02 October, 2021

 


साई व्यसनमुक्ती केंद्रात व्यसनमुक्ती सप्ताहाची उत्साहात सुरुवात

 

हिंगोली, (जिमाका) दि. 02 : सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार द्वारा पुरस्कृत स्व. कलावतीबाई देशमुख बहुउद्देशीय सेवाभावी संस्था द्वारा संचलित साई व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र व जिल्हा समाज कल्याण विभाग, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 02 ते 08 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. साई व्यसनमुक्ती केंद्रात या व्यसन मुक्ती सप्ताहाचे उद्घाटन आज लाल बहादूर शास्त्री व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.चे जिल्हा समाज कल्याण अधिकारी शिवानंद मिनगीरे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालयाच्या अरुणा बहनजी, सौ. वर्षा कोठुळे, डॉ. ज्ञानेश्वर पावडे यांची उपस्थिती होती.

यावेळी अरुणा बहनजी यांनी व्यसनावर येसन कशा प्रकारे घातले पाहिजे, ध्यानधारणेचे महत्व, पोपटाची बोधकथा याद्वारे महत्व पटवून दिले. केदार देशमुख यांनी माझे सत्याचे प्रयोग या बापूवरील आत्मकथेतील व्यवसनाबाबतची गोष्ट सांगून व्यसनापासून मुक्त झाले पाहिजे, असा मौलिक संदेश दिला. प्रकल्प संचालक संतोषकुमार देशमुख यांनी ही संस्था व्यसनमुक्त, सशक्त, निरोगी समाज घडविण्याचे काम करत असल्याचे सांगितले.

यावेळी समाज कल्याण अधिकारी शिवानंद मिनगीरे यांनी व्यसनी माणसाचे अनुकरण न करता स्वत: व्यसनापासून दूर राहून समाजापुढे आदर्श निर्माण करावा. एका व्यसनी माणसामुळे कौंटुंबिक कलह, आर्थिक चणचण, बालमनावर वाईट परिणाम होतात व व्यसनी माणसाबरोबर त्याचे कुटुंब अधोगतीला जातो, असे सांगून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी गजानन जोजार आणि डॉ. सुदर्शन भारती यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन के. डी. माने यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप व्यसनमुक्तीची शपथ घेऊन झाला.

या कार्यक्रमास ॲड नामदेव सपाटे, डॉ. जी. बी. कदम, स्वाती गोटे, नागनाथ नकाते यांच्यासह साई व्यसन मुक्ती केंद्रातील रुग्ण व परिसरातील नागरिक उपस्थित होते.                                       

****

No comments: