21 February, 2023

 

हिंगोली येथील दिव्यांग शाळेत हर घर नर्सरी उपक्रम

 





 

        हिंगोली (जिमाका), दि. 21 :  येथील जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण कार्यालय, ज्योतीबा फुले सेवा ट्रस्ट नांदेड व लोकशिक्षण प्रसारक मंडळ हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली निवासी मूकबधीर शाळेत दि. 20 फेब्रुवारी, 2023 रोजी हर घर नर्सरी या उपक्रमांतर्गत बिजारोपण करण्यात आले.

            यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिलहा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कोषागार अधिकारी डॉ.माधवराव झुंजारे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेश येडके, सहाय्यक सल्लागार प्रशांत वैद्य, लक्ष्मण मुंडे, संस्थेचे सचिव व्ही. एस. गुट्टे हे उपस्थित होते.

            याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोषागार अधिकारी श्री. झुंजारे यांनी सद्य परिस्थितीचा आढावा घेता प्राणवायूची कमतरता, त्यासाठी वृक्ष लागवडीचे महत्व उपस्थित कर्मचारी व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले.

            उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या परिसरातील वृक्ष लागवड, परिसर स्वच्छता, शालेय कामकाजाचे नियोजन पाहून कौतूक केले. शाळेतील दीड एकर परिसरातील वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याचे दिसून आल्याने आनंद व्यक्त केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आले.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन राजकुमार वायचाळ यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मूकबधीर विद्यालय, मतिमंद विद्यालय, अस्थिव्यंग विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

*****  

No comments: