27 January, 2025
बर्ड फ्लू रोगाबाबत अनावश्यक गैरसमज पसरवू नये
हिंगोली (जिमाका), दि. 27 : राज्यात रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात, ठाणे जिल्ह्यातील कोपरी या गावातील पक्षांमध्ये व लातूर जिल्ह्यातील उदगीर या ठिकाणी कावळ्यामध्ये झालेली मरतूक ही एव्हीएन इन्फल्यूएन्झा (बर्ड फ्लू) H5N1 या आजाराने झाल्याचे निदान राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान, भोपाळ यांनी कळविले आहे. या आजाराचा राज्यातील इतर भागात फैलाव होण्याची तसेच बाजारामध्ये अंडी, चिकन विक्रीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या आजाराबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.
उकडलेली अंडी व शिजवलेले चिकन खाणे मानवी आरोग्यास पूर्णपणे सुरक्षित आहे. पक्षाची मरतूक आढळल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना, पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री क्रमांक 18002330418 / 1962 वर त्वरित संपर्क करावा. तसेच बर्ड फ्लू रोगाबाबत अनावश्यक गैरसमज व अफवा पसरवू नये, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
******
जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू
हिंगोली (जिमाका), दि. 27 : जानेवारी महिन्यात हिंगोली जिल्ह्यात होणाऱ्या विविध सण-उत्सव, स्पर्धा आणि सभा, बैठका, धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी दिले आहेत.
दि. 28 जानेवारी रोजी लाला लजपतराय जयंती व शब-ए-मेहराज (बडीरात) असून विविध देवी देवतांच्या वार्षिक यात्रा व उत्सव, अखंड हरिनाम सप्ताह, शंकर पटाच्या शर्यती, कब्बडी, कुस्ती आयोजित करण्यात येतात. तसेच मराठा आरक्षण संबंधाने आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असून धनगर, ओबीसी आरक्षण व इतर समाजाचे आरक्षणसंबंधी चालू असलेली आंदोलने व सध्या घडणाऱ्या राजकीय घडामोडी, नागरिक, विविध संघटना, पक्ष यांच्या मागण्यासंदर्भात मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे करीत असतात. अशा विविध घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात दि. 25 जानेवारी, 2025 रोजी मध्यरात्रीपासून ते दि. 9 फेब्रुवारी, 2025 रोजी मध्यरात्रीपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) अन्वये शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्याजवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तूजवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटकद्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल, अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समूहाच्या भावना जाणून बुजून दुखावतील, या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात आले आहे. हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
******
26 January, 2025
हिंगोली येथे 28 व 29 जानेवारीला ग्रंथोत्सव ग्रंथ प्रदर्शन-विक्री, नवोदितांचे कवी संमेलन, परिसंवाद, व्याख्यानाची मेजवानी
हिंगोली (जिमाका), दि. 26 : महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी, कार्यालय हिंगोली यांच्या विद्यमाने ‘हिंगोली ग्रंथोत्सव-2024’ चे आयोजन करण्यात आले आहे. कै.रं.रा.बियाणी नुतन साहित्य मंदिर वाचनालय, बियाणी नगर, हिंगोली येथे मंगळवार, दि. 28 व बुधवार, दि. 29 जानेवारी, 2025 असे दोन दिवसात ग्रंथप्रेमींना विविध कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे. ग्रंथप्रसार, प्रदर्शन व विक्री असा या ग्रंथोत्सवाचा उद्देश असून त्यात शासकीय प्रकाशने व दुर्मिळ ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
दि. 28 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता कै.र.रा.बियाणी नुतन साहित्य मंदिर वाचनालय, बियाणी नगर येथून मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचा शुभारंभ होणार आहे. या दिंडीमध्ये विविध लोककला सादरीकरण लेझिम पथक, भजनी मंडळ यासह विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आसाराम लोमटे यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अभिनव गोयल हे राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे पालकमंत्री नरहरी झिरवाळ, खासदार नागेश पाटील-आष्टीकर, मा. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील, आमदार सर्वश्री सतिश चव्हाण, विक्रम काळे, श्रीमती डॉ. प्रज्ञा सातव, आमदार तान्हाजी मुटकुळे, संतोष बांगर, चंद्रकांत नवघरे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, ग्रंथालय संचालक अ. मा. गाडेकर, औरंगाबाद येथील सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, गजेंद्र बियाणी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दिनांक 28 जानेवारी, 2025 रोजी दुपारच्या सत्रात दुपारी 3 ते 6 या वेळेत "कवी संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. तर दि 29 जानेवारी रोजी दुसऱ्या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीत भारतीय राज्यघटनेचा सरनामा या विषयावर प्रा. डॉ. प्रमोद इंगोले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जीवन आणि कार्य या विषयावर प्रा. डॉ. सुनंदा भुसारे यांचे, वीर बिरसा मुंडे यांचे जीवन आणि कार्य या विषयावर प्रा. डॉ. सतीश ढाकरे यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या सत्रात दुपारी 3 ते 4 या वेळेत मराठी भाषेचा अभिजात दर्जा आणि संवर्धन या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर दुपारी 4 वाजता दोन दिवशीय ग्रंथोत्सवाचा समारोप व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. या दोन दिवसीय ग्रंथोत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रंथोत्सव समन्वय समितीने केले आहे.
******
पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी घेतला जिल्हा विकास आराखडा व जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा
हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्याचा प्रयत्न राहील
- पालकमंत्री नरहरी झिरवाळ
हिंगोली (जिमाका), दि. 26 : हिंगोली जिल्ह्याच्या शिक्षण, आरोग्य, वीज, पर्यटन, कृषि, सिंचन यासह विविध क्षेत्राचा विकास करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या राज्यस्तरीय बैठकीत हिंगोली जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी यावेळी केले.
येथील जिल्हा नियोजन समितीची बैठक राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस आमदार राजू नवघरे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. डोंगरी विकास योजनेतून डोंगरी भागातील अंगणवाड्यांचे बांधकाम करावे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील रस्ते व पूल पुरात वाहून गेले आहेत. ते प्राधान्याने दुरुस्त करावेत.
सीसीटीव्ही व इतर सुविधेसाठी निधीची आवश्यकता असल्यास तशी मागणी नोंदवावी. तसेच ग्रामीण रस्त्याची कामे मागणीप्रमाणे पूर्ण करावीत. आरोग्य विभागामार्फत सामान्य नागरिकांला आरोग्य सेवा मिळण्यासाठी आरोग्य विभागाने सर्व पायाभूत सोयीसुविधा निर्माण कराव्यात. यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल,असे सांगितले.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आरोग्य विभाग, महावितरण विभाग, शालेय शिक्षण विभाग, जलसंधारण, तीर्थस्थळ, पर्यटन स्थळ यासाठी उपलब्ध निधीचे योग्य नियोजन करुन सदर निधी लोककल्याणकारी योजना राबविण्यासाठी वेळेत खर्च करावा. तसेच सन 2024-25 आराखड्यातील विविध कामांवर झालेल्या खर्चाचा तसेच नियोजित प्रस्तावित खर्चाचा देखील आढावा घेतला. सर्व संबंधित विभागांनी सन 2024-25 अंतर्गत त्यांना प्राप्त झालेल्या निधीचे योग्य नियोजन करुन वेळेत खर्च करावा, अशा सूचनाही पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी दिलेल्या सूचना व मागण्यांच्या अनुषंगाने सर्व संबंधित शासकीय यंत्रणेने तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देशही पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी दिले.
यावेळी आमदार राजू नवघरे यांनी शाळा खोल्याचे बांधकाम, शाळेला कंपाउंड वॉल, सिध्देश्वर धरणावर पर्यटन स्थळ विकसित करणे, आरोग्य विभागातील रिक्त पदे भरणे यासह विविध कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना केल्या.
यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सादरीकरणाद्वारे जिल्हा विकास आराखड्यानुसार पुढील पाच वर्षात कृषि, सिंचन, फळबाग लागवड, हळद लागवड, उद्योग व स्वयंरोजगार, पर्यटन यासह विविध विषयावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती दिली. तसेच जिल्हा वार्षिक योजनेत सन 2024-25 या वर्षासाठी 277 कोटी रुपयाचा निधी मंजूर असून आतापर्यंत 110 कोटी निधी प्राप्त झाला आहे. 241 कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आतापर्यंत विविध यंत्रणांना 81 कोटी रुपये वितरीत करण्यात आले असून त्यापैकी 66 कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. शासनाकडून उर्वरित निधी प्राप्त होताच संबंधित यंत्रणेला निधी वितरीत करुन शंभर टक्के निधी खर्च करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी दिली. तसेच सन 2025-26 चा 186.59 कोटीचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती दिली.
यावेळी बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे, समाज कल्याण आयुक्त यादव गायकवाड, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प संचालक सुनिल बारसे तसेच सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांची बैठकीस उपस्थिती होती.
******
राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या प्रचार-प्रसिध्दी चित्ररथाचा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते प्रारंभ
हिंगोली (जिमाका), दि. 26 : जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजना सन 2024-2025 अंतर्गंत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनाची जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती व जनजागृती होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजित चित्ररथाला आज येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रचार-प्रसिद्धी मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. हे चित्ररथ जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात जाऊन प्रचार-प्रसिध्दी करणार असल्याने नागरिकांना तसेच लाभार्थ्यांना या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता शासकीय वसतिगृह व निवासी शाळा चालविणे, अनुसूचित जातीच्या मुलामुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, रमाई आवास योजना (घरकुल), सैनिक शाळेतील अनुसूचित जाती, विजाभज, विमाप्र प्रवर्गाया विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता यासह विविध शासनाच्या कल्याणकारी योजनाची जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती व जनजागृती होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजित हे चित्ररथ जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात जाऊन प्रसिध्दी करणार आहे. त्यामुळे या चित्ररथाच्या माध्यमातून पात्र व गरजू नागरिक तसेच लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यासोबतच जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजना, बालविवाह प्रतिबंधक कायदा : सन 2006, मागेल त्याला सौर कृषि पंप योजना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना आणि अनुसूचित जाती उपयोजनाअंतर्गत मागासवर्गीय मुलां-मुलीसाठी शासकीय वसतिगृह, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना, रमाई आवास योजना (घरकुल) या कल्याणकारी योजनांवर आधारित तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रिकाचे देखील मान्यवरांच्या हस्ते यावेळी विमोचन करण्यात आले. हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे.
यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त यादव गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, माहिती सहायक चंद्रकांत कारभारी, आशाताई बंडगर, कैलास लांडगे आदींची उपस्थिती होती.
*****
प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न
जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी योजना यशस्वीपणे राबविण्यास कटिबध्द
-- पालकमंत्री नरहरी झिरवाळ
हिंगोली (जिमाका), दि.26 : हिंगोली जिल्ह्याची सेवा करण्याची मला संधी मिळाली असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रगतीसाठी तसेच शासनाच्या सर्व योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी यावेळी केले.
भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील संत नामदेव कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते आज झाले. यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले की, महाराष्ट्र राज्याने सर्वच क्षेत्रामध्ये विकासात झेप घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत आहे. त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रातही अभूतपूर्व प्रगती करीत देशाच्या विकासामध्ये नेहमीच सिंहाचा वाटा उचलला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या विविध विभागामार्फत 100 दिवसात करावयाच्या कामाचा आराखडा तयार केला आहे. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 7 कलमी कार्यक्रमाच्या ‘मिशन 100 दिवस’च्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत 100 दिवसात शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसुविधा, प्रशासकीय सुधारणा आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन यावर भर दिला जाणार असल्याचे पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात सप्टेंबर, 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास 3 लाख शेतकऱ्यांच्या 2 लाख 95 हजार 171 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना जवळपास 419 कोटी 48 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही सुरु आहे.
जिल्ह्यामध्ये कृषि विभागाने ॲग्रीस्टॅक योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ‘शेतकरी ओळख क्रमांक मिळणार आहे. ॲग्रीस्टॅकद्वारे शेतकऱ्यांचा डेटा एकत्रित केला जाणार असून त्याआधारे कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवेचा वापर करुन कृषी योजनाचा शेतकऱ्यांना लाभ मिळणे सुलभ होणार आहे. एकत्रित डेटाच्या आधारे विविध शेतीविषयक माहिती मिळाल्याने शासनाला त्वरित निर्णय घेणे सुलभ होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवानी या योजनेत आपला सहभाग नोंदवणे आवश्यक असल्याचे श्री. झिरवाळ म्हणाले.
शासनाने शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासाचे ध्येय लक्षात घेऊन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांबाबत आपला दृष्टिकोन बदलला आहे. आता प्रत्येक हाताला काम व कामाप्रमाणे दाम इथपर्यंत मर्यादित न राहता प्रत्येक हाताला काम, कामाप्रमाणे दाम व शाश्वत उत्पन्नाकरिता पाहिजे ते काम या उद्देशाने वैयक्तीक स्वरुपाच्या कामावर भर दिला आहे. यावर्षी मनरेगाअंतर्गत शेतीपूरक विविध योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील विविध यंत्रणांना उद्दिष्ट दिले आहे. जिल्ह्यात यावर्षी 850 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट असून आतापर्यंत 489 लाभार्थ्यांनी 468 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचा लाभ घेतला असल्याचे श्री. झिरवाळ म्हणाले.
हिंगोली येथील शासकीय महाविद्यालयामध्ये चालू शैक्षणिक वर्षात 100 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी 100 गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी हे महाविद्यालय मानाचा तुरा ठरत आहे. तर जिल्हावासीयांच्या आरोग्यविषयक सोयी सुविधांसाठी महत्त्वाचे आणि नजिकचे रुग्णालयही ठरले आहे. तसेच जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक सुविधाही उपलब्ध होणार आहे. याशिवाय जिल्हा रुग्णालयात 50 बेडचे सुसज्ज क्रिटिकल केअर ब्लॉक, 100 बेडचे स्त्री रुग्णालय, गंभीर रुग्णांच्या अचूक निदानासाठी एमआरआय मशीन लवकरच कार्यान्वित होणार असल्याचे श्री. झिरवाळ यांनी सांगितले.
जिल्ह्यात चला जाणूया नदीला या अभियानाच्या माध्यमातून जलसाक्षर करण्यासाठी जलदूत नेमण्यात येणार आहेत. हिंगोली जिल्ह्याने राष्ट्रीय जीवन्नोनती अभियान (एनआरएलएम) पोर्टलवर 100 टक्के आधार सिडींग करत देशात व राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. तसेच सन 2024-25 मध्ये हिंगोली जिल्ह्याने LokOS (लोकोस) मध्ये स्वयंसहाय्यता समूह, ग्रामसंघ व प्रभागसंघाचे शंभर टक्के प्रोफाईल पूर्ण करुन राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. याचा लाभ ग्रामीण भागातील महिलांना छोटे व्यवसाय सुरु करण्यासाठी झाला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील विविध विज ग्राहकांचे नादुरुस्त रोहित्र त्वरीत बदलण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 4 कोटी 32 लाख रुपयांचा निधीतून 100 केव्ही क्षमतेचे 250 विद्युत रोहित्र खरेदी करण्यात आले आहे. उर्जेची गरज भागविण्यासाठी पर्यावरणपूरक सौरउर्जेला महत्त्व देण्यात येत आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने प्रधानमंत्री कुसुम योजना व मागेल त्याला सौर कृषि पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या प्रधानमंत्री कुसुम योजनेमध्ये आतापर्यंत जवळपास 7 हजार सौर कृषि पंप बसविण्यात आले आहेत. तर मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतंर्गत ते बसवून देण्याचे काम चालू आहे. मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना 2.0 अंतर्गत कृषि पंपाना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी क्रांतिकारी अभियान राबविण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा नियमित व अखंडित वीज पुरवठा उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यात वसमत येथे मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (हळद) हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या संशोधन केंद्रामार्फत हळदीच्या आधुनिक वाणाचे संशोधन व विस्ताराचे काम चालू आहे. वसमत हळद या नावाने हिंगोलीच्या हळदीला भौगोलिक मानांकनांचा दर्जा प्राप्त झाला आहे. याचा हिंगोली जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा दोन साठी हिंगोली जिल्ह्यातील 148 गावांना शासनाने मंजुरी दिली आहे. या गावातील ग्राम कृषि विकास समिती सदस्य व सरपंच यांचे प्रशिक्षण घेण्याचे प्रकल्प स्तरावरुन नियोजन असल्याचे पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी सांगितले.
हिंगोली नगर परिषदेने माझी वसुंधरा 4.0 अंतर्गत महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला असून 4 कोटीचे बक्षीस मंजूर झाले आहे. हिंगोली शहराच्या पुरातन जलेश्वर मंदिरालगत असलेल्या तलावाचे सुशोभिकरण करण्यात येत असून तलावाच्या संरक्षण भिंती, तलावातील गाळ काढणे यासह इतरही महत्त्वाची कामे सुरु आहेत. या तलावाच्या सुशोभिकरणामुळे हिंगोली शहराच्या वैभवात भर पडणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अमूल्य योगदान लाभलेल्या लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेल्या भारतीय राज्यघटनेची 26 जानेवारी, 1950 रोजी देशात अंमलबजावणी सुरु झाली. आणि जगात भारत देश प्रजासत्ताक गणराज्य म्हणून उदयास आला. राज्यघटनेमुळे नागरिकांना राज्यकारभारात सहभागी होण्याचा अधिकार मिळाल्याने या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. भारतीय संविधानातील मूल्यांमुळेच भारतीय लोकशाही आज जगात सर्वश्रेष्ठ मानली जाते. त्यामुळे सर्वांना समान संधी मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न केल्यास राज्य तसेच आपल्या हिंगोली जिल्ह्याची चौफेर प्रगतीसाठी जनता, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून जागरुक नागरिक म्हणून सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पालकमंत्री नहररी झिरवाळ यांनी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनेच्या तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखूवन शुभारंभ केला. तसेच त्यांनी यावेळी भित्तीपत्रिकेचीही विमोचन केले. तसेच महिला व बालविकास विभागाच्या बालविवाह मुक्त हिंगोली जिल्हा स्वाक्षरी अभियानाची सुरुवात पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी यावेळी केली.
याप्रसंगी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी परेडचे निरीक्षण केले. यावेळी राज्य राखीव दल, पोलीस, गृहरक्षक दलाच्या पथकांनी शानदार संचलन केले. यावेळी हळद संशोधन केंद्र, कृषि विभाग, रेशीम विभाग, परिवहन विभाग, सामाजिक न्याय विभाग, महिला व बालविकास यासह विविध विभागाचे चित्ररथही संचलनात सहभागी झाले होते.
तसेच पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, मान्यवर यांच्या भेटी घेऊन शुभेच्छा दिल्या. तसेच शहीद गणपत भिकाजी रणवीर यांचे विर पिता भिकाजी रणवीर व वीरमाता लक्ष्मीबाइ रणवीर यांचा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी हिंगोली जिल्ह्यात उत्कृष्ट ध्वजदिन निधी संकलन केल्यामुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांचा यांचा प्रशस्तीपत्र व स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या डॉ. विजय निलावार, जयाजी पाईकराव, कुष्ठरोग निर्मूलनासाठी उत्कृष्ट कार्य केलेल्या डॉ. मनीष बगडिया, डॉ. फैसल खान यांचा, कृषि विभागातर्फे अमोल मोर, उमाजी जुंबडे, पोलीस विभागाचे आनंद मस्के यांचा प्रशस्तीपत्र, महावितरण विभागातर्फे सौरकृषी पंप उभारणी केलेले लाभार्थी श्रीराम महाजन, अनिता बांगर, संतोष जोशी, शकुंतला गायकवाड, बापूराव पाटील यांना प्रमाणपत्राचे वितरण पालकमंत्री श्री. झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. ॲग्रीस्टॅक योजनेत हनुमान जगताप, शिवाजी जाधच, संजय जाधव, देविदास जाधव, रमेश जाधव यांना फार्मर आयडी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. उत्कृष्ठ संचलन केल्यामुळे पंडित अवचार यांचाही यावेळी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी सर्व उपस्थितांना व्यसनमुक्ती व तंबाखू मुक्तीची शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित अवचार यांनी केले. या ध्वजारोहण कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******
प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहण
हिंगोली (जिमाका), दि.26 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज भारतच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजाळ, जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, तहसीलदार आश्विनकुमार माने, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी बारी सिद्दीकी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख प्रशांत बिलोलीकर, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त डॉ.राजपाल कोल्हे, तसेच सर्व अधिकारी- कर्मचारी यांची उपस्थिती होती.
*****
Subscribe to:
Posts (Atom)












