23 February, 2023

 

जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 23 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी, मधुकर खंडागळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनीही यावेळी संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. 

**** 

 

कळमनुरी तालुक्यातील देवजना येथे ग्राम बाल संरक्षण समितीची बैठक संपन्न

 


हिंगोली (जिमाका), दि. 23 :  कळमनुरी तालुक्यातील देवजना येथे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार ग्राम बाल संरक्षण समितीची बैठक दि. 21 फेब्रुवारी, 2023 रोजी घेण्यात आली.

या बैठकीत गावातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांविषयी तसेच ग्राम बाल संरक्षण समितीमध्ये नव्या 20 ते 30 वयोगटातील युवक-युवतीची बाल मित्र म्हणून निवड करण्यात यावी याविषयी चर्चा करण्यात आली. तसेच बाल कायद्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 विषयी सविस्तर माहिती सांगण्यात आली. ज्यामध्ये मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 असावे आणि जर मुलाचे व मुलीचे वय यापेक्षा कमी असेल तर असे विवाह बेकायदेशीर ठरले जातात व अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व 02 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा होऊ शकते. या विषयी पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. तसेच बाल विवाहाची कारणे व दुष्परिणाम या विषयी माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे यांनी दिली.

बाल विवाहास प्रतिबंध करण्यासाठी दि. 21 ऑक्टोंबर, 2022 रोजी दिलेल्या अधिसुचनेनुसार ग्राम सेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात बाल विवाह होऊ नयेत याबाबत खबरदारी घेण्यात यावी. तसेच विद्यार्थी शाळेत सतत 15 दिवस गैरहजर असेल तर संबंधित विद्यार्थ्याची नोंद करुन ग्राम सेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी यांच्याकडे देण्याबाबत तसेच गावात ज्यांचे ज्यांचे लग्न ठरलेले आहेत त्यांच्या वयाची पडताळणी करुन त्यापैकी कोणी अल्पवयीन आहे का ? याची शहानिशा करण्यबाबत जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कायदा तथा परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित यांनी माहिती दिली.

या बैठकीत ग्राम बाल संरक्षण समिती व पोलीस प्रशासनाच्या सहकार्यातून एका अल्पवयील बालिकेचा बाल विवाह थांबविण्यास जिल्हा बाल संरक्षण कक्षास यश आले. या बैठकीस पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे (पो.स्टे आ.बाळापुर), गावातील संरपंच प्रविणा वागमारे, ग्रामसेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी शेख समीर शेख समदानी, मुख्याध्यापक महेश शेवाळे, अंगणवाडी सेविका संगीता कल्याणकर, आशा वर्कर अरुणाबाई गाढे, ग्राम पंचायत सदस्या मंगल कल्याणकर, गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

 

*****

 

 

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-2022 करिता प्रवेशिकांना 8 मार्चपर्यंत मुदतवाढ

 

 

             हिंगोली (जिमाका), दि. 23 :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार देण्यात येतात. सन 2022 च्या पुरस्कारासाठी दिनांक 1 जानेवारी, 2022 ते 31 डिसेंबर, 2022 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका दि. 31 जानेवारी 2023 पर्यंत मागविण्यात आल्या होत्या, तथापि, प्रवेशिका पाठविण्यास 8 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

            उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2022 चे माहितीपत्रक/अर्जाचे नमुने महासंचालनालयाच्या dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच राज्यातील विविध भागातील स्पर्धकांना संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांना, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेता येईल.

*****  

 

राष्ट्रीय युवा स्वयंसेवक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 23 :  जिल्हयात युवकांचे नेटवर्क तयार करणे भारत सरकारच्या विविध योजनेत सहभाग घेणे व युवकांचे सक्षम नेतृत्व स्विकारुन राष्ट्र निर्माण कार्यात योगदान देण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी दि. 9 मार्च, 2023 पर्यंत अर्ज मागविले आहेत.

भारत सरकार व्दारा युवकांनी त्यांची ऊर्जा व क्षमता यांचा स्वयंसेवेच्या माध्यमातून राष्ट्र निर्माण कार्यात योग्य वापर करणे. तसेच साक्षरता, आरोग्य, स्वच्छता, लिंगभेद, सामाजिक समस्येबाबत जागरुकता अभियान राबविणे तसेच विविध कार्यक्रमांमध्ये प्रमुख भूमिका निभावणे आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे अथवा आपातकालीन परिस्थितीमध्ये प्रशासनास मदत करणे, अशा विविध कार्यक्रमात त्यांना योग्य दिशा देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील विशेषतः ग्रामीण युवक युवतींकडून हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी 02 याप्रमाणे 05 तालुक्यासाठी 10 युवक युवतीची निवड करण्यासाठी तसेच कार्यालयासाठी 02 युवक युवती संगणकाचे काम करण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

यासाठी शैक्षणिक पात्रता किमान एस.एस.सी. (दहावी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उच्च शिक्षण पदवी, पदव्युत्तर व बेसिक कॉम्प्युटर ज्ञान असलेल्यांना प्राधान्य असणार आहे. वयोगट 18 ते 29 वर्षे असून दि. 01 एप्रिल, 2023 ला 18 वर्ष पूर्ण व 29 वर्षापेक्षा कमी असावे. उमेदवारांकडे स्मार्ट मोबाईल फोन व त्याचे विविध ॲपसंबंधी बेसिक माहिती असणे आवश्यक आहे. यामध्ये ई-बँकींग, डीजी धन, सोशल मिडिया इत्यादी ज्ञान असलेल्यांना प्रथम प्राधान्य असणार आहे.

नेहरु युवा केन्द्र संगठन सोबत सलग्नीत युवा मंडळाच्या युवकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. शिक्षण सुरु असणाऱ्या युवक युवती या पदासाठी पात्र ठरणार नाहीत.

 मासिक मानधन व प्रवास भत्ता दरमहा 5 हजार रुपये देण्यात येणार आहे. ही शासकीय नोकरी नाही. एक किंवा दोन वर्ष कार्य केल्यानंतर या कार्याच्या आधारे नौकरी करीता कायदेशीर हक्क दाखविता येणार नाही.

अर्ज कसा करावा नेहरु युवा केन्द्र संगठनच्या WWW.nyks.nic.in  या वेबसाईटवर या योजनेची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. याच संकेतस्थळावर दि. 09 मार्च, 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. ऑनलाइन अर्ज करण्यास अडचण येत असल्यास आवश्यक कागदपत्रासह दि. 09 मार्च, 2023 पर्यंत नेहरु युवा केन्द्र कार्यालयात नाईक नगर जिल्हाधिकारी कार्यालय समोर, हिंगोली या पत्त्यावर येवून विचारपूस करु शकता. अर्जदार ज्या तालुक्यासाठी अर्ज करीत असेल त्या तालुक्यातील रहिवासी असावा आणि त्याच तालुक्यात त्याला काम करावे लागेल, असे जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*****

21 February, 2023

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा

हिंगोली जिल्हा दौरा

 

 

        हिंगोली (जिमाका), दि. 21 :  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे दि. 25 फेब्रुवारी, 2023 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

            शनिवार, दि. 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.10 वाजता परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथील हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने हिंगोलीकडे प्रयाण . 12.50 वाजता पोलीस मैदान हेलिपॅड हिंगोली येथे आगमन. दुपारी 1.00 वाजता मोटारीने रामलीला मैदानाकडे प्रयाण व तेथे आयोजित राष्ट्रीय महामार्गाच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती . 2.05 वाजता रामलीला मैदान येथून मोटारीने शास्त्रीनगर कडे प्रयाण. 2.15 वाजता शास्त्री नगर येथील श्री. राणा खुराणा यांच्या निवासस्थानी राखीव. 2.45 वाजता शास्त्रीनगर हिंगोली येथील हेलिपॅड हिंगोली कडे प्रयाण. 3.00 वाजता हिंगोली हेलिपॅड येथून आगमन करुन हेलिकॉप्टरने नांदेड कडे प्रयाण .

           

*****  

 

हिंगोली येथील दिव्यांग शाळेत हर घर नर्सरी उपक्रम

 





 

        हिंगोली (जिमाका), दि. 21 :  येथील जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण कार्यालय, ज्योतीबा फुले सेवा ट्रस्ट नांदेड व लोकशिक्षण प्रसारक मंडळ हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली निवासी मूकबधीर शाळेत दि. 20 फेब्रुवारी, 2023 रोजी हर घर नर्सरी या उपक्रमांतर्गत बिजारोपण करण्यात आले.

            यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिलहा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कोषागार अधिकारी डॉ.माधवराव झुंजारे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेश येडके, सहाय्यक सल्लागार प्रशांत वैद्य, लक्ष्मण मुंडे, संस्थेचे सचिव व्ही. एस. गुट्टे हे उपस्थित होते.

            याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोषागार अधिकारी श्री. झुंजारे यांनी सद्य परिस्थितीचा आढावा घेता प्राणवायूची कमतरता, त्यासाठी वृक्ष लागवडीचे महत्व उपस्थित कर्मचारी व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले.

            उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या परिसरातील वृक्ष लागवड, परिसर स्वच्छता, शालेय कामकाजाचे नियोजन पाहून कौतूक केले. शाळेतील दीड एकर परिसरातील वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याचे दिसून आल्याने आनंद व्यक्त केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आले.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन राजकुमार वायचाळ यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मूकबधीर विद्यालय, मतिमंद विद्यालय, अस्थिव्यंग विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

*****  

20 February, 2023

 

मॉडेल करिअर मार्गदर्शन व रोजगाराच्या संधीबाबत ऑनलाईन वेबिनार

 

        हिंगोली (जिमाका), दि. 20 :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली अंतर्गत दि. 27 फेब्रुवारी, 2023 रोजी दुपारी 12.30 वाजता google meet https://meet.google.com/ypw-vdio-aiz या लिंकवर मॉडेल करिअर मार्गदर्शन व रोजगाराच्या संधीबाबत ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

            या ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये नवनाथ टोनपे, यंग प्रोफेशनल, मॉडेल करिअर सेंटर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली हे मार्गदर्शन करणार आहेत.

या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचा लाभ घेण्यासाठी https://meet.google.com/ypw-vdio-aiz या ऑनलाईन लिंकवर (meeting URL)  क्लिक करावे. आपल्याकडे गुगल मीट ॲप (google meet app)  यापूर्वी इन्स्टॉल केलेले नसेल तर इन्स्टॉल करुन घ्यावे. आपण गुगल मीट ॲप (google meet app)  मधून कनेक्ट झाल्यानंतर आस्क टू जॉइन (Ask to join) वर क्लिक करावे. या सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी 10 मिनिटे अगोदर जॉईन करावे. दिलेल्या लिंकमधून कनेक्ट झाल्यावर लगेच आपला व्हिडिओ व माईक बंद (Mute) करावा. सत्राच्या शेवटी काही प्रश्न विचारावयाचे असल्यास माईक सुरु (unmute) करुन विचारावे व लगेच माईक बंद करण्याची दक्षता घ्यावी. प्रश्न विचारताना मोजक्या शब्दात विचारावेत. या सर्व सूचनांचे पालन करुन मार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी व्हावेत.

त्या अनुषंगाने जिल्ह्यातील उमेदवारांनी ऑनलाईन मोफत मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. रा. म. कोल्हे, सहायक आयुक्त , जिल्हा कौशल्य  विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. 

****