30 November, 2023

 

पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा हिंगोली जिल्हा दौरा

 

                   

                हिंगोली (जिमाका), दि. 30 :  राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे दि. 30 नोव्हेंबर व 01 डिसेंबर, 2023 या दोन दिवशीय हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार, दि. 30 नोव्हेंबर, 2023 रोजी सायंकाळी 6.00 वाजता जंगला तांडा ता. सोयगाव येथून हिंगोलीकडे प्रयाण करुन रात्री 9.00 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन, राखीव व मुक्काम.

शुक्रवार, दि. 01 डिसेंबर, 2023 रोजी  सकाळी 9.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथून मौ. हिवरा जाटू ता. औंढा नागनाथ येथे नुकसाग्रस्त शेतीची पाहणीसाठी प्रयाण. सकाळी 10.30 वाजता मौ. हिवरा जाटू ता. औंढा नागनाथ येथे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी . 10.45 वाजता मौजे गोजेगाव ता. ओंढा नागनाथ येथील वीज पडून मयत झालेल्या राजू शंकर जायभाये यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट. 11.00 वाजता मौजे. गोजेगाव येथून हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 12.00 वाजता सर्व संबंधित अधिकाऱ्यांची डीपीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे आढावा बैठक . 12.45 वाजता विश्रामगृह हिंगोली येथे राखीव व नंतर मौ. बिरडा ता. हिंगोली येथे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी. 13.00 वाजता मौ.बिरडा ता. हिंगोली येथून मौ. कानरखेडा (बु.) ता.हिंगोली येथे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी. 13.30 वाजता वाशिम मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण .

******

 

शासकीय ग्रंथालयात दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन

 


                   

                हिंगोली (जिमाका), दि. 30 :  येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात आयोजित दिवाळी अंक प्रदर्शनाचे आज उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष खंडेराव सरनाईक, मराठवाडा साहित्य परिषदेचे अशोक अर्धापूरकर, आदर्श महाविद्यालयाचे प्रा. रमेश दळवी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, मिलिंद सोनकांबळे, शंभूनाथ दुभळकर, ग्रंथालय पदाधिकारी व विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या उद्घाटन कार्यक्रमानंतर जिल्हा ग्रंथ निवड समितीची बैठकीत सन 2023-24 या वर्षासाठी जिल्हा ग्रंथालयासाठी सर्व समावेशक व दर्जेदार ग्रंथ/पुस्तके खरेदीसाठी चर्चा करण्यात आली.

हिंगोली जिल्हयातील सर्व ग्रंथप्रेमी, वाचकांनी मोठ्या प्रमाणात सभासद होऊन सहभाग नोंदवावा व वाचनाचा आनंद घ्यावा. यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरु नगर, रिसाला नाका, हिंगोली (सपंर्क क्र. 9403067267)  येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.       

हे ग्रंथ प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरु नगर, रिसाला नाका, हिंगोली येथे येऊन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.

******

29 November, 2023

 

जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे

                         

  हिंगोली (जिमाका), दि. 29 : दर दोन वर्षानी आयोजित केली जाणारी जागतिक कौशल्य स्पर्धा सन 2024 मध्ये फ्रान्स (ल्योन) येथे होणार आहे. ही जगातील सर्वात मोठी व्यवसायिक आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील 23 वर्षाखालील तरुणांसाठी त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा ही ऑलिम्पीक खेळासारखीच आहे. त्यानुषंगाने या स्पधे्रच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने 52 क्षेत्राशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्कील कौन्सिल, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार या स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवरुन प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे मानांकन करण्याच्या द्ष्टीने आयोजित स्पर्धेसाठी सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये तसेच इतर महाविद्यालये यासह महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अधिनस्त सर्व व्यवसाय प्रशिक्षण संस्था यांना या स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार आहे.

या स्पर्धेसाठी वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी 2002 किंवा त्यानंतर असणे अनिवार्य आहे. तसेच ॲडक्टीव्ह मन्युफक्चरींग, क्लाऊड कॉम्युंटींग, सायबर सेक्युरिटी, डिजिटल कन्स्ट्रक्शन, इंडस्ट्रियल डिझाईन टेक्नॉलाजी, इंडस्ट्री 4.0 , इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशन नेटवर्क केबलींग, रोबोट सिस्टीम इंटीग्रेशन ॲन्ड वाटर टेक्नॉलाजी या क्षेत्रासाठी उमेदवारांचा जन्म दि. 1 जानेवारी 1999 किंवा त्यानंतरचा असणे अनिवार्य आहे.

या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी इच्छूक पात्र उमेदवारांनी https://kaushalya.mahaswayam.gov.in या लिंकवर भेट देऊन आपली नोंदणी करावी. दि. 30 नोव्हेंबर, 2023 ही नोंदणीची शेवटचा दिनांक असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय तंत्रनिकेतन आणि इतर प्रशिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांनी तसेच कौशल्य धारण केलेल्या युवक-युवतींनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन डॉ. रा. म. कोल्हे, सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, हिंगोली यांनी केले आहे.

*******

 

जागतिक एड्स दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

                                                                       

                                     

  हिंगोली (जिमाका), दि. 29 : राज्य एड्स नियंत्रण संस्था, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष,  जिल्हा रुग्णालय, हिंगोली यांच्यामार्फत दि. 1 डिसेंबर 2023 जागतिक एड्स दिनानिमित्त दि. 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर, 2023 या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. 1 डिसेंबर, 2023 रोजी जिल्हा व तालुकास्तरावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. दि. 6 डिसेंबर, 2023 रोजी आठवी ते 11 वी च्या विद्यार्थ्यांसाठी डापकू कार्यालयातर्फे प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. दि. 8 डिसेंबर रोजी डापकू सभागृहात सीएलएचआयव्ही रांगोळी स्पर्धा, निबंध स्पधा व पारितोषिक वितरण कार्यक्रम तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास प्रमाणपत्राचे वाटप कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील प्रमुख बसस्थानक येथे एचआयव्ही तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 9 डिसेंबर, 2023 रोजी हिंगोली व वसमत रेल्वे स्थानकावर एचआयव्ही तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच दि. 1 ते 31 डिसेंबर, 2023 या कालावधीत जिल्हाभरात रक्तदान शिबिराचे आयोजन करुन पोस्टर प्रदर्शन, माहिती शिक्षण संवाद पत्रके वाटप कार्यक्रम, जिल्ह्यातील विविध महाविद्यालयात एचआयव्ही/एड्स वर तज्ञांमार्फत व्याख्यान, आरआरसी (रेड रिबन क्लब) मार्फत रेल्वे स्टेशन, बसस्थानक, चौक, बाजार इत्यादी गर्दीच्या ठिकाणी फ्लॅश मोबचे आयोजन, पथनाट्य, रिल मेकींग व इतर स्पर्धा घेण्यात येणार आहेत. एचआयव्ही/एड्स विषयी लेख, आकाशवाणीवर मुलाखत कार्यक्रम तसेच देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी एनजीओच्या मदतीने मेळावा आयोजित करणे, जिल्ह्यातील विविध कार्यालयामध्ये एचआयव्ही/एड्स जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, हिंगोली यांनी दिली आहे.

********

 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ व बार्टीच्या संयुक्त विद्यमाने

मातंग व तत्सम जातीतील समाज बांधवांना योजनांची माहिती देण्यासाठी मेळावा उत्साहात संपन्न

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मार्फत मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी व मादिगा या जातीतील समाज बांधवासाठी विविध योजना राबविण्यात येतात. महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत व शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी  नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील मातंग व तत्सम जातीतील समाज बांधवासाठी दि. 24 नोव्हेंबर, 2023 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह, ग्यानमाता शाळेसमोर, नांदेड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला .

मेळावा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनिष सांगळे हे होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महामंडळाचे महाव्यवस्थापक अनिल रा. म्हस्के, प्रादेशिक व्यवस्थापक आर. जी. दरबस्तेवार उपस्थित होते.

प्रस्ताविकात नांदेड येथील महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक टी. आर. शिंदे यांनी महामंडळाच्या योजनांची माहिती दिली. तदनंतर सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रपती पुरष्कार प्राप्त शिक्षक डॉ. शिवा कांबळे, प्रा.अमरजित आईलवाड, सामाजिक कार्यकर्ते लालबाजी घाटे, प्रकाश मुराळकर, स्थायी समिती सदस्य नामदेव कांबळे, वसमत येथील नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते रविकिरण वाघमारे तसेच अण्णाभाऊ साठे पुरष्कार प्राप्त हरीबाई कांबळे, रमेश गायकवाड यांनी मार्गदर्शनपर मनोगत करताना महामंडळातोल योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी काही सुचना/विनती करण्यात आली.  तसेच मनोगतामध्ये प्रामुख्याने जामीनदारांची अट शिथिल करण्याबाबत विनंती करण्यात आलेली आहे. तसेच महामंडळाचे लाभार्थी यशस्वी उद्योजक रमेश गायकवाड यांची त्यांच्या यशाबद्दल व महामंडळाच्या योजनेबद्दल मनोगत व्यक्त केले.

महामंडळाचे महाव्यवस्थापक अनिल रा. म्हस्के यांनी आपल्या भाषणामध्ये महामंडळाच्या सुरु असलेल्या योजना, प्रस्तावित योजना, नव्याने सुरु करावयाच्या योजना याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच या सर्व योजना मातंग समाज व तत्सम जातीतील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी या प्रचार व प्रसिध्दी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगून महामंडळमार्फत पूर्वी राबविण्यात येत असलेलया साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेमध्ये बदल करुन देण्यात येणान्या प्रोत्साहनपर रक्कमेत देखील मोठया प्रमाणात वाढ करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच एनएसएफडीसी योजना व त्यासाठी आवश्यक असलेली खंडहमी मिळण्यासाठी व सर्व सुरु असलेल्या योजना व प्रस्तावित योजना प्रभावीपणे सुरु राहण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरु असल्याबाबत माहिती दिली. तसेच महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणात घेण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनिष सांगळे यांनी महामंडळाचा पदभार स्वीकारल्यापासून केलेल्या कामाजाचा आढावा सादर केला, तसेच लाभार्थीनी योजनांचा लाभ घेण्यासाठी व्यवसाय निवड करताना, नवीन व नाविन्यपूर्ण व्यवसाय निवडीबाबत मार्गदर्शन केले, तसेच महामंडळाच्या योजना व प्रस्तावित योजना याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच शासनाने धाराशीव जिल्ह्यातील तुळजापूर येथे महामंडळास उपलब्ध करुन दिलेल्या जागेवर सुरु करण्यात येणाऱ्या युपीएससी / एमपीएससी सेंटर व बहुउपयोगी प्रशिक्षण केंद्राबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रकल्प अधिकारी समतादूत बार्टी सुजाता पोहरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु. विशाखा बंडेवार, विनोद पाचंगे यांनी केले. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. या मेळाव्यासाठी नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील समाजबांधव, सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

********

 

आंतरराष्ट्रीय दत्तक महिनानिमित्त जवळा,असोला व गोरेगाव येथे जनजागृती

                                                                           


        

                         

  हिंगोली (जिमाका), दि. 29 : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. मगर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार आंतरराष्ट्रीय दत्तक महिना निमित्ताने हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जवळा बाजार आशा वर्कर्स, जवळा बाजार पोलीस चौकी, मौजे असोला येथे व सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र इत्यादी ठिकाणी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.

यावेळी गोरेगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र हुंडेकर, जवळा पोलीस चौकी पोलीस उपनिरीक्षक पी. सी. जाधव, जवळा बाजार येथील आशा गट प्रवर्तक मैना देवकत्ते व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून बालकासंदर्भात आणि बालकांशी निगडीत विविध विषयावर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. कोणतेही बालक परस्पर दत्तक घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. यासाठी कायदेशीर प्रक्रिया www.cara.wcd.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन इच्छूक पालक बालकाला दत्तक घेण्यात यावेत. जेणेकरुन दत्तक घेणाऱ्या पालकांचे व दत्तक घेतलेल्या बालकांचे अधिकार अबाधित राहतील. याविषयीची माहिती तसेच बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006, लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण 2012, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना, बाल कामगार प्रतिबंध कायदा 1986, बाल हक्क संहिता इत्यादी विषयाची सविस्तर माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या कायदा तथा परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित, सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा पठाण, रामप्रसाद मुडे यांनी दिली. बालकांसाठी चाईल्ड हेल्पलाईन 1098 बाबतची माहिती हिंगोलीचे केस वर्कर तथागत इंगळे यांनी दिली. तसेच यावेळी अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले.   

*****      

28 November, 2023

 

आंतरराष्ट्रीय दत्तक महिनानिमित्त कुरुंदा येथे जनजागृती

                                                                                   

                         


  हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. मगर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार आंतरराष्ट्रीय दत्तक महिना निमित्ताने हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील पोलीस स्टेशन येथे दि. 23 नोव्हेंबर, 2023 रोजी माहिती पत्रक लावून जनजागृती करण्यात आली.

यावेळी कुरुंदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मोरे, पोलीस निरीक्षक गवळी इत्यादी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

नोव्हेंबर हा महिना आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून बालकासंदर्भात आणि बालकांशी निगडीत विविध विषयावर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. कोणतेही बालक परस्पर दत्तक घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. यासाठी कायदेशीर प्रक्रिया www.cara.wcd.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन इच्छूक पालक बालकाला दत्तक घेऊ शकतो, अशी माहिती बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी दिली. बालकांसाठी चाईल्ड हेल्पलाईन 1098 बाबतची माहिती संदीप कोल्हे यांनी दिली. बालकांसाठी असलेल्या बाल संगोपन योजनेविषयीची माहिती राजरत्न पाईकराव यांनी दिली. तसेच यावेळी अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले.   

*****