16 February, 2023

 

आधार कार्ड केवायसी करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 16 : आधार कार्ड प्रत्येक नागरिकांची ओळख बनली आहे. कोणत्याही ठिकाणी आधार कार्ड पुरावा म्हणून महत्त्वाचे आहे. असे असले तरी जिल्ह्यात तब्बल 5 लाख 58 हजार 420 नागरिकांनी आपले आधार कार्ड केवायसी केलेच नाही. परिणामी त्यांच्याकडील आधार कार्डची किंमत शून्य असून, बँक तसेच शासकीय योजनांचा लाभ घेताना मोठी अडचण येऊ शकते. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्डशिवाय ते शक्य नाही. आधार कार्ड काढताना अनेकांनी घरचा पत्ता, मतदान ओळखपत्र तसेच इतर कागदपत्र जोडणे अनिवार्य आहे.

ज्याप्रमाणे बँक किंवा पोस्ट कार्यालयात संबंधित अकाउंट नंबरसाठी विविध कागदपत्र देऊन अपडेट केले जाते. त्याचप्रमाणे आधार कार्डलासुद्धा केवायसी करावे लागते. यासाठी घराचा पत्ता, वीज बिल, बँक पासबुक, मतदान ओळखपत्र तसेच अन्य कागदपत्र जोडावे लागतात.

आधार कार्ड जवळ असूनही त्या कार्डचा बँक शासकीय कार्यालयात उपयोग होऊ शकत नसल्याची  स्थिती आहे. आपले आधार कार्ड केवायसी करुन घेणेच भविष्यासाठी उपयोगाचे ठरणार आहे.

आधार कार्ड काढतांना काहींनी केवळ बोटे आणि डोळे स्कॅन करुन आधार कार्ड काढले. त्यावेळी घराचा पत्ता, मतदान कार्ड आदी कागदपत्रे जोडले नाही . त्यामुळे या नागरिकांचे आधार कार्ड केवायसी झाले नाही. परिणामी त्या सर्वांना आता आधार कार्ड केवायसी करणे अनिवार्य आहे. त्यामुळे आधार कार्ड केवायसी करण्यासाठी जवळच्या आधार कार्ड केंद्रामध्ये जाऊन केवायसी करता येते. त्यासाठी प्रत्येकांना 50 रुपये फी भरावी लागणार आहे. यासंदर्भात पावतीसुद्धा केंद्र चालक देणार आहेत.

आधार कार्ड काढण्याची योजना 2010 मध्ये  सुरु झाली, तेव्हा आधार केंद्राची संख्या मर्यादित होती. अनेकांना रांगेत राहून आधार कार्ड काढावे लागले. तेव्हा आधार कार्ड काढताना काही नागरिकांनी त्याच्याकडील कागदपत्रेच दिली नाही. त्यामुळे आधार कार्ड निघाले मात्र ते अपडेट झालेच नाहीत.

त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या जवळच्या आधार केंद्रावर जाऊन आधार केवायसी करणे अनिवार्य आहे. या नागरिकांचे आधार केवायसी करण्यासाठी जनजागृती सुरु करण्यात आली आहे. नागरिकांनी आधार कार्ड केवायसी केले नाही तर भविष्यात त्यांना अडचण येऊ शकते व त्यांचे आधार कार्ड निष्क्रिय होऊ शकते. नागरिकांना आधारबद्दल काही अडचण आल्यास आयटी सेल, जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे संपर्क करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.

 

*****

No comments: