08 October, 2021

 

लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी

जिल्ह्यात दररोज 34 हजार 600 लाभार्थ्यांना लसीकरणाचे नियोजन

लाभार्थी गोळा करण्याची जबाबदारी व्हीआरआरटी पथकावर

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश

 

हिंगोली, (जिमाका) दि. 08 : जिल्ह्यात 18 वर्षावरील नागरिकांची संख्या 9 लाख 91 हजार 300 इतकी आहे. यापैकी 4 लाख 39 हजार 851 लाभार्थींना देण्यात आला असून त्याची टक्केवारी 45 टक्के आहे. तर 1 लाख 58 हजार 186 लाभार्थींना दुसरा डोस देवून सरंक्षित करण्यात आले आहे. दुसऱ्या डोसच्या लाभार्थ्यांची टक्केवारी 16 टक्के इतकी आहे. हे काम राज्याच्या व इतर जिल्ह्याच्या तुलनेत अत्यंत कमी आहे.

या अनुषंगाने शिल्लक राहिलेल्या 5 लाख 41 हजार 449 लाभार्थीचा पहिला डोस व देय असलेल्या लाभार्थीचा दुसरा डोस पूर्ण करण्यासाठी राज्य शासनामार्फत दि. 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर, 2021 या कालावधीमध्ये विशेष कोविड-19 लसीकरण मोहिम आयोजित करण्यात आली आहे. यामुळे कोविड-19 च्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यास मदत होणार आहे.

ही मोहिम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यात दररोज 34 हजार 600 अपेक्षित लाभार्थ्यांना लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यानुसार संबंधितांनी मोहिमेचे नियेाजन करुन प्रत्येक आरोग्य संस्थानिहाय ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावेत. शहरी भागामध्ये दररोज वेगवेगळ्या ठिकाणी लसीकरण सत्रे आयोजित करावीत. ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी एक व उपकेंद्र किंवा उपकेंद्र अंतर्गत एका गावामध्ये दररोज एका लसीकरण सत्राचे आयोजन करावे. या सत्रामध्ये उर्वरित लाभार्थ्यांची यादी करुन त्याच दिवशी सर्व लाभार्थ्यांना डोस देवून शंभर टक्के लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करावेत.

उर्वरित लाभार्थी गोळा करण्याची जबाबदारी त्या गावांमध्ये कोविड-19 अंतर्गत स्थापन केलेल्या व्ही.आर.आर.टी (सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पोलीस पाटील, आशा स्वयंसेविका) यांच्यावर सोपविण्यात आली आहे. व्हीआरआरटी पथकाने गावामध्ये जनजागृती करुन आपल्या गावातील उर्वरित लाभार्थ्यांचे शंभर टक्के लसीकरण करुन घ्यावे, गावात एकही लाभार्थी  लसीविना  शिल्लक राहणार नाही याची खात्री करावी. लसीकरण केंद्रावर नोंदणी कामासाठी शिक्षकांनी काम पहावे. तसेच समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, गट प्रवर्तक , आशा स्वयंसेविका यांनी गावनिहाय शिल्लक लाभार्थ्यांची यादी अद्ययावत ठेवावी व त्यानुसार लाभार्थ्यांना सत्रास बोलवावे. मोहिमेची व्यापक प्रमाणात जनजागृती करावी. या मोहिमेमध्ये लोक प्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, नगर सेवक, पंचायत समिती सदस्य, स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग घ्यावा. यामध्ये काही निष्काळजीपणा आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

*******

No comments: