02 February, 2023

 

सुकन्या समृध्दी योजनेचे खाते उघडण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 02 : आजादी का अमृत महोत्सव 2023 निमित्त परभणी विभागातील सर्व डाक कार्यालयांतर्गत सुकन्या समृध्दी योजना खाते उघडण्यासाठी दि. 9 व 10 फेब्रुवारी, 2023 रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

पालकांमध्ये बचतीचे महत्व वाढावे तसेच मुलींचे शिक्षण, भवितव्यासाठी ही योजना किती महत्वाची आहे. याबाबत डाक कर्मचारी, ग्रामपंचायत, अंगणवाडी व बाल विकास प्रकल्प अधिकारी या विविध घटकांमध्ये या योजनेचे प्रबोधन करुन दि. 9 व 10 फेब्रुवारी, 2023 रोजी विशेष अभियानात संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या समृध्दी योजनेचे खाते उघडणार आहेत. आठवडी बाजार, मंदिर यात्रा, शाळांमध्ये पालक मेळावे यांच्या माध्यमातून योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचावे असे प्रयत्न आहेत.

योजनेची ठळक वैशिष्ट्ये : फक्त 250 रुपये भरुन खाते उघडता येते. खाते उघडल्यापासून पुढील 15 वर्षापर्यंत खात्यात दरमहा बचत करावी लागते. कमीत कमी 250 व जास्तीत जास्त 01 लाख 50 हजारापर्यंत एका आर्थिक वर्षात भरणा करता येतो. मुलगी 18 वर्षाची झाल्यावर, बारावी उत्तीर्ण झाल्यावर किंवा मुलीचे लग्न जमल्यानंतर जमा रकमेतून 50 टक्के रक्कम फक्त मुलीला काढता येते. खात्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर खात्यातील एकूण रक्कम व्याजासहित काढून ते खाते बंद करता येते.

आवश्यक कागदपत्रे : योजनेचा डाक कार्यालयातील विहित नमुन्यातील अर्ज, मुलीचे जन्म प्रमाणपत्र, मुलीचे आधार कार्ड, पालकाचे आधार कार्ड व पॅनकार्ड, मुलीचे व पालकांचे 02 फोटो व रहिवाशी पुराव्यासाठी आवश्यक कागदपत्रे इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

योजनेची सर्व माहिती परभणी विभागातील नजीकच्या प्रत्येक डाकघर कार्यालयात उपलब्ध आहे. जिल्ह्यातील सर्व डाकघरे आणि शाखा डाकघरे हे जनतेला सेवा देण्यासाठी सदैव अग्रेसर आहेत. सर्व जनतेनी आपल्या आर्थकि प्रगतीस हातभार लावण्यासाठी  आपल्या मुलीचे भविष्य उज्वल बनविण्यासाठी पोस्ट ऑफिस मधील सुकन्या समृध्दी योजना खात्यामध्ये दि. 9 व 10 फेब्रुवारी, 2023 रोजी जास्तीत जास्त गुंतवणूक करुन लाभ घ्यावा, असे आवाहन मोहम्मद खदीर, अधीक्षक डाकघर, परभणी विभाग, परभणी यांनी केले आहे.

*****

No comments: