25 October, 2021

 



तुळजापुरवाडी येथील लसीकरण पूर्ण

मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी केले सरपंच व ग्रामसेवकांचे अभिनंदन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 25 : पंचायत समिती वसमत अंतर्गत ग्रामपंचायत तुळजापुरवाडी येथे कोविड लसीकरणाचे काम पूर्ण झाले असून नुकतेच गावात राहत असलेल्या सर्वांना कोविड डोस देण्यात आला आहे.

ही लसीकरण मोहिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, गट विकास अधिकारी विठल सुरोसे याच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी करण्यात आली.

        या मोहिमेत तुळजापुरवाडी येथील सरपंच सौ.कमलताई गिरी, ग्रामसेवक संजय कातोरे, उपसरपंच सौ.आशा चव्हाण, अंतरावर चव्हाण, पंडीतराव चव्हाण, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी देशमुख, एएनएम प्रतिभा काटे, अंगणवाडीताई पार्वती राखोंडे, आशा वर्कर उर्मिला चव्हाण, रोजगार सेवक अनंता चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी प्रभाकर चव्हाण, मदतनीस पार्वती चव्हाण व ग्रामस्थ यांच्या अथक परिश्रमांतून यशस्वी करण्यात आली. 

      गावातील एक जेष्ठ नागरिक मंचकराव चव्हाण हे लस घेण्यास तयारच नव्हते तेव्हा ग्रामसेवक त्यांच्या घरी गेले आणि जोपर्यंत तुम्ही लस घेणार नाही तो पर्यंत मी घरच सोडणार नाही, असे ग्रामसेवक यांनी सांगितले व शेवटी मंचकराव तात्या यांनी लस घेतली. 

येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी तात्काळ सरपंच  सौ. कमलताई गिरी, ग्रामसेवक संजय कातोरे व समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी देशमुख यांचे प्रत्यक्ष व मोबाईलद्वारे संपर्क करुन अभिनंदन केले व गावात येणारी पाहुणे मंडळींचे देखील लसीकरण करण्याचा सुचना दिल्या. 

       मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी सरपंचताई तुम्ही अतिशय चांगले काम केले आहे, मी तुळजापुरवाडीला नक्की भेट देणार आहे असे बोलत असताना सरपंचताई  यांचे मन भरुन आले व त्यांना फार आनंद झाला. 

       जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार यांनी देखील तुळजापुरवाडी येथील सरपंच व ग्रामसेवक यांचे अभिनंदन केले आणि जिल्ह्यातील लसीकरण बाबत चांगले काम करणारे निवडक  सरपंच व ग्रामसेवक यांचा सत्कार व गौरव थोड्याच दिवसात जिल्हा परिषद हिंगोली येथे करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

****

22 October, 2021

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन 01 रुग्ण, तर 05 रुग्णांवर उपचार सुरु

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 22 : जिल्ह्यात 01 नवीन कोविड-19 चा पॉझिटिव्ह रुग्ण  आढळून आला आहे, तर 05 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार आरटीपीसीआर टेस्टद्वारे औंढा परिसरात 01 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 49 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 650 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 05 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 394 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

*******

 



जिल्हा ग्राम बाल सरंक्षण समितीच्या सक्षमीकरणासाठी

हिंगोली येथे दोन दिवशीय कार्यशाळा संपन्न

 

            हिंगोली, (जिमाका) दि. 22 :  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय हिंगोली अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत ग्राम बाल संरक्षण समितीच्या सक्षमीकरणासाठी हिंगोली  येथे दि. 21 व 22 ऑक्टोबर, 2021 या दोन दिवशीय ग्राम बाल संरक्षण समिती  प्रशिक्षण कार्यशाळा  संपन्न झाली .

ही प्रशिक्षण कार्यशाळा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील जिल्हा परिषदेच्या षटकोनी  सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेत प्रशिक्षणा दरम्यान जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी  ग्राम बाल संरक्षण समितीचे महत्व व कार्यशाळेचा उद्देश या बाबत माहिती दिली. तर समुपदेशक सचिन पठाडे यांनी बालविवाह, चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श बद्दलची माहिती दिली. बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे यांनी बाल संरक्षण विषयक यंत्रणेची माहिती दिली. बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण यांनी  ग्राम बाल संरक्षण समितीचे गठन आणि समिती मधील सदस्य यांची भूमिका याबाबत माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे यांनी ग्राम बाल संरक्षण समिती सदस्यांचे कार्य व जबाबदाऱ्या या बद्दल माहिती दिली. कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडीत यांनी बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम, 2012 या विषयीची माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ता रेश्मा पठाण यांनी बालकांचे हक्क व अधिकार याविषयीची माहिती दिली. चित्रफितीचे प्रदर्शन रफिक शेख जिलानी,राहूल सिरसाट, शितल भंडारे यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कायदा व परिविक्षा अधिकारी  ॲड. अनुराधा पंडीत यांनी केले, तर बाह्य क्षेत्रकार्य कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सर्व  कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या प्रशिक्षण कार्यशाळेस  अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील यांची उपस्थिती होती.

*****

 

सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांची ज्येष्ठता सूची निश्चित करण्यासाठी

लेखा परिक्षण अहवाल सादर करण्याचे आवाहन

 

            हिंगोली, (जिमाका) दि. 22 : कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या दि. 11 डिसेंबर, 2015 च्या शासन निर्णयानुसार रोजगार व स्वयंरोजगार धोरणांतर्गत अस्तित्वात असलेल्या बेरोजगारांच्या सहकारी सेवा सोसायट्यांना आर्थिक दृष्ट्या बळकट करण्यासाठी 3 लाख रुपयांपर्यंतची कामे विना निविदा देता येतात.

            जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली या कार्यालयाकडे जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय यंत्रणा 3 लाख रुपयापर्यंतची कामे कळवितात. सन 2021-2022 या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली या कार्यालयाकडे मागणी केलेल्या कामाचे जिल्ह्यातील नोंदणी असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांना वितरीत करण्यासाठी ज्येष्ठता सूची तयार करावयाची आहे.

            यासाठी जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्याकडे नोंदणी केलेल्या सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांनी सन 2020-2021 चे लेखा परिक्षण अहवाल दि. 31 डिसेंबर, 2021 पर्यंत सादर करावे, असे आवाहन रा. म. कोल्हे, सहायक आयुक्त , कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी केले आहे. विहित तारखेनंतर आलेले लेखा परिक्षण अहवाल सादर केलेल्या संस्थांचा ज्येष्ठता सूचीमध्ये विचार केला जाणार नाही, असेही प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

             

*****

21 October, 2021

 




ग्राम बाल संरक्षण समिती मुलांच्या सुरक्षेसाठी एक प्रभावी यंत्रणा

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

            हिंगोली, (जिमाका) दि. 21 : लहान बालके किंवा निराधार मुले यासाठी ग्राम बाल संरक्षण समिती कार्यरत असून मुलांच्या सुरक्षेच्या व विकासाच्या दृष्टीने काम करणारी एक प्रभावी यंत्रणा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापाळकर यांनी केले.

            येथील जिल्हा परिषदेच्या षटकोनी सभागृहात आज हिंगोली तालुक्यातील जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून ग्राम बाल संरक्षण समिती मधील सदस्य सचिव असलेल्या अंगणवाडी सेविका व सदस्य असलेल्या पोलीस पाटील यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी गणेश वाघ, जिल्हा महिला बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांची उपस्थिती होती.

लहान बालके किंवा निराधार मुले यासाठी बाल संरक्षण समिती कार्यरत असुन मुलांच्या सुरक्षेच्या व विकासाच्या दृष्टीने काम करणारी एक प्रभावी यंत्रणा आहे, असे सांगून जिल्ह्यातील बालविवाह स्थिती व कार्यरत यंत्रणा यांची जबाबदारी याबद्दल जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी बाल न्याय ( मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 अन्वये बालकाच्या संरक्षणासाठी जिल्ह्यात वेगवेगळ्या यंत्रणा कार्यरत आहेत अशा यंत्रणांची क्षमता बांधणी जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्याकडून चालू असून त्या अनुषंगाने ग्राम बाल संरक्षण समितीची कार्यशाळा येथील जिल्हा परिषदेच्या षटकोनी सभागृहात पार पडत आहे. या कार्यशाळेत बालकांचे संरक्षणाबाबत विविध विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. ग्राम बाल संरक्षण समितीच्या माध्यमातून बालकांचे हक्क व संरक्षण होणार असून बालकांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी ग्राम बाल संरक्षण समिती व  अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील यांची महत्वाची भूमिका असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माया सूर्यवंशी यांनी उपस्थितांना ग्राम बाल संरक्षण समितीचे महत्त्व सांगितले.

या कार्यशाळेत  बालकांचे अधिकार, बालकांविषयी असणारे कायदे व यंत्रणा, लैंगिक अत्याचार, बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 , दत्तक विधान प्रक्रिया, बालविवाह अधिनियम 2006 आदी विषयावर सविस्तर माहिती देण्यात आली.

या प्रशिक्षणा दरम्यान जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी  ग्राम बाल संरक्षण समितीचे महत्व व कामकाज या बाबत माहिती दिली. बाल विवाह बद्दलची माहिती  समुपदेशक सचिन पठाडे यांनी दिली. बाल संरक्षण विषयक यंत्रणेची माहिती बाल संरक्षण अधिकारी संस्थाबाह्य जरीब पठाण यांनी  दिली. बाल लैंगिक या विषयीची माहिती कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडीत यांनी दिली. तर बालकांचे हक्क व अधिकार याविषयीची माहिती सामाजिक कार्यकर्ता रेश्मा पठाण यांनी दिली.

            ग्राम बाल संरक्षण समिती कामकाज विषयक चित्रफितीचे प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, डाटा एंट्री ऑपरेटर राहूल सिरसाट व बाह्य क्षेत्रकार्य कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत यांनी केले.

या प्रशिक्षणास अंगणवाडी सेविका, पोलिस पाटील यांच्यासह परिविक्षा अधिकारी सुनिल वाठोरे, निलेश कोटलवार उपस्थित होते.

*****




 

स्वच्छ भारत अभियानांतर्गत औंढा नागनाथ मंदिर व परिसराची स्वच्छता

 

हिंगोली, (जिमाका) दि. 21 : स्वच्छ भारत अभियानांतर्गत दि. 20 ऑक्टो रोजी नेहरु युवा केंद्र, युवा कार्यक्रम एवंम खेल मंत्रालय भारत सरकार यांच्यावतीने औंढा नागनाथ मंदिर व परिसराची स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

युवा व क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्यामार्फत संपूर्ण भारतभर दि. 1 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत क्लीन इंडिया मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. देशात प्लास्टीक कचऱ्यामुळे होणारे नुकसान लक्षात घेऊन खेल मंत्रालय द्वारा संपूर्ण देशात प्लास्टीक कचरा जमा करण्याचे अभियान राबविले जात आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात ही मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांनी दिली . त्याच धर्तीवर नेहरु युवा केंद्र हिंगोली अंतर्गत प्लास्टीक कचरा उचलून औंढा नागनाथ मंदिर व परिसराची स्वच्छता करण्यात आली.

यावेळी केंद्राचे राष्ट्रीय युवा सेवा कर्मी प्रवीण पांडे, संदीप शिंदे, नामदेव फरकंडे, श्रीकृष्ण पकवाणे, अजय धोतरे, सुदर्शन राठोड तसेच संस्थानातील सफाई कर्मचारी , संस्थानचे प्रतिनिधी व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.   

                                                             ****** 

 




कृषि निविष्ठा विक्रेत्यानी कृषि विज्ञान केंद्राच्या विविध उपक्रमांची माहिती

शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची मोलाची भूमिका पार पाडावी

                                                    - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

  

हिंगोली, (जिमाका) दि. 21 : कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूर द्वारे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. या सर्व उपक्रमांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची मोलाची भूमिका कृषि निविष्ठा विक्रेत्यांनी पार पाडावी, असे सांगून  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी डेसी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सर्व कृषि निविष्ठा विक्रेत्यांचे अभिनंदन केले.

कृषि विज्ञान केंद्र तोंडापूर येथे उत्तीर्ण कृषि निविष्ठा विक्रेत्यांना प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर बोलत होते. यावेळी संत नामदेव सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष माजी खा. शिवाजीराव माने, आत्माचे प्रकल्प संचालक युवराज शहारे, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांची उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, डेसी अभ्यासक्रमाचा उद्देश हा शेतऱ्यांना विक्रेत्यांनी योग्य मार्गदर्शन करुन शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी  प्रयत्न करावे हा असून हिंगोली जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षण प्राप्त केलेल्या विक्रेत्यांनी निश्चितच चांगले काम करतील, असा विश्वास व्यक्त केला. हे केंद्र शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे असून वारंगा परिसरात आल्यावर शेतकऱ्यांनी कृषि विज्ञान केंद्राला जरुर भेट द्यावी व तेथे चालू असलेले प्रयोग आणि  निष्कर्ष यांचा अभ्यास करुन आपली प्रगती साधावी. शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न दुप्पट करण्यासाठी स्वत:हून प्रयत्नरत असणे तितकेच गरजेचे आहे, असे सांगितले. त्या साठी कृषि विभाग, कृषि विद्यापीठ आणि कृषि विज्ञान केंद्र सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी माजी खासदार शिवाजीराव माने यांनी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाय योजना बद्दल माहिती दिली.  शेतकऱ्यांना विजेची समस्या भेडसावत असून वेळेवर विद्युत पुरवठा मिळाल्यास शेतकरी अधिक उत्पादन आणि अधिक नफा मिळवू शकतील, असे सांगितले.  हिंगोली जिल्ह्यातील हळदीला हिंगोली हळद म्हणून भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी मदत करावी, अशी विनंती केली.

प्रस्ताविक भाषणात डॉ. पी. पी. शेळके यांनी कृषि विज्ञान केंद्राद्वारे जिल्ह्यातील कृषि विषयक तंत्रज्ञानामध्ये मनुष्यबळ  विकसित करण्यासाठी सुरु असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.  त्यामध्ये कृषि निविष्ठा विक्रेते यांच्यासाठी डेसी अभ्यासक्रम, कीटक नाशक विक्रेते यांच्यासाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम , मुक्त विद्यापीठ द्वारे विविध कृषि पदविका आणि पदवी अभ्यासक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती दिली.  शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची तसेच त्या पासून मिळालेल्या निष्कर्षांची माहिती दिली.  हिंगोली जिल्ह्यातील हळद या महत्वाच्या पीकाबद्दल अनेक वेबीनारचे आयोजन करुन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत असल्याची माहिती दिली.  संत नामदेव सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून भविष्यात विविध पिकांच्या प्रक्रिया करण्यासाठी सामुदायिक सुविधा केंद्र निर्माण करण्यात येत असल्याची माहिती देऊन जिल्ह्यातील हळदीला भौगोलिक मानांकन मिळल्यास शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळून जिल्ह्याचे नाव या क्षेत्रात प्रसिद्ध होईल. त्यासाठी कृषि विज्ञान केंद्राद्वारे प्रस्ताव देण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

जिल्ह्यात  कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूर द्वारे आयोजित कृषि निविष्ठा विक्रेत्यांसाठी नियमित 48 आठवड्याचा पदविका अभ्यासक्रम आयोजित करण्यात येतो. हा अभ्यासक्रम राष्ट्रीय कृषि विस्तार व्यवस्थापन संस्थान , हैदराबाद यांच्याद्वारे कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून चालविण्यात येत असतो. परीक्षा सुद्धा राष्ट्रीय कृषि विस्तार व्यवस्थापन संस्थान , हैदराबाद यांच्या वतीने घेतली जाते आणि उत्तीर्ण कृषि निविष्ठा विक्रेत्यांना  प्रमाणपत्र दिले जाते.  या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या बॅचमध्ये 40 विद्यार्थ्यानी भाग घेतला होता.  त्यापैकी 12 कृषि निविष्ठा विक्रेते यांना विशेष प्राविण्य मिळाले असून सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत प्रथम आलेल्या विष्णु प्रल्हाद बाहेती, द्वितीय क्रमांकावर आलेल्या प्रकाश डांगरे आणि तृतीय क्रमांक आलेल्या गोपाल श्रीरंग झाडे यांचा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच डे सी अभ्यासक्रम राबविण्यासाठी नेमलेल्या फॅसिलिटेटर प्रा.नांगेश माळोदे, प्रा. नवलकर, प्रा.रमेश लोमटे, प्रा. साईनाथ मीनगिरे यांचाही सन्मान करण्यात आला.

प्रारंभी मान्यवरांच्या हसते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच कृषि विज्ञान केंद्द्वारे निर्मित कृषि निविष्ठा प्रदर्शनाला भेट देवून पाहणी केली. कार्यक्रमाचे सूत्र संचलन विजय ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. राजेश भालेराव यांनी केले.

या कार्यक्रमाला डेसी विद्यार्थी, कृषि महाविद्यालय तोंडापूरचे प्राचार्य विष्णु बोंधारे, कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य सौ.माधुरी काटकर माने, कयाधू शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक महेंद्र माने, परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

                                                             ******