्ट 2019 पासून लागू करण्यात आला आहे. बालकांच्या लैंगिक शोषणासारख्या गंभीर अपराधांना प्रतिबंध व्हावा, यासाठी सुधारीत अधिनियमात नवीन तरतुदीचा समावेश करण्यात आलेला आहे. सदर अधिनियमातील प्रमुख तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत-बाल लैंगिक शोषणात सहभागी असणाऱ्या आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा, ज्यामध्ये जन्मठेपेसारख्या शिक्षेचा समावेश , Aggravated Penetrative sexual Assault  सारख्या अतिशय गंभीर गुन्ह्यामध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद, बाल लैंगिक शोषणासंबंधित प्रकरणांच्या तपासणी दरम्यान बाल लैंगिक शोषणास प्रतिबंध अधिनियम व त्याअनुषंगाने तयार करण्यात आलेल्या नियमातील  तरतुदींचे काटेकोर पालन करणे, अधिनियमात नमूद बाल स्नेही तरतुदींची काळजीपूर्वक अंमलबजावणी करणे ज्यामध्ये बालकांना समजेल अशी व सोपी भाषा वापरणे आवश्यकतेनुसार दुभाष्याची मदत घेणे इत्यादी, बालकाचा जबाब घेताना शक्यतो बालकांच्या घरी किंवा बालकास योग्य वाटेल अशा ठिकाणी उप निरीक्षक पेक्षा कमी नाही अशा दर्जाच्या महिला अधिकाऱ्यांनी कार्यवाही करणे, बालकाचा आरोपीशी कोणताही प्रकारचा संपर्क येणार नाही याची दक्षता घेणे, लैंगिक शोषणातील पिडीत बालकांसंबंधित माहिती प्राप्त होताच अशा पिडीत बालकास 24 तासाच्या आत जवळच्या रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करणे, तरी बाल लैंगिक शोषण प्रतिबंध अधिनियमाची परिणामकारक अंमलबजावणी व व्यापक प्रसिध्दी होणे आवश्यक आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.
00000

06 December, 2019

शासकीय कापूस खरेदीचा दिनांक 9 डिसेंबर रोजी शुभारंभ


शासकीय कापूस खरेदीचा दिनांक 9 डिसेंबर रोजी  शुभारंभ

             हिंगोली,दि.6 :- हंगाम 2019-20 मधील परभणी विभागातील शासकीय कापूस खरेदी सीसीआय चे सबएजंट म्हणून कापूस पणन महासंघातर्फे हिंगोली येथे सोमवार दिनांक 9 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता केंद्र शासनाच्या किंमत आधारभूत किमतीनुसार कापूस खरेदीचा शुभारंभ करण्याचे योजिले आहे.
            यावर्षी कापूस खरेदी केल्यावर शेतकऱ्यांना अदा करावयाची रक्कम आरटीजीएस/ एनईएफटी ने थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे चालू हंगामातील कापूस पेऱ्याची अद्ययावत नोंद असलेला 7/12 उतारा, बँकेचे नाव, बँकेची शाखा, बँकेचे आईएफएससी कोड, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स प्रत व शेतकऱ्यांचा बँकेशी संलग्न (लिंक) केलेला मोबाईल नंबर व ई-दस्ताऐवज सोबत आणावेत.
            वस्त्रोद्योग मंत्रालय भारत सरकार यांचे परिपत्रकानुसार शासकीय कापूस खरेदी केंद्रावर फक्त FAQ  दर्जाचाच कापूस स्विकारण्यात येणार आहे. FAQ दर्जाच्या कापसाला रुई धाग्याची लांबी, तलमता व आर्द्रता यानुसार भाव देण्यात येणार आहे. 12%  च्या वर आर्द्रता असलेला कापूस केंद्रावर स्विकारला जाणार नाही.
            शेतकरी बांधनानी जास्तीत जास्त कापूस शासकीय कापूस खरेदी केंद्रावर विक्रीस आणावा, असे आवाहन कापूस पणन महासंघाचे परभणी विभागाचे संचालक पंडितराव चोखट व विभागीय व्यवस्थापक ए.डी. रेणके यांनी केले आहे.
00000

05 December, 2019

जिल्ह्यात सर्वत्र कलम 37 (1) (3) लागू


जिल्ह्यात सर्वत्र कलम 37 (1) (3) लागू

             हिंगोली,दि.5: कायदा आणि सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी हिंगोली शहर आणि पूर्ण जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) लागू करण्यात आला आहे. हा आदेश 6 ते 20 डिसेंबर 2019 या कालावधीत लागू असेल, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी कळवले आहे.
            डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन, मुस्लिम समाजातर्फे  बाबरी मस्जीद पतन दिन म्हणून जिल्हयात काळा दिवस पाळण्यात येतो, श्री. दत्त जयंती, महानुभव पंथीय सत्संग सोहळा व संत संमेलनाच्या पार्श्वभूमीवर हे आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीस शस्त्र, काठी, तलवार, बंदुक बाळगता येणार नाही. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक जन्य बाळगता येणार नाही. दगड, क्षेपणिक उपकरणे गोळा करता येणार नाही किंवा जवळ बाळगता येणार नाही. सभ्यता, नीतीमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे, निशाणी, घोषणा फलक बाळगण्यास मनाई असेल. व्यक्ती किंवा समूहाच्या भावना दुखावतील असे असभ्य वर्तन करता येणार नाही. पाच किंवा अधिक व्यक्तींना रस्त्यावर जमता येणार नाही. मात्र शासकीय कामावर असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी , विवाह अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा, परवानगी दिलेले मिरवणूक कार्यक्रमास हे आदेश लागू होणार नाहीत, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. कार्यक्रम मिरवणुकीस परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधिक्षक अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांना राहतील, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
*****


03 December, 2019

संत श्री जगनाडे महाराज यांची 8 डिसेंबर रोजी जयंती साजरी करण्याचे आवाहन


संत श्री जगनाडे महाराज यांची 8 डिसेंबर रोजी जयंती साजरी करण्याचे आवाहन


हिंगोली,दि.3: महाराष्ट्राचे थोर संत आराध्य दैवत संत श्री संत जगनाडे महाराज यांची जयंती यावर्षी पासून प्रथमच सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये साजरी करण्याबाबत शासनाचे आदेश आहेत.
सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये संत श्री जगनाडे महाराज यांची जयंती 8 डिसेंबर रोजी साजरी करण्यात यावी. असे एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

****


परभणी येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन


परभणी येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन

हिंगोली,दि.3: सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी 4  ते 13 जानेवारी, 2020 या कालावधीत सोल्जर (जनरल ड्युटी), सोल्जर टेक्निकल व सोल्जर ट्रेड्समन या पदासाठी परभणी येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी इच्छूक उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर दि. 19 डिसेंबर, 2019 पर्यंत आपली नोंद करावी.  तसेच दि. 20 डिसेंबर ते दि. 2 जानेवारी, 2020 पर्यत भरती करीता ऑनलाईन प्रवेश पत्र प्राप्त करुन घ्यावे. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले .

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे 2020 मधील परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे 2020 मधील परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

हिंगोली,दि.3: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2020 मध्ये  होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. राज्य सेवा परीक्षा 2020 साठीची मुख्य परीक्षा शनिवार पासून 3 दिवस आणि सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय परीक्षा ही शनिवारी घेण्यात येणार आहे. उर्वरित सर्व पूर्व तसेच मुख्य परीक्षा रविवारी घेण्यात येणार आहे.
राज्यसेवा परीक्षा 2020 साठीची जाहिरात डिसेंबर 2019 मध्ये प्रसिद्ध होईल. पूर्व परीक्षा दि. 5 एप्रिल, 2020 रोजी तर मुख्य परीक्षा शनिवार दि. 8 ऑगस्ट ते सोमवार दि. 10 ऑगस्ट, 2020 अशी तीन दिवस घेण्यात येणार आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेसाठी जानेवारी-2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा दि. 1 मार्च रोजी तर मुख्य परीक्षा दि. 14 जून, 2020 रोजी घेण्यात येणार आहे.
सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा 2020 साठी जानेवारी-2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून पूर्व परीक्षा दि. 15 मार्च, 2020 रोजी तर मुख्य परीक्षा दि. 12 जुलै, 2020 रोजी घेण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त परीक्षेसाठी फेब्रुवारी-2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा दि. 3 मे, 2020 रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र वन सेवा परीक्षा 2020 साठी मार्च-2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून पूर्व परीक्षा दि. 10 मे रोजी तर मुख्य परीक्षा दि. 11 ऑक्टोबर, 2020 रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी मार्च-2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दि. 17 मे, 2020 मध्ये घेण्यात येणार आहे. सदर वेळापत्रक किंवा अधिक माहिती www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
****