13 February, 2023

 

खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राला तिसऱ्यांदा अजिंक्यपद

 

हिंगोली (जिमाका), दि. 13 :  देशातील प्रतिभासंपन्न युवा पिढीला त्यांचे क्रीडा कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत दरवर्षी खेलो इंडिया युथ गेम्स या क्रीडा स्पर्धेचे आयोजन देशात करण्यात येत आहे.

यावर्षी पाचव्या खेलो इंडिया युथ गेम्स 2022-23 चे आयोजन मध्य प्रदेश राज्यामार्फत करण्यात आले होते. मध्यप्रदेश मध्ये 08 व दिल्ली येथे 01 असे एकूण 09 ठिकाणी 27 क्रीडा प्रकाराच्या स्पर्धाचे दि. 30 जानेवारी ते 12 फेब्रुवारी, 2023 या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. पाचव्या खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये समावेश करण्यात आलेल्या एकूण 27 क्रीडा प्रकारांपैकी महाराष्ट्र राज्याने 24 क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग नोंदविला होता. या 24 क्रीडा प्रकारांमध्ये एकूण 384 खेळाडू व 113 क्रीडा मार्गदर्शक व्यवस्थापक, सहाय्यक कर्मचारी वर्ग, अधिकारी व पदाधिकरी यांचा सहभाग होता.

महाराष्ट्र राज्याने सहभाग घेतलेल्या एकुण 24 क्रीडा प्रकारांपैकी राज्यास 20 क्रीडा प्रकारामध्ये 56 सुर्वणपदके, 55 रौप्यपदके व 50 कांस्यपदके अशी एकूण 161 पदके प्राप्त झाली असून पाचव्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्र राज्याने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करीत अव्वल स्थान प्राप्त केले आहे.

राज्यातील खेळाडूंनी संपादित केलेल्या पदकांचे विवरण खालीलप्रमाणे आहे.

मैदानी खेळामध्ये 03 सुवर्ण, 07 रजत व 03 कास्य असे एकूण 13 पदके मिळविले आहेत. आर्चरी खेळामध्ये 01 सुवर्ण, 02 रजत व 02 कास्य असे एकूण 05 पदके मिळविले आहेत. कबड्डी खेळामध्ये 01 रजत व 01 कास्य असे एकूण 02 पदके मिळविले आहेत. खो-खो खेळामध्ये 01 सुवर्ण व 01 कास्य असे एकूण 02 पदके मिळविले आहेत. बॉक्सींग खेळामध्ये 03 सुवर्ण, 01 रजत व 02 कास्य असे एकूण 06 पदके मिळविले आहेत. योगासन खेळामध्ये 05 सुवर्ण, 06 रजत व 05 कास्य असे एकूण 16 पदके मिळविले आहेत. मल्लखांब खेळामध्ये 02 सुवर्ण, 03 रजत व 04 कास्य असे एकूण 09 पदके मिळविले आहेत. जलतरण खेळामध्ये 16 सुवर्ण, 05 रजत व 07 कास्य असे एकूण 28 पदके मिळविले आहेत. तलवारबाजी खेळामध्ये 04 सुवर्ण, 03 रजत व 02 कास्य असे एकूण 09 पदके मिळविले आहेत. ज्युदो खेळामध्ये 01 सुवर्ण, 04 रजत व 02 कास्य असे एकूण 07 पदके मिळविले आहेत. जिम्नॅस्टिक्स खेळामध्ये 07 सुवर्ण, 05 रजत व 07 कास्य असे एकूण 19 पदके मिळविले आहेत. सायकलींग मध्ये 04 सुवर्ण, 06 रजत व 02 कास्य असे एकूण 12 पदके मिळविले आहेत. बॅडमिंटन मध्ये 01 रजत पदक मिळविले आहे. लॉनटेनिस मध्ये 01 कास्य पदक मिळविले आहे. टेबल टेनिस मध्ये 02 सुवर्ण, 01 रजत व 02 कास्य असे एकूण 05 पदके मिळविले आहेत. कॅनोइंग/कयाकिंग मध्ये 01 कास्य पदक मिळविले आहे. रोईंग मध्ये 01 रजत पदक मिळविले आहे. शुटींगमध्ये 01 सुवर्ण, 01 रजत व 02 कास्य असे एकूण 04 पदके मिळविले आहेत. वेटलिफ्टींग मध्ये 04 सुवर्ण, 01 रजत व 02 कास्य असे एकूण 07 पदके मिळविले आहेत. कुस्ती मध्ये 02 सुवर्ण, 06 रजत व 04 कास्य असे एकूण 12 पदके मिळविले आहेत.

पाचव्या खेलो इंडिया युथ गेम्स 2022-23 मध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंची वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी

योगासन या क्रीडा प्रकारामध्ये महाराष्ट्राच्या स्वराज फिसके या इयत्ता सहावीमध्ये शिकत असलेल्या केवळ 11 वर्ष वय असलेल्या खेळाडूने आर्टिस्टिक सिंगल या स्पर्धा प्रकारात सुवर्णपदक व पारंपारिक योगा या स्पर्धा प्रकारात कांस्यपदक प्राप्त करुन या क्रीडा स्पर्धेतील सर्वात कमी वयाचा पदक विजेता होण्याचा बहुमान पटकाविला आहे.

जलतरण या क्रीडा प्रकारात अपेक्षा फर्नांडिस या मुंबईच्या खेळाडूने 200 मी. ब्रेस्टस्ट्रोक या स्पर्धा प्रकारात 2 मि. 39.87 सेकंद इतकी वेळ नोंदवित खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये नवीन उच्चांक प्रस्थापित करीत सुवर्ण पदक संपादित केले आहे.

वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात कु. अस्मिता दत्तात्रय ढोणे या कोल्हापूरच्या खेळाडूने 45 किलो वजनगटात क्लीन अॅन्ड जर्क या स्पर्धा प्रकारात 82 कि. ग्रॅ. इतके वजन उचलून नवीन उच्चांक प्रस्थापित करत रौप्य पदक प्राप्त केले आहे. तर कु. वीणाताई संतोष आहेर या खेळाडूने 40 किलो वजनगटात 57 किलो स्नॅच आणि 72 किलो क्लीन अॅन्ड जर्क असे एकूण 129 किलो वजन उचलून नवीन राष्ट्रीय विक्रम केलेला आहे.

वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात कु. आकांक्षा किशोर व्यवहारे या खेळाडूने 45 किलो वजनगटात 67 किलो स्नॅच आणि 77 किलो क्लीन अॅन्ड जर्क असे एकूण 144 किलो वजन उचलून राष्ट्रीय विक्रमाची बरोबरी केलेली आहे. महाराष्ट्राच्या खो-खो मुले या संघाने सलग पाचव्यांदा सुवर्णपदक पटकावले आहे.

खेलो इंडिया युथ गेम्स बाबत संक्षिप्त माहिती

पहिल्या खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन दिल्ली येथे करण्यात आले होते. 2018 मध्ये आयोजित या स्पर्धेमध्ये एकूण 16 क्रौडा प्रकारांचा समावेश होता. या क्रीडा स्पर्धेमध्ये 38 सुवर्ण पदकांसह एकूण 102 पदके प्राप्त करुन हरयाणा प्रथम स्थानावर तर 36 सुवर्ण पदकासह एकूण 111 पदके प्राप्त करत महाराष्ट्र राज्यास व्दितीय स्थानावर समाधान मानावे लागले होते.

पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स 2019 मध्ये एकूण 18 क्रीडा प्रकाराचा समावेश होता. या क्रीडा स्पर्धेमध्ये 85 सुवर्ण पदकांसह एकूण 228 पदके प्राप्त करुन महाराष्ट्र राज्याने प्रथम स्थान प्राप्त केलेले होते. तर 62 सुवर्ण पदकासह एकूण 178 पदके प्राप्त करुन हरयाणाने व्दितीय स्थान प्राप्त केले होते.

गुवाहाटी, आसाम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स 2020 मध्ये एकूण 20 क्रीडा प्रकारांचा समावेश होता. या क्रीडा स्पर्धेमध्ये 78 सुवर्ण पदकांसह एकूण 256 पदके प्राप्त करुन महाराष्ट्र राज्याने प्रथम स्थान प्राप्त केलेले होते. तर 68 सुवर्ण पदकासह एकूण 200 पदके प्राप्त करुन हरयाणाने व्दितीय स्थान प्राप्त केले होते.

हरयाणा (पंचकुला) या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्स 2022 मध्ये एकूण 25 क्रीडा प्रकारांचा समावेश होता. या क्रीडा स्पर्धेमध्ये 52 सुवर्ण पदकांसह एकूण 137 पदके प्राप्त करुन हरयाणा राज्याने प्रथम स्थान प्राप्त केलेले होते. तर 45 सुवर्ण पदकासह एकूण 125 पदके प्राप्त करुन महाराष्ट्राने व्दितीय स्थान प्राप्त केले होते.

नुकत्याच मध्यप्रदेश मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या खेलो इंडिया युथ गेम्स 2022 मध्ये एकूण 27 क्रीडा प्रकारांचा सहभाग होता. या क्रीडा स्पर्धेमध्ये 56 सुवर्ण पदकांसह एकूण 161 पदके प्राप्त करुन महाराष्ट्र राज्याने प्रथम स्थान प्राप्त केलेले आहे. तर 41 सुवर्ण पदकासह एकूण 128 पदके प्राप्त करुन हरयाणाने व्दितीय स्थान प्राप्त केले आहे.

राज्यातील खेळाडूंनी देशाच्या नकाशावर महाराष्ट्राचे नाव क्रीडा क्षेत्रात अग्रक्रमावर पुन्हा एकदा कोरल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले व आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये देखील अशाच कामगिरीची खेळाडूंकडून अपेक्षा व्यक्त केली. यासाठी आवश्यक मदत करण्यास राज्य शासन तत्पर असल्याबाबत आश्वस्त केले आहे.

राज्याचे क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले असून खेळाडूंना मुलभूत कौशल्यापासून तर पारंगत दर्जाचे प्रशिक्षण व त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन क्रीडा विकास आराखडा तयार करीत असल्याचे प्रतिपादन केले. तसेच या आराखड्याच्या आधारावर काम करुन येणाऱ्या काही वर्षात राज्यातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने पदके जिंकतांना दिसतील असा विश्वास व्यक्त केला आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

*******

No comments: