08 February, 2023

 जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित


•       जिल्हास्तरावर होणार समस्यांचा जलद निपटारा



हिंगोली (जिमाका), दि. 07 : ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न, शासनस्तरावरील कामे यासंदर्भात वेळोवेळी प्राप्त होणारी निवेदने, अर्जांवर जलद गतीने कार्यवाही व्हावी, तसेच प्रशासनात अधिकाधिक व प्रभावीपणे लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.


जिल्ह्यातील उपलब्ध असलेले अधिकारी, कर्मचारी यांच्यामधून आवश्यक अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवा मुख्यमंत्री सचिवालय कक्षासाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या असून निवासी उपजिल्हाधिकारी हे या कक्षाचे पदसिध्द विशेष कार्य अधिकारी असतील. तसेच एक नायब तहसीलदार व एक महसूल सहायक हे या कक्षाचे काम पाहतील. सर्वसामान्य जनतेकडून मुख्यमंत्री महोदय यांना उद्देशून लिहिलेले दैनंदिन अर्ज, निवेदने, संदर्भ इत्यादी या कक्षामध्ये स्वीकारले जातील. तसेच त्याबाबतची पोचपावती अर्जदाराला देण्यात येईल.


जे अर्ज, संदर्भ व निवेदने यावर जिल्हास्तरावरुन कार्यवाही होणे अपेक्षित आहे, अशी प्रकरणे जिल्हास्तरावरील संबंधित विभाग प्रमुखाकडे वर्ग करुन त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच ज्या प्रकरणांमध्ये शासन स्तरावरुन कार्यवाही होणे अपेक्षित आहे, असे सर्व वैयक्तिक, धोरणात्मक अर्ज, संदर्भ व निवेदने मुंबई येथील मुख्यमंत्री सचिवालयाचे अपर मुख्य सचिव यांना सादर करण्यात येणार आहेत.


हिंगोली जिल्ह्यातील जनतेला आपले अर्ज मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे सादर करता येतील. अर्धन्यायिक स्वरुपातील अर्ज व शासकीय कर्मचारी यांचे सेवेविषयी अर्ज या कक्षात स्वीकारले जाणार नाहीत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी दिली.   

 *****

No comments: