28 February, 2023

 

पौष्टिक तृणधान्य प्रभात फेरीचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ

 



हिंगोली (जिमाका), दि. 28 : पौष्टिक तृणधान्य पिकातील पोषण मूल्य व त्यांच्या सेवनामुळे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम जन सामान्याच्या लक्षात येण्यासाठी कृषि विभागामार्फत आयोजित पौष्टिक तृणधान्य प्रभात फेरीचे पुणे येथील कृषी आयुक्तालयाच्या कृषि अधिकारी नीलम बोरकर यांच्या हस्ते आज येथील जिल्हा परिषद शाळा येथून हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.

ही प्रभात फेरी  जिल्हा परिषद शाळा- पिपल्स बँक-आखरे मेडिकल पॉईट-जवाहर रोड-गांधी चौक-इंदिरा गांधी चौक या मार्गे अण्णाभाऊ साठे वाचनालय येथे विसर्जित झाली.

सहभागी झालेल्या अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी ‘‘नाचणीचे लाडू लागतात गोड पचनशक्तीला नाही तोड’’ अशा घोषणा, तृणधान्य आधारित अभंग, पोवाडे इत्यादीद्वारे जनजागृती करुन प्रभात फेरी पार पडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे यांनी केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालय येथे पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व या विषयावर डॉ. संजय घुगे यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले.  

"आंतरराष्ट्रीय पोष्टिक तृणधान्य वर्ष 2023" या संकल्पनेअंतर्गत ज्वारी, बाजरी, नाचणी " इत्यादी पौष्टिक तृणधान्य पिकाच्या उत्पादन वाढीबरोबरच या पिकांचे आरोग्यविषयक फायद्याबाबत जनजागृती करुन लोकांच्या आहारातील त्यांचे प्रमाण वाढविणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.

"आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023" साजरे करण्यासाठी केंद्र शासनाने "विशेष महिना म्हणुन महाराष्ट्र राज्यासाठी फेब्रुवारी-2023 हा महिना नेमून दिलेला असल्याने या महिन्यात या तृणधान्य पिकांची जास्तीत  जास्त प्रसिध्दी करावयाची आहे. त्याचबरोबर "पोष्टिक तृणधान्य विशेष माहिना (मिलेट ऑफ द मंथ)" या संकल्पनेअंतर्गत फेब्रुवारी महिना हा ज्वारी पिकासाठी समर्पित असल्याने ज्वारी पिकाच्या प्रचार व प्रसिध्दीवर विशेष भर द्यावयाचा आहे.

या प्रभात फेरी दरम्यान हिंगोली शहर पोलिसांनी उत्तम बंदोबस्त ठेवला होता. आयोजनासाठी नगरपालिका प्रशासनाचे सुध्दा उत्कृष्ट सहकार्य लाभले. शेवटी सहभागी झालेल्या शेतकरी, अधिकारी व कर्मचारी यांचे आभार कृषि उपसंचालक एस. व्ही. लाडके यांनी मानले.

****

No comments: