28 September, 2021

 

जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 65 मि.मी. पावसाची नोंद

 

हिंगोली, (जिमाका) दि. 28 : जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकूण 65.30 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी  1037 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 130.39 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात दि. 28 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी 08.00 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसात दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची आहेत.

हिंगोली  79.30 (1113.40) मि.मी., कळमनुरी 78.80 (1097.40) मि.मी., सेनगांव 28.90 (882.70) मि.मी., वसमत 76.10 (980.70) मि.मी., औंढा नागनाथ 56.20 (1144.50) मि.मी. पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी  1037 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.

 **** 

27 September, 2021

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही, तर 04 रुग्णांवर उपचार सुरु

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 27 : जिल्ह्यात  कोविड-19 चा नवीन एकही पॉझिटिव्ह रुग्ण  आढळून आलेला नाही, तर 04 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 36 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 638 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 04 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 394 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

*******

 

आदिवासी शेतकऱ्यांनी शेळीगट पुरवठा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावे

 

हिंगोली, (जिमाका) दि. 27 : भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275 (1) अंतर्गत अनुसूचित जमातीच्या वनहक्क कायदा 2006 अंतर्गत वनपट्टे प्राप्त असणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना शेतीस पूरक व्यवसाय म्हणून वैयक्तीक योजनेतून शेळीगट पुरवठा करावयाचा आहे. त्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचे विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली या कार्यालयात उपलब्ध आहेत.

इच्छूक लाभार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांच्या नावे योजनेचा लाभ घेण्यासाठी वनहक्क कायदा 2006 अंतर्गत वनपट्टे प्राप्त असणारा आदिवासी शेतकरी असावा. वनपट्टे प्राप्त झाल्याबाबतचे प्रमाणपत्र व सातबारा उतारा असणे आवश्यक आहे. अनुसूचित जमातीचे जातीचे प्रमाणपत्र, सन 2021 या वर्षातील उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र (स्वयंघोषित), आधार कार्ड छायांकित प्रत, आधार जोडणी असलेले अर्जदाराचे बँक पासबूक, अर्जदाराचे पासपोर्ट साईज दोन फोटो याप्रमाणे परिपूर्ण कागदपत्रांसह अर्ज दि. 14 ऑक्टोबर, 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. मुदतीनंतर आलेले अर्ज व परिपूर्ण नसलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

****

 



वैभव बांगरचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यश

हिंगोली जिल्ह्याचा गौरव वाढणारा : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

हिंगोली, (जिमाका) दि. 27 : जिल्ह्याचे भूमिपूत्र व हिंगोली येथील रहिवाशी वैभव सुभाष बांगर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. वैभव बांगर यांनी मिळविलेले हे यश हिंगोली जिल्ह्याचा गौरव वाढवणारा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज केले.

जिल्ह्याचे भूमिपूत्र व हिंगोली येथील रहिवाशी वैभव सुभाष बांगर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल येथील जिल्हाधिकारी कार्यालयात  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून व पेढा भरुन त्यांचे अभिंदन केले. त्यावेळी ते बोलत. यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी उपस्थित होते.

जिल्ह्याचे भूमिपूत्र व हिंगोली येथील वैभव सुभाष बांगर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले आहे. त्यांचा निकाल शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर वैभव यांनी परीक्षेत यश  मिळविल्याचे समजताच हिंगोलीकरांनी जल्लोष केला व बांगर कुटुंबियांवर  अभिनंदनाचा वर्षाव झाला. हिंगोली जिल्ह्यात वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी त्यांनी हे यश मिळविले आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्वात लहान वयाचा अधिकारी होण्याचा मान त्यांनी मिळविला. या परीक्षेत त्यांना 442 वी रँक मिळाली आहे.

हिंगोली येथील विद्यानिकेतन इंग्लीश स्कूलमध्ये इयत्ता आठवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी थेट पुणे गाठले. पुणे येथे बी.के. बिर्ला कॉलेजमध्ये इयत्ता बारावीचे शिक्षण पूर्ण केले. मात्र यावेळी अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या वैभव यांनी फर्ग्यूसन महाविद्यालयातून बी.ए. अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. बी.ए.चे शिक्षण घेत असताना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरु केली आणि चार वर्षाच्या खडतर प्रयत्नानंतर हे यश त्यांनी मिळविले आहे.

ध्येय निश्चित करुन तयारी केली- वैभव सुभाष बांगर

पुणे येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अधिकारी होण्याचे निश्चित केले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी कला शाखा निवडली. त्यामुळे बी.ए. सोबतच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यासही सुरु केला. दररोज बारा तास अभ्यास व स्वत: नोटस तयार करुन त्याचे वाचन सुरु केले. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे विषय घेतले. घरी आई , वडील व कुटुंबियांनी पाठबळ दिले अन हे यश मिळाले आहे. तरुणांनी ध्येय निश्चित करुन त्यानुसार वाटचाल केल्यास कुठलीही गोष्ट कठीण नाही. या गुणांवर आयपीएस होऊ शकेल मात्र आयएएस साठी तयारी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

****

 

भूकंपाचे धक्के बसणाऱ्या गावात 27 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत

भूकंप आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 27 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत जिल्ह्यातील भूकंपाचे धक्के बसणाऱ्या 35 गावात आणि हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ या 4 तहसील कार्यालयात असे एकूण 39 ठिकाणी दि. 27 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर, 2021 या कालावधीत सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 व दुपारी 2.00 ते सायंकाळी 5.00 या दोन सत्रात भूकंप आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा/प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

दि. 27 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वा. या कालावधीत तहसील कार्यालय, औंढा नागनाथ येथे तर दुपारी 2.00 ते 5.00 वा. या तहसील कार्यालय, वसमत येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 28 सप्टेंबर रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत तहसील कार्यालय, हिंगोली येथे तर दुपारी 2.00 ते 5.00 वाजेपर्यंत तहसील कार्यालय, कळमनुरी येथे, दि. 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत सिंदगी, कळमनुरी येथे तर दुपारी 2.00 ते 5.00 वाजेपर्यंत जांब, कळमनुरी येथे, दि. 30 सप्टेंबर रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत बोल्डा, कळमनुरी येथे तर दुपारी 2.00 ते 5.00 वाजेपर्यंत येहळेगाव ग., कळमनुरी येथे, दि. 01 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत सापळी, कळमनुरी येथे तर दुपारी 2.00 ते 5.00 वाजेपर्यंत डोंगरगाव, कळमनुरी येथे, दि. 02 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत कुपटी, कळमनुरी येथे तर दुपारी 2.00 ते 5.00 वाजेपर्यंत गणगाव, कळमनुरी येथे, दि. 03 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत भोसी, कळमनुरी येथे तर दुपारी 2.00 ते 5.00 वाजेपर्यंत तोंडापूर, कळमनुरी येथे, दि. 04 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत येडशी, कळमनुरी येथे तर दुपारी 2.00 ते 5.00 वाजेपर्यंत पोत्रा, कळमनुरी येथे, दि. 05 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत कन्हेरगाव नाका, हिंगोली येथे तर दुपारी 2.00 ते 5.00 वाजेपर्यंत मोप, हिंगोली येथे, दि. 06 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत कानडखेडा खु., हिंगोली येथे तर दुपारी 2.00 ते 5.00 वाजेपर्यंत कानडखेडा बु., हिंगोली येथे, दि. 07 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत कलबुर्गा, हिंगोली येथे तर दुपारी 2.00 ते 5.00 वाजेपर्यंत चिंचपुरी., हिंगोली येथे, दि. 08 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत वाढोणा/प्र., हिंगोली येथे तर दुपारी 2.00 ते 5.00 वाजेपर्यंत लिंबाळा प्र.वा., हिंगोली येथे, दि. 09 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत कापूरखेडा, हिंगोली येथे तर दुपारी 2.00 ते 5.00 वाजेपर्यंत भिंगी, हिंगोली येथे, दि. 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत पिंपळदरी, औंढा नागनाथ येथे तर दुपारी 2.00 ते 5.00 वाजेपर्यंत राजदरी, औंढा नागनाथ येथे,  दि. 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत सोनवाडी, औंढा नागनाथ येथे तर दुपारी 2.00 ते 5.00 वाजेपर्यंत आमदरी, औंढा नागनाथ येथे, दि. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत जामगव्हाण, औंढा नागनाथ येथे तर दुपारी 2.00 ते 5.00 वाजेपर्यंत कंजारा, औंढा नागनाथ येथे, दि. 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत पूर, औंढा नागनाथ येथे तर दुपारी 2.00 ते 5.00 वाजेपर्यंत आंबा, वसमत येथे, दि. 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत सिरळी, वसमत येथे तर दुपारी 2.00 ते 5.00 वाजेपर्यंत राजवाडी, वसमत येथे, दि. 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत पांगरा शिंदे,वसमत येथे तर दुपारी 2.00 ते 5.00 वाजेपर्यंत वापटी, वसमत येथे, दि. 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत कुपटी, वसमत येथे तर दुपारी 2.00 ते 5.00 वाजेपर्यंत खांबाळा, वसमत येथे आयोजित करण्यात आले आहे,

तहसील कार्यालयातील प्रशिक्षणास तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी, नायब तहसीलदार, सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आदींना हजर राहण्याबाबत तहसीलदारांमार्फत सूचित करण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण तहसील कार्यालयात आयोजित करण्यात येणार आहे.

गावातील प्रशिक्षणासाठी मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांना हजर राहण्यासाठी तहसीलदारांमार्फत सूचित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, पोलीस पाटील, सर्व समित्यांचे अध्यक्ष, सदस्य, आशा वर्कर, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, नागरिक इत्यादीं उपस्थित राहणार आहेत. तसेच झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाची स्थानिक वृत्तपत्रामार्फत प्रसिध्दी देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

ग्रामसेवक व तलाठी यांनी प्रशिक्षकांमार्फत देण्यात येणारा गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करुन तो आराखडा ग्रामपंचायत कार्यालयात, तहसील कार्यालयात व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याच्या सूचना सर्व तहसीलदारांना दिलेल्या आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

****

 

वादळी वाऱ्यासह पावसाच्या शक्यतेचा हवामान खात्याचा इशारा 

नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

हिंगोली, (जिमाका) दि. 27 : भारतीय हवामान विभागाने दि. 27 सप्टेंबर, 2021 ते दि. 30 सप्टेंबर, 2021 या कालावधीत हिंगोली जिल्ह्यासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाट व पावसाच्या शक्यतेचा इशारा दिला आहे. दरवर्षी अंगावर वीज पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक मरण पावतात अथवा दुर्घनाग्रस्त होतात. त्यामुळे कोसळणाऱ्या विजेपासून नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी खालीलप्रमाणे खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.  

आकाशात विजा चमकत असल्यास हे करा :

1) आकाशात विजेचा कडकडात होत असताना शेतकऱ्यांनी  तसेच नागरिकांनी तात्काळ शेताजवळील घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. पोहणारे, मच्छीमारी करणाऱ्यांनी तात्काळ पाण्यातून बाहेर यावे.  

2) जवळ आसरा नसेल तर पायाखाली लाकूड, प्लास्टिक, गोणपाट अशा वस्तू अथवा कोरडा पालापाचोळा ठेवा. तसेच विजेपासून बचावासाठी दोन्ही पाय एकत्र करुन गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून डोके जमिनीकडे गुडघ्यामध्ये झुकवा व डोके जमिनीवर टेकणार नाही याची काळजी घ्या.

3) झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे राहावे.

4) वीजवाहक वस्तूपासून दूर रहा, उदा. विजेचे खांब, टेलीफोन खांब, लोखंडी पाईप ई. पासून दूर राहावे.

5) वीज पडल्यास प्राथमिक उपचारासाठी मुख्यतः हृदय व श्वसन प्रकियेत अडथळा येतो त्यामुळे विद्युतघात झाल्यास लगेच हृदयाच्या बाजूने मालीश करावी. तोंडाने श्वसन प्रक्रियेस मदत करावी.

6) विजा चमकत असल्यास संगणक, विद्युत उपकरणे बंद करुन ठेवावीत.

7) वादळी वाऱ्यासह, पावसाची शक्यता देखील असल्याने शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी यानुसार आपापल्या कामाचे नियोजन करावे.

आकाशात विजा चमकत असल्यास हे करु नका :

1) पाण्याचे नळ, फ्रीज, टेलिफोन यांना स्पर्श करू नका. बाहेर असाल तर भ्रमणध्वनी तात्काळ बंद करावा.

2) विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका. झाडाखाली आश्रय घेऊ नका.

3) दोन चाकी, सायकल यावर असाल तर तात्काळ उतरुन सुरक्षित ठिकाणी जा.

4) धातूची कांडी असलेल्या छत्रीचा वापर करू नका. 

            त्यामुळे कोसळणाऱ्या विजेपासून नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी वरीलप्रमाणे खबरदारी घ्यावी . 

****

 

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

नागरिकांनी पूर परिस्थतीत काळजी व खबरदारी घेण्याचे आवाहन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 27 भारतीय हवामान विभागाच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत झालेला जोरदार पाऊस, येलदरी, सिद्धेश्वर व इसापूर धरणाची पाणी पातळी आणि पूर्णा, पैनगंगा आणि कयाधू नदीची तसेच लहान , मोठ्या ओढ्यातून वाहत असलेले पाणी यामुळे नद्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोठ्या पावसामुळे कयाधू, पूर्णा व पैनगंगा नदी तसेच जवळील नाले, ओढे काठच्या गावांना पुरस्थिती उद्भवू शकते अशा गावांसाठी खालीलप्रमाणे उपाययोजना व खबरदारी घेण्याचे आवाहन  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

काय करावे :

1)      गावात पुरस्थिती निर्माण झाल्यास अथवा होण्याची शक्यता असल्यास घरातील उपयुक्त सामान, महत्वाची कागदपत्रे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवा, विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठा बंद करावा.

2)     गावात अचानक पूरस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ तहसील, पोलीस, नगर पालिका प्रशासनास कळवावे.

3)      गावात, घरात जंतुनाशक असतील तर ते पाण्यात विरघळणार नाहीत याची दक्षता घ्या.

4)    पूर स्थितीत उंच ठिकाणी जावे तसेच जाते वेळी सोबत रेडिओ, टॉर्च, सुके खाण्याचे पदार्थ, पिण्याचे पाणी सोबत ठेवावे, शक्य असल्यास घरातील वाहने उंच ठिकाणी हलवावेत. घर सोडून जाताना दारे, खिडक्या सर्व घट्ट बंद करुन जावे.

5)     पूर स्थिती असेपर्यंत पाळीव प्राणी, जनावरे उंच ठिकाणी बांधण्यात यावीत. चुकूनही पाळीव प्राणी, इतर जनावरे यांना नदी काठी, ओढ्या काठी बांधू नये. 

6)     कुटुंबातील सर्व व्यक्तींकडे ओळखपत्र राहील याची काळजी घ्या.

7)     पुरामध्ये अडचणीत सापडला असाल तर आजूबाजूच्या साधनांचा वापर करा. (उदा. पाण्यावर तरंगणारे मोठे लाकूड, प्लास्टिकचे ड्रम याचा वापर करा), कोणी व्यक्ती वाहत जात असेल तर दोरीच्या सहाय्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा. पूर स्थितीत घाबरुन जाऊ नका, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.

काय करु नये :

1)      पुर असलेल्या भागात, नदीच्या पुलावर विनाकारण भटकू नका.

2)     पुराच्या पाण्यात चुकूनही जावू नका, तसेच पूर आल्यानंतर पुलावरुन गाडी घालण्याचा, अथवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करु नका.

3)      दूषित, उघड्यावरील अन्न पाणी टाळा. (शक्यतो उकळलेले पाणी व सुरक्षित अन्न सेवन करा.)

4)    सुरक्षित ठिकाणी रहा व विद्युत तारांना स्पर्श करु नका.

5)     पोहता येत असेल तरच बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवा परंतु अपरिचीत व खोल पाण्यात जाऊ नका.

6)     पूर परिस्थितीत नदी, नाले, पूल, धरण इत्यादी ठिकाणी विनाकारण गर्दी करू नका.

****