21 October, 2021

 




कृषि निविष्ठा विक्रेत्यानी कृषि विज्ञान केंद्राच्या विविध उपक्रमांची माहिती

शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची मोलाची भूमिका पार पाडावी

                                                    - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

  

हिंगोली, (जिमाका) दि. 21 : कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूर द्वारे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. या सर्व उपक्रमांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची मोलाची भूमिका कृषि निविष्ठा विक्रेत्यांनी पार पाडावी, असे सांगून  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी डेसी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सर्व कृषि निविष्ठा विक्रेत्यांचे अभिनंदन केले.

कृषि विज्ञान केंद्र तोंडापूर येथे उत्तीर्ण कृषि निविष्ठा विक्रेत्यांना प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर बोलत होते. यावेळी संत नामदेव सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष माजी खा. शिवाजीराव माने, आत्माचे प्रकल्प संचालक युवराज शहारे, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांची उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, डेसी अभ्यासक्रमाचा उद्देश हा शेतऱ्यांना विक्रेत्यांनी योग्य मार्गदर्शन करुन शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी  प्रयत्न करावे हा असून हिंगोली जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षण प्राप्त केलेल्या विक्रेत्यांनी निश्चितच चांगले काम करतील, असा विश्वास व्यक्त केला. हे केंद्र शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे असून वारंगा परिसरात आल्यावर शेतकऱ्यांनी कृषि विज्ञान केंद्राला जरुर भेट द्यावी व तेथे चालू असलेले प्रयोग आणि  निष्कर्ष यांचा अभ्यास करुन आपली प्रगती साधावी. शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न दुप्पट करण्यासाठी स्वत:हून प्रयत्नरत असणे तितकेच गरजेचे आहे, असे सांगितले. त्या साठी कृषि विभाग, कृषि विद्यापीठ आणि कृषि विज्ञान केंद्र सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी माजी खासदार शिवाजीराव माने यांनी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाय योजना बद्दल माहिती दिली.  शेतकऱ्यांना विजेची समस्या भेडसावत असून वेळेवर विद्युत पुरवठा मिळाल्यास शेतकरी अधिक उत्पादन आणि अधिक नफा मिळवू शकतील, असे सांगितले.  हिंगोली जिल्ह्यातील हळदीला हिंगोली हळद म्हणून भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी मदत करावी, अशी विनंती केली.

प्रस्ताविक भाषणात डॉ. पी. पी. शेळके यांनी कृषि विज्ञान केंद्राद्वारे जिल्ह्यातील कृषि विषयक तंत्रज्ञानामध्ये मनुष्यबळ  विकसित करण्यासाठी सुरु असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.  त्यामध्ये कृषि निविष्ठा विक्रेते यांच्यासाठी डेसी अभ्यासक्रम, कीटक नाशक विक्रेते यांच्यासाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम , मुक्त विद्यापीठ द्वारे विविध कृषि पदविका आणि पदवी अभ्यासक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती दिली.  शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची तसेच त्या पासून मिळालेल्या निष्कर्षांची माहिती दिली.  हिंगोली जिल्ह्यातील हळद या महत्वाच्या पीकाबद्दल अनेक वेबीनारचे आयोजन करुन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत असल्याची माहिती दिली.  संत नामदेव सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून भविष्यात विविध पिकांच्या प्रक्रिया करण्यासाठी सामुदायिक सुविधा केंद्र निर्माण करण्यात येत असल्याची माहिती देऊन जिल्ह्यातील हळदीला भौगोलिक मानांकन मिळल्यास शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळून जिल्ह्याचे नाव या क्षेत्रात प्रसिद्ध होईल. त्यासाठी कृषि विज्ञान केंद्राद्वारे प्रस्ताव देण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

जिल्ह्यात  कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूर द्वारे आयोजित कृषि निविष्ठा विक्रेत्यांसाठी नियमित 48 आठवड्याचा पदविका अभ्यासक्रम आयोजित करण्यात येतो. हा अभ्यासक्रम राष्ट्रीय कृषि विस्तार व्यवस्थापन संस्थान , हैदराबाद यांच्याद्वारे कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून चालविण्यात येत असतो. परीक्षा सुद्धा राष्ट्रीय कृषि विस्तार व्यवस्थापन संस्थान , हैदराबाद यांच्या वतीने घेतली जाते आणि उत्तीर्ण कृषि निविष्ठा विक्रेत्यांना  प्रमाणपत्र दिले जाते.  या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या बॅचमध्ये 40 विद्यार्थ्यानी भाग घेतला होता.  त्यापैकी 12 कृषि निविष्ठा विक्रेते यांना विशेष प्राविण्य मिळाले असून सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत प्रथम आलेल्या विष्णु प्रल्हाद बाहेती, द्वितीय क्रमांकावर आलेल्या प्रकाश डांगरे आणि तृतीय क्रमांक आलेल्या गोपाल श्रीरंग झाडे यांचा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच डे सी अभ्यासक्रम राबविण्यासाठी नेमलेल्या फॅसिलिटेटर प्रा.नांगेश माळोदे, प्रा. नवलकर, प्रा.रमेश लोमटे, प्रा. साईनाथ मीनगिरे यांचाही सन्मान करण्यात आला.

प्रारंभी मान्यवरांच्या हसते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच कृषि विज्ञान केंद्द्वारे निर्मित कृषि निविष्ठा प्रदर्शनाला भेट देवून पाहणी केली. कार्यक्रमाचे सूत्र संचलन विजय ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. राजेश भालेराव यांनी केले.

या कार्यक्रमाला डेसी विद्यार्थी, कृषि महाविद्यालय तोंडापूरचे प्राचार्य विष्णु बोंधारे, कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य सौ.माधुरी काटकर माने, कयाधू शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक महेंद्र माने, परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

                                                             ****** 

No comments: